Thursday, December 30, 2010

संध्याछाया भिवविती हृदया

मराठी कविता ही प्रत्येक मराठी मनाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मुळात कळायला लागायच्याही आधीपासून, अगदी डोळे उघडल्यापासून आईची, आजीची, अंगाई, मावशीची, आत्याबाई, काकू यांची कौतुकाची बाळगाणी इथूनच मराठी मनाची कवितेशी तोंडओळख होते. कधी निंबोणीच्या झाडामागे झोपलेला चंद्र खुणावतो तर कधी पापणीच्या पंखात स्वप्नांची पाखरं झोपतात. बाळाची झोप झाल्यावर अंघोळ घालताना गंगा-यमुना-भागीरथी गाणी गात बाळाला रिझवतात.
अडगुलं-मडगुलं, सोन्याचं कडगुलं,
रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा तीट लावा
असं गात गात बाळाचा नट्टापट्टा केला जातो, घास भरवताना काऊ-चिऊ, मनीमाऊ, गोठ्यातली गाई-वासरं सार्‍यांना गोळा करून खेळीमेळीत अंगतपंगत केली जाते. हा गीतसोहळा असा प्रत्येक प्रसंगाशी बांधलेला असतो जसा काही! म्हणूनच बालपणापासून मराठी माणूस आणि कविता यांचं अतिशय अतूट असं नातं आहे. हे सगळं कौतुक सांगायचा उद्देश एवढाच, की लहानपणापासून ऐकलेल्या, शिकलेल्या, वाचलेल्या असंख्य कवितांपैकी काही कवितांशी आपलं इतकं सख्य जुळून जातं, की कुठेही, कधीही ती कविता आपल्या मनात रुंजी घालत रहाते. अगदी जिवाभावाची सखी होते ती कविता आपली.

माझी अशी सखी असणारी कविता आहे कविवर्य भा. रा. तांबे यांची "रिकामे मधुघट" ही! जशी कवितेशी पहिल्या दिवसापासून नाळ जुळलेली, तशीच गाण्याशीही जुळल्यामुळे लताबाईंच्या सुमधूर आवाजात ती सतत ऐकलेलीच होती, आणि जुन्या एसएससीच्या कुठल्याशा अभ्यासक्रमाच्या क्रमिक पुस्तकातही ती होती. माझे बाबा जुन्या एसएससीचे मराठी, इतिहास, भूगोल या विषयांचे क्लास घ्यायचे घरी. त्यावेळी बाबांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना ही कविता समजावून दिली होती आणि तिचं जे रसग्रहण, निरूपण केलं होतं, ते त्या लहान वयात म्हणजे साधारणपणे ६ ते ७ वर्षाच्या वयात जे डोक्यात बसून गेलंय, ते आजही तिथंच, तस्संच आहे! तसं तर ते वय या गोष्टी कळायचं नव्हतंही, पण कळत्या वयात तो अर्थ इतका भिनून गेला, की आजही "मधु मागसी माझ्या सख्या परी" हे गाणं कुठेही लागलं की डोळ्यांसमोर येतो बाबांचा तो क्लास, ते अगदी एकतान होऊन कविता समजावून सांगणारे बाबा, ते तल्लीन होऊन ऐकणारे विद्यार्थी आणि ते निरूपण!

भा. रा. तांबे यांच्या कविता कितीतरी विषयांना स्वत:त सामावून घेणार्‍या! अगदी प्रेम, भक्ती, जीवनाचं सार, नाती, निसर्ग, मानवी प्रवृत्ती असा मोठा आवाका आहे त्या काव्याचा. पण त्यांचा स्वत:चा अतिशय आवडता विषय म्हणजे मृत्यू! या विषयावर त्यांच्या बर्‍याच कविता दिसतात. "जन पळभर म्हणतील हाय हाय" "मरणात खरोखर जग जगते" आणखीही कितीतरी! "रिकामे मधुघट" ही कविता जरी त्या विषयावरची नसली, तरी जवळपास जाणारी, त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीची. ती प्रेमकविता नाही, तर आयुष्याचं अद्वितीय तत्वज्ञान सांगणारी, कलावंताची तळमळ, कळकळ, अगतिकता दाखवणारी ती कविता आहे! आणि उतरत्या काळातल्या प्रत्येक कलावंताचीच ती कहाणी आहे! त्या काळात कुणी मित्र सहजच त्यांना म्हणाला होता, "तांबेजी, बर्‍याच दिवसांत तुम्ही काही नवीन लिहिलं नाहीत, तुमच्या नवनव्या रसभरीत कविता ऐकायची, वाचायची इतकी सवय लागलीय मनाला, ऐकवा ना काहीतरी नवं!" यावरचं उत्तर म्हणजे हे उत्कट काव्य!

