Saturday, January 8, 2011

एका बंदिशीची गोष्ट

         आपलं शास्त्रीय संगीत हा एक विशाल असा महासागर आहे. यातला एखादा थेंब जरी लाभला, तरी आयुष्याचं सार्थक होईल! वर्षानुवर्षंच नाही, तर तपानुतपं गुणीजन या अनमोल खजिन्यात आपल्या योगदानानं मोलाची भर घालत आहेत.

         या विषयावर मी काही लिहावं, इतका माझा अधिकार नाही. पण शास्त्रीय संगीताची एक विद्यार्थिनी म्हणून धाडस करतेय या महासागरात उतरण्याचं! सर्वसाधारणपणे असं समजलं जातं, की शास्त्रीय संगीतात स्वर, ताल आणि लय यांचं महत्त्व शब्दांपेक्षा अधिक आहे, सुगम संगीतात शब्द, त्यांचे अर्थ, भाव या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. याचा अर्थ असा मुळीच नाही, की शास्त्रीय संगीतात भाव किंवा शब्द फारसे विचारात घेतले जात नाहीत. त्याशिवाय का राग आणि रस यांचं अतूट नातं आहे? अर्थात सगळ्याच विषयांप्रमाणे याही विषयात भिन्न भिन्न मतप्रवाह आहेतच, असोत! पं अजय पोहनकरजी यांनी आकाशवाणीवरील संगीत-सरिता या कार्यक्रमात हेच सांगितलं होतं, की स्वर-ताल-लय यांप्रमाणेच भाव आणि शब्द यांचंही शास्त्रीय संगीतातलं महत्त्व कमी नाही!
        
          शास्त्रीय बंदिशींचे विषय वेगवेगळे असतात. भक्ती हा त्यातला मुख्य विषय. हीच भक्ती जेव्हा कृष्णलीला वर्णिते, तेव्हा त्या बंदिशी आपोआपच शृंगाररसाचा आविष्कार करतात. भगवान कृष्ण आणि त्याच्या लीला हा तर नुसतं संगीतच काय, पण अगदी ६४ कलांच्या असंख्य कलाकारांचा युगानुयुगे जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याशिवाय पूर्वी शास्त्रीय संगीतगायक ज्या राजदरबारात आपली कला सादर करत, त्या राजाचं गुणवर्णन, संगीताची महती, सृष्टी, जगरहाटी असे कितीतरी विषय या बंदिशींमधून मांडले गेले आहेत आणि जात आहेत. हिंदी बंदिशींमधला आणखी एक अनादि-अनंत विषय म्हणजे नाती. त्यातल्या त्यात पिया आणि सास-ननदिया हे तर अगदी खास!

          तर मी ज्या बंदिशीची गोष्ट सांगतेय, ती याच विषयावरची. या बंदिशीची नायिका म्हणजे खटल्याच्या घरातली मधली सून, जिला सासू, नणंद यांच्या सोबतच जावा [मोठ्या आणि धाकट्या पण!] आहेत त्रास द्यायला. आणि अशा रगाड्यातून पिया भेटणं हे किती जिकीरीचं आणि कठीण आहे, ते तिचं तिलाच ठाऊक! तरीही ती पियाला भेटण्याचं धाडस म्हणा की साहस म्हणा, करते आणि आपल्या सखीला त्या घटनेचा इतिवृत्तांत सांगते, ही या बंदिशीची मध्यवर्ती कल्पना! आता हे तर काही विशेष नाही ना, ज्यावर एवढं घडीभर तेल ओतायला हवंय नमनालाच! पण तरीही मी ते काम करतेय, कारण या बंदिशीतला एकेक भाव, एकेक शब्द तिच्या स्वरावलीनं पेलून धरलाय!

         ही अप्रतिम बंदिश आहे पूरिया रागातली. सायंकाळच्या कातरवेळेत गाइला जाणारा मारवा थाटातला हा सायंकालीन संधिप्रकाशी राग. [अलिकडे तो रात्रीच्या प्रथम प्रहरातही गाइला जातो.] कोमल रिषभ, तीव्र मध्यम आणि पंचम वर्जित असलेला हा अतिशय सुरेख राग. या रागातली "मैं कर आई पियासंग रंगरलियां" ही ती सुरेख आणि सुरेल बंदिश! ही बंदिश मी ऐकली ती परितोष पोहनकरजी यांच्या आवाजात. त्याच वेळी ती मला अत्यंत भावली होती. आणि नेमकी शिकतानाही तीच माझ्या पुढ्यात उभी! जन्माचं सार्थक म्हणतात, ते हेच असावं का?

