Sunday, October 23, 2011

दिवाळी पहाट



अजून झुंजुमुंजू झालेलं नाही, सरता अंधार गोधडीत गुरफटून झोपवतोय आणि आजीचा मऊ सायीचा हात गालावरून फिरत गुदगुल्या करतोय, ती म्हणतेय, “उठा आता चिऊताई. तिकडे मंदिरात विठू वाट पाहतोय तुमची. काकड्याला जायचंय ना?” काकडा म्हटलं की झोप पळून जाते कुठल्या कुठे. आजीच्या लुगड्याची मउशार गोधडी बाजूला सारून टुणकन उडी मारून एक एक करत सगळ्या –चिमणे-चिमण्या उठतात आणि परसातल्या चुलाण्याच्या उबेत बसून मुखप्रक्षालन, स्नानादि नित्यकर्मे उरकून निघतात आजीसोबत मंदिरात. कुणी फुलांची परडी घेतलीय, कुणी रांगोळीचा डबा, कुणी कुंकवाचा करंडा, कुणाच्या हाती तेलवातीची समई तर कुणी तुपाचं निरांजन. सगळी वरात मंदिरात पोहोचतात, विठ्ठलाची काकडआरती, अभ्यंगस्नान, साग्रसंगीत पूजा होते. “काकडा झाला, हरीचे मुख प्रक्षाळा” च्या सुरात चिमणे सूर मिसळतात, मंदिराच्या पायऱ्यांपासून ते सभामंडपात रांगोळ्यांच्या सजावटी होतात, तीर्थ-प्रसाद घेऊन घर गाठेपर्यंत सूर्यनारायण पडद्यातून डोकावणाऱ्या चिमुकल्यासारखे हळूहळू दर्शन देत असतात.
घरी येताच मावश्या-मामीने सगळी जय्यत तयारी केलेली असते, ताज्या गोमयाने सडा-सारवण झालेलं असतं, त्याचा गंध घरभर घुमत असतो. आजोबांनी भल्या मोठ्या देवघरात दाटीवाटीनं बसलेल्या देवांना अभ्यंगस्नान घालायला सुरुवात केलेली असते. परसबागेतल्या प्राजक्त, गोकर्ण, बकुळी, जाई-जुई, सोनचाफा, देवचाफा, गणेशवेल, जास्वंद अशा विविधरंगी फुलांनी भरलेली भली मोठी पितळी परडी सोन्यासारखी चकाकत असते. पूजा, आरती, नैवेद्य सगळं साग्रसंगीत झालं की आजोबा ओसरीत आले की स्वयंपाकघरात फराळाच्या बशा भरायची लगबग सुरू होते. चकल्या, चिवडा, चिरोटे, करंज्या, कितीतरी प्रकारचे लाडू, शंकरपाळे, कडबोळी यांसोबतच काहीतरी गरम हवंच, म्हणून खमंग सांजा भाजला जात असतो.
इकडे ओसरीत घातलेल्या बैठकीवर काकाआजोबा सूर लावत असतात मनातल्या मनात. मग आजोबांचा भरदार आवाज घुमतो, ‘हं दिवाकरा, होऊन जाऊ दे!’ काकाआजोबा वाटच पहात असतात. ते आपल्या सुमधुर आवाजात गायला लागतात “ऊठ पंढरीच्या राजा, वाढवेळ झाला | थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला’ आणि सुरू होते एक सुरेल, अमृतहुनी गोड दिवाळी पहाट! आकाशपटलावर उमटलेला बालरवी, वाऱ्याच्या वेणूचे सुगंधी सूर, कडेवर सोन्यासारखी चकाकणारी घागर घेऊन उभी असलेली चंद्रभागा, हाका देणारा पुंडलीक, हाती निरांजन घेऊन आरतीसाठी वाट पाहणाऱ्या राही-रखमाबाई हे चित्र डोळ्यांपुढं उभं करणारं ते अप्रतिम गीत अगदी हुबेहूब साकारावं तर काकाआजोबांनीच! तोवर फराळाची सिद्धता करून महिलामंडळ ओसरीत आलेलं असतं आणि आता मोहरा असतो माईमावशीकडे. ‘मायबाई, चला, आता तुमची सेवा रुजू करा.’ आजोबांनी सांगितलं की माईमावशी तिचं सगळ्यांत लाडकं गाणं सुरू करते, ‘चल ऊठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली | बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली’ मंदावलेला शुक्रतारा, हळूच येणारा मंद पहाटवारा एक एक चौकट जिवंत होतेय! माईमावशीचा राजूदादा हळूहळू चेष्टेच्या मूडमध्ये येतो. तिचं गाणं संपलं की ‘एक मिनिटाच्या विश्रांती’सारखा तो बोलतो, ‘हो, त्या कधीच न झोपणाऱ्या देवाला मारे गाणी म्हणून जागवा आणि मी झोपलो तर ‘गधड्या, उन्हं तोंडावर आली, तरी उकीरड्यावर गाढव लोळावं तस्सा लोळत पडलास! उठतोस की ओतू पाणी तोंडावर?’ असं बोलून उठवा!’ यावर सगळेच हसायला लागतात. अप्पांना तोंडातला चिवड्याचा बकाणा सावरत हसणं कठीण होतं. मामाला हसता हसता ठसका लागतो. आजोबा माईमावशीला म्हणतात, ‘मायबाई, उद्यापास्न त्याला पण गाणं म्हणून उठव बरं!’ कसाबसा चिवडा घशाखाली उतरवून मोकळे झालेले अप्पा त्यावर म्हणतात, ‘दादा, तो झोपेच्या बाबतीत इतका बेशरम आहे की भूपाळीला अंगाई समजून अजून हातपाय ताणून पसरेल!’ अजून एकदा हास्याचे फवारे उडतात आणि मग नसलेला माईक जातो अप्पांकडे. अप्पांचं दैवत कुमार गंधर्व! ते आपल्या दैवताचं स्मरण करून गायला लागतात, ‘मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला | स्वीकारावी पूजा आता, उठि उठि गोपाळा’ एकसुरात सगळेच कोरस देतात. आप्पा एकलव्याच्या एकाग्रतेनं गुरुमूर्ती डोळ्यांपुढे आणून एकतान होऊन गातात ‘रांगोळ्यांनी कडे सजविले रस्त्यारस्त्यांतुन | सानपाउली वाजती पैंजण छुनूछुनू छुनछुन’ सुरांच्या संगतीत दिवाळी पहाट उजळत जाते.
आता नंबर लागतो नव्यानंच गृहप्रवेश केलेल्या मामीचा. सात बहिणींचा एकुलता एक लाडका भाऊराया आणि त्याची त्याच्यापेक्षा जास्त लाडकी सहधर्मचारिणी. मामा सुरू करतो ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला | उठि लवकरि वनमाळी, उदयाचळी मित्र आला’ त्याच्या सुरात सूर मिळवून येणारा मामीचा सुरेल आलाप ऐकून कान-मन तृप्त होतात! ‘आनंदकंदा प्रभात झाली’ वर सगळ्यांच्या माना डोलत असतात. गोठ्यातली सगुणा गाय, तिचा चिमुकला गोऱ्हा रवंथ विसरून स्वरमोहिनीत गुंगले आहेत. पाखरांची किलबिल सुद्धा शांत झालीय आणि तीही दाणे टिपायचे सोडून सूर टिपताटिपता आस्वाद घेताहेत या रम्य पहाटेचा! मग पुन्हा एक छोटीशी विश्रांती. शेंडेफळ विद्यामावशीची अनन्या आजोबांच्या शेंडीशी खेळत त्यांना विचारते, ‘आजोबा, पण देव तर कधीच झोपत नाही, असं आजी म्हणते ना! मग त्याला जागं कशाला करायचं?’ सुलूमावशीचा मन्या पण तिची री ओढतो, ‘हो ना. देव कुठे झोपतो?’ मग आजोबा समजावतात, ‘अरे मुलांनो, आपल्यासाठी देव म्हणजे आपला सखा-सोयरा असतो. तो कुणी खूप कडक, रागीट पंतोजी नसतो. म्हणून आपण जे करतो, ते सगळंच देवही करतो असं आपण समजतो. देव पवित्र असतो ना, मग तरीही आपण त्याला अंघोळ घालतो ना? तो खात नाही, तरी त्याला नैवेद्य देतो ना? तसंच हे झोपवणं आणि जागवणं असतं. चला, आता आपण सुलूची भूपाळी ऐकू या.’ सुलूमावशी इतकी अप्रतिम गाते, की संधी मिळती तर आकाशवाणीवर गेली असती! तिची लाडकी भूपाळी ‘जाग रे यादवा कृष्ण गोपालका | फिकटल्या तारका, रात सरली’ पुन्हा एकवार सूर मनाचा ताबा घेतात. ‘उठुनी गोपांगना करिती गोदोहना | हर घरी जणू सुधाधार झरली’ ही सुधाधार सगुणेच्या कासेतून झरतेय, दुर्पदा तिची धार काढतेय गोठ्यात. सुरांच्या धारांनी तृप्त झालेली सगुणा नेहमीपेक्षा जास्त दूध देते!