मधु मागसी माझ्या सख्या परी
मधुघटचि रिकामे पडती घरी!
सख्या, अरे तू काव्याचा, कल्पनेचा, नाविन्याचा मध मागतोयस खरा, पण या मनात आता नवीन काही येत नाहीय रे! काहीच सुचत नाहीय! कल्पनेच्या मधाच्या घागरी जशा रिकाम्या पडल्या आहेत! एका कलावंताची ही विलक्षण खंत आहे. उतारवयात नवं काहीतरी करण्याचा अट्टाहास कशासाठी?

आजवरी कमलाच्या द्रोणी
मधू पाजिला तुला भरोनी
सेवा ही पूर्वीची स्मरोनी
करी न रोष सख्या, दया करी!
किती हा विनय, किती ही समर्पणभावना! रसिका, आजवर तुझ्यासाठी खूप सुंदर सुंदर काही लिहिलं, खूप काही दिलं तुला, विविध प्रकारांनी तुला हव्या त्या पद्धतीनं मांडणी केली, तुझी मनोभावे सेवा केली ती लक्षात घे आणि आता मला काही जमत नाहीय, याचा राग नको धरूस रे मनात! एवढी दया कर माझ्यावर! [आठवला गुरुदत्तजींचा "कागज़ के फूल"? तसेच त्यांचे स्वत:चे शेवटचे दिवस? स्व. गीता दत्त यांनीही सचिनदांना फोन करून म्हटलं होतं, "दादा, आप तो हमें भूल ही गए!" आणि मग त्यांनी कनू रॊय यांच्या संगीतनिर्देशनातील "अनुभव" चित्रपटातली "कोई चुपकेसे आके" आणि "मुझे जा न कहो मेरी जां" ही दोन गाणी त्यांना दिली होती.] पडत्या काळात कलावंताचा हाच अनुभव असतो का? आणि तोही प्रत्येक क्षेत्रात? तो अनुभव तांब्यांच्या या चार ओळीत किती सहजी व्यक्त झालाय!

नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठी
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशी तरी!
सगळं काही संपलंय रे आता! अगदी मोजकंच उरलंय आयुष्य! पूर्वीचं सारं सारं काही सरलंय! सारा मान-सन्मान, हारतुरे, तो दिव्यांचा लखलखाट सगळं विसरलोय मी. आता फक्त माझं, माझ्यापुरतं राहिलंय आयुष्य! रसिकाला देव मानणार्‍या या कलावंताजवळ आता मधुमधुर काही उरलं नाहीय, केवळ इवलीशी दुधाची वाटी आहे नैवेद्यापुरती या रसिकदेवतेसाठी! या उरल्यासुरल्या दिवसांत जे काही सुचेल ते, सुचेल तसं तुला द्यायचा प्रयत्न करतोय, ते गुलाबासारखं डौलदार, मोगर्‍यासारखं सुगंधी नाहीय, तर विनासायास कुठंही उगवणार्‍या आणि दुर्लक्षितपणे फुलत रहाणार्‍या कोरांटीसारखं आहे. पण कोरांटी जरी दुर्लक्षित असली तरी तिचं हे वैशिष्ट्य आहे, की ती देवपुजेला चालते! म्हणजेच रसिकाला देव मानून या कलावंतानं हे आर्जव केलंय की जे काही मी या शेवटच्या दिवसांत तुला देतोय, ते थोडं कमी दर्जाचं असेल, पण टाकाऊ नक्कीच नाही! अरे, देवासाठी का कुणी काही टाकाऊ देतं? तेव्हा तेही तू सांभाळून ठेव, कसंतरी का होईना, पण सांभाळ! देवाला नैवेद्य दाखवणं महत्वाचं, मग तो अगदी पंचपक्वानांचा असो, की घोटभर दुधाचा!