         अवघ्या पाच ओळींत त्या नायिकेच्या किती भावनांचं इंद्रधनू गुंफलं आहे स्वरांनी! ही बंदिश शिकत असताना अक्षरश: त्या नायिकेच्या भूमिकेत स्वत:ला ठेवावं, इतकं एकरूप केलं त्या भावना, शब्द आणि स्वरांनी!

मैं कर आई पियासंग रंगरलियां
आलि जात पनघट की बाट ॥
स्थायीमधल्या या दोन ओळींत तिचा खट्याळ, लाजरा, हसरा चेहरा दिसतो!

मैंS कर आई पियासंग रंगरलियाSSS
मंद्र निषादापासून सुरू होणारी, षड्ज, तीव्र मध्यम, गंधार, कोमल रिषभ यांच्या साथीनं पुन्हा षड्जावरून खाली उतरत मंद्र धैवत, मंद्र निषाद, षड्ज, कोमल रिषभ अशी वर चढत मध्य षड्जावर संपणारी पहिली ओळ त्या सखीला जणु सांगतेय, की घरच्या सगळ्या कटकटी विसरून, सासू-नणंद, जावा सगळ्यांच्या नाकावर टिच्चून मी पियाशी रंगरलियां, [या रंगरलियां शब्दातलं पहिलंच अक्षर समेवर आलंय, कोमल धैवतावरची ही सम त्या रंगरलियांचं महत्त्व आणखीनच वाढवतेय!] चेष्टामस्करी, शृंगार करून आले, तो कुठे? तर
आSलि जाSत पनघट कि बाSट !
पाणी भरायच्या निमित्तानं पाणवठ्यावर जाता जाता सख्यानं मला घेरलं! मंद्र निषादावरून कोमल रिषभाचा हात धरून गंधार, तीव्र मध्यम अशा पायर्‍यांवरून वर चढत चढत मध्य निषादाला स्पर्शून गंधार आणि तीव्र मध्यमासोबत धैवताच्या भोज्याला शिवून पुन्हा कोमल रिषभावर उतरणारी ही दुसरी ओळ या लाजर्‍या न् साजर्‍या मुखड्याचा आरसाच आहे जणु! काय सुख मिळालं असेल तिला त्या अवघ्या काही क्षणांच्या भेटीत? पण तरीही ती इतकी खुललेली, फुललेली आहे की जसं अख्खं आयुष्य जगलीय त्या क्षणांत!

आता यात कसलं आलंय कौतुक? पाणवठ्याच्या वाटेवर पियाशी रंगरलियां करण्यात काय विशेष? याचं उत्तर दिलंय अंतरेत!

एक डर है मोहे सास-ननंदको,
दूजे देरनिया-जेठनिया सतावे,
निसदिन कर रही हमरी बात!
हे आहे तिचं दु:ख, तिची व्यथा! आणि म्हणून तिला पियाला भेटण्यासाठी पाणवठ्याच्या वाटेचा सहारा घ्यावा लागलाय!!

एक डर हैS मोहे साSस ननंदकोS
गंधारानं सजवलेलं तिचं दु:ख तीव्र मध्यमानं धैवतासोबत वाढवत नेऊन दिलंय तार षड्जाच्या हाती आणि त्यानं मागे वळून मध्य निषादाला सोपवलंय, पण निषादाला ते सहन न होऊन त्यानं तार सप्तकातल्या कोमल रिषभाला हाताशी धरत पुन्हा ते तार षड्जाकडे सुपूर्द केलंय! तिच्या त्या दु:खातली तीव्रता, तिचं ते घाबरणं, घुसमटून रहाणं केवळ स्वरांतून जाणवतं!
दूजे देरनीSया जेठनीSया सताSवे
या सासू-नणंदेची भीती कमी झाली म्हणून की काय, धाकट्या जावा [देरनिया] आणि मोठ्या जावाही [जेठनिया] त्रास देत रहातात.
या ओळीत मध्य निषादानं आळवलेलं दु:ख तार सप्तकातल्या कोमल रिषभानं तार गंधार आणि मध्य निषादासोबत खो-खो खेळत मध्य धैवत, मध्य निषाद, मध्य सप्तकातला तीव्र मध्यम, मध्य गंधार, मध्य सप्तकातला कोमल रिषभ यांच्या वळणावळणानं जात षड्जाच्या झोळीत घातलंय!
निसदिन कर रही हमरी बाSत!
पुन्हा मंद्रातल्या निषादानं मध्यातल्या कोमल रिषभाच्या हातात हात गुंफून, गंधार, तीव्र मध्यम, धैवत, मध्य निषादापर्यंत चढवत नेलेली तिची अगतिक कैफियत तीव्र मध्यमानं मध्य धैवत, गंधार यांच्याशी खो-खो खेळत कोमल रिषभावर आणून पोहोचवली आहे.
धाकट्या तर ठीक आहे, त्यांना काही कळत नाही, पण निदान मोठ्या जावांनी तरी समजून घ्यायला हवंय ना! त्या माझ्याच वाटेनं गेलेल्या असतील ना! पण छे! त्याही [मेल्या!] माझ्याबद्दल कुचुकुचु बोलत रहातात! हे सगळे सगळे भाव त्या सुरावटींनी इतके सुरेख आणि सुरेल मांडले आहेत, की गुंतून जायला होतं त्या बंदिशीत!