खोटाखोटा माईक आता बाबांच्या हातात येतो. ‘ऊठ ऊठ पंढरीनाथा, ऊठ बा मुकुंदा | ऊठ पांडुरंगा देवा, पुंडलीक वरदा’ बाबांच्या आवाजात एक आर्तता आहे. असं वाटतंय की आत्ता तो पांडुरंग समोर येऊन उभा ठाकेल! ‘देह भाव मिळुनी केला काकडा मनाचा | निघुन धूर गेला अवघ्या आस वासनांचा | ज्ञानज्योत चेतविली ही उजळण्या अवेदा’ काही कळत नाहीय शब्दांतलं, अर्थातलं पण एक विलक्षण अनुभव घेतंय मन! ही शब्दांची की स्वरांची मोहिनी कळत नाही, प्रवाहात वहात जाताहेत सगळेच! सरूमावशी आईला इशारा करते आणि आई संत सखुबाई होऊन गायला लागते, ‘ऊठ बा विठ्ठला ऊठ रखुमापती | भक्तजन ठाकले घेउनी आरती’ दारी वाजणारा चौघडा, घडा घेऊन आलेली चंद्रभागा, लालिम्यात आकारलेला अरुण, विठूच्या कंठ्यात कौस्तुभात पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब सजीव रूपात दिसायला लागतं. आणि शेवटी ‘जाग मनमोहना, नीज घ्यावी किती’ हा लाडिक प्रश्न! ही पहाट सरूच नये असं वाटतं!
राजूदादाला पुन्हा चेष्टा करायची हुक्की येते. ‘अरे, तो विठू कधीच उठला. आता बाकीच्या देवांना उठवा ना!’ मामाही त्याची री ओढतो, ‘अरे खरंच ना. तेहतीस कोटी देव आहेत ना आपल्याकडे. मग एकट्या विठूच्याच मागे का लागताय सगळे?’ हास्याचे कल्लोळ उसळतात, आणि ते सरायच्या आधीच सरूमावशी मैफलीचा ताबा घेते, ‘उठी श्रीरामा पहाट झाली, पूर्वदिशा उमलली | उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माउली’ चराचराला जिंकून घेत अरुणप्रभा उजळलेली असते आतापर्यंत. फराळाचा जवळजवळ फज्जा उडालेला असतो आणि आजी खरंच सगळ्यांसाठी धारोष्ण दुधाचे पेले घेऊन आलेली असते. तिचा सूर अजून आलेला नसतो मैफलीत. सगळे आजीच्या मागे लागतात. आजी सरळ सूर्यालाच उठवते. ‘उठा उठा हो सूर्यनारायणा | थांबली सुवासिनी पूजना’ आजीचा आवाज आसमंतात घुमतो. आजीचं गीत रंगत जातं, तसंतसं आभाळही रंगत जातं. किरणहार गुंफत सूर्यनारायण आकाशात अवतरतात. मीनामावशीच्या बाळाच्या जावळासारखी कोवळी उन्हं अंगणात नाचायला लागतात. मग त्या चिमुकल्याचं पार्सल आजीकडे सोपवत मीनामावशी मैदानात उतरते. ‘उठि गोविंदा उठि गोपाला उष:काल झाला | हलके हलके उघड राजिवा नील नेत्रकमला’ जसं काही हे गाणं त्याच्यासाठीच असावं, अशा थाटात आजीच्या मांडीवर हालचाली सुरू आहेत. इवलं गाठोडं हळूहळू डोळे उघडून इकडेतिकडे बघतंय. आईचा आवाज कानात भरून घेतंय. ‘गोठ्यामधले मुके लेकरू पीत झुरुझुरू कामधेनुला | किती आवरू भरला पान्हा, हसली अरुणा तव आईला’ हसत हसत आजी मीनामावशीचा कान्हा तिच्याकडे सोपवते, तो चिमुकल्या ओठांनी चुरुचुरु पान्हा रिता करतो. आजीच्या डोळ्यांत कौतुक ओसंडून वाहतंय.
कुंदामावशीची अर्चना नुकतीच गाणं शिकायला लागलीय. तिचा वाढदिवसही दिवाळीत येतो. यावर्षी तिला दिवाळीची आणि वाढदिवसाची भेट म्हणून सगळे मिळून बाजाची पेटी घेऊन देणार आहेत. दरवर्षी प्रत्येक नातवंडांच्या वयाप्रमाणे पुस्तकांची भेट मिळते आजोळाहून. मला यावर्षी गाण्यांची पुस्तकं मिळणार आहेत. ती गाणी पाठ करून पुढच्या वर्षीच्या दिवाळी पहाटेला म्हणायची आहेत. अर्चनाला आग्रह सुरू आहे गाण्याचा. ती थोडी बावरतेय, पण सगळी मंडळी घरचीच आणि कौतुक करणारी. ती माणिक वर्मांची पंखी आहे. त्यांची गाणी तिला जिवापाड आवडतात. ती दबक्या आवाजात आलाप घेत हळूहळू मोकळी होतेय, ‘ऊठ राजसा घननीळा | हासली रे वनराणी’ यमुनेचा गार वारा जसा काही येतोय झुळझुळ करत अंगणात! गोकुळ जागं झालंय, पाखरं किलबिल करायला लागलीत. ‘उडे थवा पाखरांचा गात गात मंजुळ गाणी’ या मंजुळ गाण्यांनी वातावरण भारून गेलंय. अर्चनानं सुरेख गाऊन टाळया मिळवल्या आहेत, ‘हिच्या गाण्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हं’ असं कुणी जाहीर न करताही!
