ती कोण, कुठली, कुणाची काहीच ठाउक नाही. तिचं मी माझ्यापुरतं ठेवलेलं नाव द्रौपदी. तेही तिच्या अवतारावरून. तिच्या अंगावर एक नेसूची साडी असते आणि तीन ते चार साड्या पोटावर बांधलेल्या. त्याशिवाय सोबत असलेल्या कापडी पिशवीत दोन-तीन साड्या असतात. साध्याच जुनेर झालेल्या, विटलेल्या, रंग उडालेल्या त्या साड्या ही तिची दौलत!
तिची माझी पहिली भेट (?) अगदी लक्षात रहावी अशी. रविवारची निवांत दुपार. माझ्या घरातल्या दोन जागा माझ्या सगळ्यात जास्त आवडीच्या. एक तर हॉलमधलं माझं कंप्यूटर टेबल आणि दुसरी म्हणजे दोन चौक पार करणारा वाहता रस्ता जिथून दिसतो, अशा माझ्या किचनच्या खिडक्या. त्या खिडकीतून रविवारचा शांत रस्ता पाहत असताना अचानक बिल्डिंगच्या वॉचमनचा कुणाशी तरी भांडत असल्याचा आवाज आला. खाली लक्ष गेलं तर ही दिसली. नाकी डोळी नीटस, उंचीपुरी, गव्हाळ वर्ण, चेह-यावर कळत-नकळत दिसणारे बारीक डाग [कदाचित देवीचे असावेत], कपाळावर भलं मोठं लालभडक कुंकू, मधल्या भांगात अथपासून इतिपर्यंत भरलेला सिंदूर, हातभर लालभडक काचेच्या बांगड्या, गळ्यात जाड मण्यांची काळी पोत, आता रंग उडालेली पण कोणे एके काळी लग्नातली चुनडी असावी अशी लाल साडी नेसलेली ती बिल्डिंगच्या गेटसमोर असलेल्या हातपंपावर बसून होती. तिनं हातातल्या कापडी पिशवीमधून दोन-तीन साड्या काढल्या होत्या, आणि ती त्या हातपंपावर भिजवत होती. वॉचमनच्या दरडावण्याला जराही भीक न घालता ती अगदी तार सप्तकातल्या वरच्या षड्जात कुठल्या तरी अगम्य भाषेत ओरडत होती. अखेरीस कुणीतरी वॉचमनला समजावलं आणि तो बिचारा आपल्या जागेवर येऊन चुपचाप बसून गेला. पण हिची बडबड अखंड सुरूच होती. आता ती हळूहळू तार सप्तकातल्या पहिल्या "सा" पर्यंत आली होती. एकीकडे साड्या अगदी आपटून धोपटून धुणं सुरू होतं आणि एकीकडे तोंड सुरू! तिची ती भाषा जरी अनाकलनीय होती, तरी भावना लक्षात येण्यासारख्या होत्या. एखाद्या सुनेनं सासूच्या टोमण्याना तोडीस तोड प्रतिसाद द्यावेत, असं काहीसं तिचं ते बोलणं वाटत होतं. हळूहळू स्वर अजून खाली आला. आता नव-याकडे सासूची तक्रार करावी, असं धुसफुसत बोलणं सुरू झालं. आता मध्य सप्तकातल्या मध्यमापर्यंत खालची पट्टी, आणि लेकराची समजूत काढावी, तसा काहीसा भाव.
मधेच तिनं गाणं सुरू केलं. तिच्या त्या जाड्या भरड्या आवाजातलं ते गायन अगदी सुश्राव्य नसलं तरी फारच बेसूरही नाही वाटलं. कधी त्या सुरांनी "अबके बरस भेज भैया को बाबुल" च्या माहेरासाठी आसुसलेल्या सासुरवाशिणीची आठवण करून दिली तर कधी "चंदामामा दूर के, पुएँ पकाए बूर के" च्या लडिवाळ गोष्टी सांगितल्या. काही अल्लड सूर "पड गए झूले सावन रुत आई रे" च्या स्मृती जागवत सख्यांच्या मस्तीभ-या जगातही घेऊन गेले. एक तर हीर होती "डोली चढ़तेही वीरने बैन किये, मुझे ले चले बाबुल ले चले वे!" काहीशी भोजपुरी, काहीशी राजस्तानी, अवधेची मैथिली थोडीशी पंजाबी अशा काही भाषांच मिश्रण होतं तिच्या बोलण्यात आणि गाण्यात.
सुमारे तासभर तिचं धुणं सुरू होतं अगदी मनापासून. कुण्या जन्माचं कर्म धूत होती, देव जाणे! मग तिनं एकेक साडी जिन्याच्या कठड्यावर अगदी व्यवस्थित वाळत घातली. कपाळावरच्या कुंकवाच्या टिळ्याला जराही फिकट न होऊ देता स्वच्छ चेहरा धुतला, हात-पाय धुतले आणि साड्या सुकेपर्यंत त्याच बडबडीची पहिल्यापासूनची उजळणी करत उन्हात बसली. साड्या थोड्याशा सुकल्यावर दोन-तीन साड्या व्यवस्थित घडी घालून पिशवीत भरल्या, बाकीच्या तीन-चार साड्या पोटावर पंचा गुंडाळावा, तशा गुंडाळल्या आणि हातपंपाचं पाणी पिऊन ती तिथून निघाली. जातानाही तिची केसेट सुरूच होती!
ती गेली आणि पूर्ण वेळ तिचा तो समारंभ पहाणा-या माझ्या मनात प्रश्नांचं मोहोळ उठलं. ती कोण असेल, कुठली असेल? तिच्या घरी कोण कोण असेल? ती अशी घरादारापासून दूर, एकटी, एकाकी, उन्मनी अवस्थेत का फिरत असेल? असं काय घडलं असेल तिच्या आयुष्यात की ती ............................ फक्त प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! त्यांची उत्तरं शोधायची कुठे आणि कुणी? ती तर निघूनही गेली, पण मी उगाचच तिच्यात गुंतून गेले!
पुन्हा एखाद्या महिन्यानंतर ती आली, तशीच रविवारी दुपारी. पुन्हा तिचा तोच धुण्याचा कार्यक्रम आणि तीच "गीतोंभरी कहानी"! आणि मीही तशीच तिच्या हालचाली बारकाईने न्याहाळत आणि तिच्या कहाणीत गुंतून जात उभी. जवळजवळ वर्षभर तिचे रविवार चुकले नाहीत, आणि माझेही!
अलीकडे चार-पाच महिन्यांत ती आली नाही. मी मात्र तिच्यातून स्वत:ला अजून बाहेर काढू शकले नाहीय. कुठे गेली असेल ती? काय झालं असेल तिला? तब्येत तर ठीक असेल ना तिची? तिला या जागेची आठवण होत असेल की नाही? कुठे रहात असेल ती? असेल तरी की नसेलही?
ती तर जशी अदृश्य झालीय, पण माझ्यासाठी कितीतरी अनुत्तरित प्रश्न ठेऊन गेलीय!