          ही बंदिश एक बंदिश न रहाता, केवळ एका रागाचं रूप जाणून घेण्यासाठी शिकलेली किंवा ऐकलेली रचना न रहाता त्या अल्लड वयातल्या त्रासलेल्या पण तरीही उत्साहानं उधाणलेल्या नायिकेची गोष्ट होते! आणि हा सारा त्या स्वरावलीचा खेळ! अतिशय अप्रतिम अशी ही बंदिश इथे ऐकायला मिळेल. ऐका, आणि जाणून घ्या तिची गोष्ट!
http://www.youtube.com/watch?v=v8bOeHRz_Kc

Saturday, January 1, 2011

सकाळनं घडवलेली सकाळ

बुधवार दि. २९-१२-२०१० ची प्रसन्न सकाळ. सकाळची थोडी कामं उरकून गरमागरम चहाच्या घोटाबरोबर पेपर चाळावा, म्हणून हॊलमध्ये आले, तेवढ्यात मोबाईल वाजला.
"हॆलो"
"आपण क्रांति साडेकर बोलताय?"
"हो. आपण कोण बोलताय?"
"मागेन एवढे मी, हातून या घडावे
काही नवे, निराळे अन् जातिवंत आता!
या आपल्या ओळी खूप भावल्या, म्हणून आवर्जून फोन केला."
तेव्हा मला लक्षात आलं की आज बुधवार, सकाळमध्ये गझल-गुंजन या सदराचा समारोप करताना माझी "माझा वसंत" ही गझल निवडली आहे असं पांचाळे काकांनी सांगितलं होतं! सकाळ विशेषमध्ये पाहिलं, तर त्या गझलसोबत मोबाईल नंबरही दिलेला.
"धन्यवाद सर, आपण कोण बोलताय?"
"तुम्हाला लगेचच दाद मिळावी, म्हणूनच मोबाईल नंबर देता ना? मिळाली ना दाद? मग मी कोण आहे हे कशाला कळायला हवं?"
"ही माझ्या काव्याला मिळालेली पहिली दाद आहे, म्हणून आपला नंबर मी सेव्ह करून ठेवेन."
"त्याचं काही एवढं महत्त्व नाही. तुमची गझल माझ्या वाचनात आली, मला ती मनापासून आवडली, तुमचा नंबर होता सोबत, म्हणून मी तुम्हाला फोन केला. बरं, कुठं असता तुम्ही? काय करता?"
"सर, मी नागपूरला बीएसएनएलमध्ये काम करते."
"अच्छा. माझाही बीएसएनएलचा दूरध्वनी आहे. तुम्ही कोणत्या कार्यालयात असता ?"
"सर, मी सक्करदरा कार्यालयात आहे. आपला कोणता एरिया आहे?"
"मी धंतोलीत रहातो." क्षणभर काही अंदाज घेण्याचा प्रयत्न करतेय, तोवर पुढचा प्रश्न आला, "आता माझं नाव सांगू? विश्वास बसेल तुमचा?"
"हो सर"
"मी ग्रेस बोलतोय."
"सर, आपण?" मी अवाक!! काहीही कळत नाहीय मला! चक्क सूर्याची काजव्याला दाद? मी स्वप्नात तर नाही? माझ्या घरातच आहे मी की चंद्रमाधवीच्या प्रदेशात?
"होय, मी ग्रेस बोलतोय. मी कधीही खोटं बोलत नाही, नागपुरात ग्रेस या नावाचा एकुलता एकच माणूस आहे, माझा कुणीही जुळा भाऊ नाही आणि माझी कुठं शाखाही नाही!"
मी काय ऐकतेय, काय बोलतेय, मला काहीही कळत नाहीय.
"सर, मला आपली भेट घ्यायची होती. पण..............."
"पण काय? तुम्ही मला शोधायचा प्रयत्न नाही केला. या गझलच्या निमित्तानं मी तुम्हाला शोधलंय, तुम्ही मला शोधलं नाहीय. मी तुम्हाला मिळवलंय, तुम्ही मला नाही मिळवलं!"
"सर, आपली ही दाद माझ्यासाठी खूप मोठी भेट आहे, आज मी खरंच खूप काही मिळवलंय."
"ते आता तुम्ही पहा! तुमची गझल मला मनापासून आवडली, मी तुम्हाला दाद दिली. मला चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला आवडतं."
"सर, मी नक्कीच आपली भेट घेईन. आपल्या कविता मला खूप आवडतात. मी आपल्या कवितांची वेडी आहे."