भल्या पहाटे उठल्यानं थोडीशी आळसावलेली मी काकीआजीच्या मांडीवर डोकं ठेवून पाय पसरते. ‘अरे दिवाकरा, तू सुरुवात केलीस, पण तुझी अर्धांगिनी राहिलीच ना!’ आजोबांनी आठवण करून दिल्यावर सगळे काकीआजीकडे वळतात.  ‘हो की ग वीणा, तू कशी विसरलीस? म्हण बरं तुझी आवडीची भूपाळी.’ आजी म्हणते. काकीआजी माझ्या केसांतून हात फिरवत गायला लागते, ‘ऊठ राजसा, उठी राजिवा अरुणोदय झाला | तुझियासाठी पक्षिगणांचा वाजे घुंगुरवाळा’ काकीआजीचा आवाज काय सुरेल आहे! नावासारखीच आहे काकीआजी, सूरमयी! विंझणवाऱ्याचा ताल वाजतोय, हसऱ्या उषेचे पैंजण रुणुझुणू घुमताहेत. काकीआजी अप्रतिम गातेय. ‘बालरवीचे किरण कोवळे | दुडूदुडू येतील धावत सगळे | करतिल गालावरती तुझिया मोरपिसांचा चाळा’ माझ्या गालावर काकीआजीचा पदर असाच मोरपिसासारखा फिरतोय. आणि कानात तिचा सूर. धन्य झालेत सगळे!
‘अग मंदाताई, तो गणपती राहिलाय ना अजून उठायचा. तुझी भूपाळी ऐकल्याशिवाय उठणार नाही म्हणून हटूनच बसलाय बघ.’ मामा मंदामावशीला कोपरखळी मारतो. ‘अरे, उठला नाही, तर बसेल कसा? हटून लोळतोय म्हण हवं तर!’ बाबांच्या या बोलण्यावर पुन्हा एकवार हास्याची कारंजी उडतात आणि मंदामावशी आळवून उठवते गणपतीला. ‘तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती | अरुण उगवला प्रभात झाली ऊठ महागणपती’ देवघरातल्या गणेशाच्या मूर्तीवर चढवलेलं लालभडक जास्वंदाचं फूल रक्तवर्ण कमळ भासायला लागतं तर हिरव्यागार ताज्या दुर्वांची जुडी पाचूच्या किरणांसारखी दिसते. याक्षणी चौदा विद्या इथं आरती घेऊन उभ्या आहेत आणि सगळा देवलोक या घरावर छत्रछाया धरून आशिर्वादाचं अमृत शिंपतोय असं काहीसं वाटतंय. ही दिवाळी पहाट आयुष्यभर संपूच नये, असंही मनात येतंय. पण आता समाप्ती करायला हवीय. संध्याकाळी लक्ष्मीपूजन आहे, त्याची तयारी करायची आहे सगळ्यांना. महिला मंडळ स्वयंपाकाच्या तयारीला लागेल. आम्ही मुलं मळ्यातून आणलेल्या झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांची सुंदर तोरणं करायला लागू. सगळी बाबा मंडळी बाकीची कामं करतील, आजोबांसोबत मळ्याची चक्कर मारतील. मामा आणि राजूदादा फटाके आणायला जातील. लक्ष्मीपूजन आणि संध्याकाळची जेवणं झाली, की दिवाळी पहाटेसारखीच संगीतरजनीची पर्वणी साधायची आहे ना!
दरवर्षी येणारी दिवाळी आजोळच्या या दिवाळी पहाटेच्या आठवणींचा खजिना घेऊन येते, जो वर्षानुवर्षे रिता होणार नाही. या सगळ्या भूपाळ्या आनंदाचा अनमोल ठेवा आहे, जो साथ देईल अखेरच्या श्वासापर्यंत! ते सूर घुमत राहतील मनाच्या घुमटात पारवा घुमावा तसे. आज त्यातले कितीतरी सूर कुठे दूरवर गेले आहेत, पण त्यांच्या स्मृती आजही काळाच्या नजरेपासून लपवल्या आहेत मनानं. शिंपल्यात मोती रहावा, तशा काळजाच्या मखमली पेटीत राहिल्या आहेत त्या, कधीच न विसरण्यासाठी.

[पूर्वाप्रकाशन - जालरंग प्रकाशनाचा ई-दिवाळी अंक दीपज्योती २०११]