"अरे, असं चांगलं लिहिणारी माणसं वेडी नसतात, खूप शहाणी असतात. माझी भेट तुम्ही केव्हाही घेऊ शकता, पण एक आहे, मी कुणाला कवितांसाठी मार्गदर्शन वगैरे करत नाही. तुम्ही या, पण मार्गदर्शन मिळेल ह्या अपेक्षेनं नाही."
"काही हरकत नाही सर."
"आणि तसंही तुमचं काव्य सांगतंय की तुम्हाला या सार्‍या सोपस्कारांची गरजही नाही. कुणाच्या चार ओळींनी किंवा प्रस्तावनेनं कुणाचं काव्य मोठं होत नाही. मुळातच जे चांगलं आहे, त्याला दाद मिळणारच! तेव्हा लिहित रहा, असंच चांगलं, आतून आलेलं, मनापासून लिहा. तुमच्या काव्यप्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा."
"धन्यवाद सर."
"ठीक आहे, आता मी फोन ठेवतो. तुमचा सकाळचा बराच बहुमूल्य वेळ घेतलाय मी." आणि फोन बंद झाला.
मी अजूनही हवेत. हे सगळं जे घडलं, ते खरंच खरं होतं?
या धुंदीतून बाहेर येऊन बहिणीला [स्वातीला] फोन केला, ती बोलते, "सण आहे आज तुझ्यासाठी!"
खरंच! सणच होता तो दिवस! खुळ्यासारखी ही वार्ता लेक, बंधुराज, आई, बहिणी, सगळ्या मित्र-मैत्रिणींना सांगत सुटले आणि स्वत:चंच कौतुक करून घेत राहिले दिवसभर! एखाद्या लहान मुलानं शाळेत मिळालेलं बक्षिस दाखवत सुटावं सगळ्यांना, तस्सं!
स्वत: पांचाळे काका, तुषार जोशी, सुरुची नाईक, रूपालीताई बक्षी, स्मिताताई जोशी, गाण्याच्या क्लासमधल्या मैत्रिणी सगळे सगळे खूश झाले अगदी! विजयाताई मारोतकर म्हणाल्या, "मला तुझा खूप अभिमान वाटतो, आणि माझाही, कारण मी तुझी मैत्रिण आहे!!बघ, जाता जाता जुन्या वर्षानं तुला केवढं मोठं देणं दिलंय!" प्रमोद देवकाकांना जेव्हा हे सांगितलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, "तुझ्या या अनुभवावर एक स्फुट लिही, म्हणजे आपल्या जालावरच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ही आनंदवार्ता कळेल." त्यांनी लगेचच ईसकाळ.कॊम वरचा दुवा शोधून काढला, त्यावर फक्त लेख दिसतोय, गझल दिसत नाही, म्हणून सकाळच्या संपादकीय विभागात फीडबॆकही दिला! नंतर दिवसभर सगळ्या विदर्भातून गझल आवडल्याबद्दल फोन येत राहिले, मेसेज येत राहिले, पण पहिली दाद माझ्यासाठी अमृताचा घोट होती!
या सरत्या वर्षानं मला जाता जाता जे दिलंय, ते खरंच खूप अनमोल आहे, मर्मबंधातली ठेव आहे ती माझी! वयाच्या १४व्या वर्षी प्रत्यक्ष गझलसम्राटाचं, मराठी गझलक्षेत्रातल्या शंकराचार्यांचं, कै. सुरेश भट काकांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन, आणि आज वयाच्या ४८व्या वर्षी मराठी काव्यातल्या ग्रेस नामक वलयांकित, ध्रुवतार्‍यासारख्या अढळ पदावरील व्यक्तिमत्वाचं माझ्यासारख्या कोशातल्या सुरवंटाची दखल घेणं! माझ्या आयुष्याच्या प्रवासातले हे दोन टप्पे म्हणजे मैलाचे दगड ठरले आहेत माझ्यासाठी. मी लिहीत रहावं म्हणून मला सतत प्रोत्साहन देत रहाणारे, प्रसंगी रागावणारे माझे बाबा आणि भट काका आज या जगात नाहीत, पण तरीही या प्रसंगानं ते नक्कीच समाधान पावले असतील!