तरुणतरुणिंची सलज्ज कुजबुज
वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज
संसाराचे मर्म हवे तुज
मधु पिळण्या परी बळ न करी!
तांब्यांच्या कवितेत काय नाहीय? प्रेमकाव्य आहे [डोळे हे जुल्मी गडे, नववधू प्रिया मी], निसर्गसौंदर्य [पिवळे तांबुस ऊन कोवळे]. भक्ती [भाग्य उजळले तुझे चरण पाहिले], जीवनविषयक तत्वज्ञान [जन पळभर म्हणतील, कळा ज्या लागल्या जीवा, घन तमी शुक्र बघ राज्य करी]
काय नाही दिलंय मी तुला रसिका? प्रेम दिलं, निसर्गाचं कौतुक दिलं, संसाराचं, जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं, आता मात्र तू यातलं काहीही मागू नकोस! रसिक म्हणून तुझा माझ्यावर हक्क आहे खरा, पण आता तो गाजवू नकोस, एवढीच विनंती!
जोरजबरदस्तीनं उतारवयात कलाकारानंही लोकांना आवडेल म्हणून किंवा नाव रहावं म्हणून काहीही वाटेल ते करू नये, रसिकानंही त्या कलावंताकडून तशी अपेक्षा करू नये आणि त्याचं हसं करू नये, त्याला सन्मानानं निवृत्त होऊ द्यावं ही कळकळ या शब्दांतून कवींनी व्यक्त केलीय, आणि ती कालातीत आहे, आजही ती समर्पक आहे! [तलत मेहमूद यांच्या रेशमी आवाजातलं "बेचैन नजर बेताब जिगर" हे यास्मीन चित्रपटातलं गीत पूर्वी रेकॊर्ड झालेलं आणि नंतर कधीतरी त्यांनी गाइलेलं यातला फरक दर्दी रसिकाला अगदी चटकन जाणवतो, आणि मग लगेच "अरेरे" नाही तर "छे, हे काहीतरीच वाटतंय" असे उद्गार निघतात त्याच्या तोंडून!] ही वेळ रसिकानं आपल्या आवडत्या कलाकारावर आणू नये, हेच कवींचं सांगणं असेल ना?

ढळला रे ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविती हृदया
अता मधूचे नाव कासया
लागले नेत्र रे पैलतिरी!
अरे, आता माझे दिवस संपले! सांज आलीय आयुष्याची! त्या लांबत जाणार्‍या सावल्या भीती दाखवतात रे! त्या हेच सांगतात की तुझी सद्दी संपली! आता मधाची अपेक्षा नकोस करू माझ्याकडून! तारुण्यात जे काही उत्तम, गोड, सुंदर, मधुर देता आलं तुला माझ्या कलेच्या माध्यमातून, ते सारं काही दिलं, पण आता आयुष्याच्या उतरणीवर अशी काही अपेक्षा ठेवू नकोस रसिका! अरे, आता मला पैलतीर खुणावतोय! तिकडे जायचे वेध लागले आहेत! आता उरलेलं आयुष्य ईशचिंतनात घालवू दे मला, काहीतरी भलतं नको मागू सख्या!

डोळ्यांत पाणी आणणारी ही अप्रतिम काव्यरचना केवळ एका कवीच्या आयुष्यापुरती मर्यादित नाही, तर ती जवळजवळ प्रत्येक कलाकाराची मनोव्यथा आहे.  अर्थात अखेरच्या श्वासापर्यंत रंगमंच गाजवणारे विठ्ठल उमपही असतात पण ते एखादेच, वयाच्या सत्तरी-पंचाहत्तरीतही आपल्या आवाजाच्या मोहिनीनं जनतेला वेड लावणार्‍या लताबाई-आशाबाईंसारख्या देवकन्या रोज रोज येत नसतात या विश्वात! कोणे एके काळी अगदी डोक्यावर घेऊन नाचणारा रसिक उतरत्या काळात विदूषकी भूमिका करून पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करणार्‍या कलाकाराला संपूर्णपणे दुर्लक्षित करतो, कधी त्याची कीव करतो तर कधी त्याचं नावही विसरून जातो, त्याला बदनाम करायलाही मागेपुढे पहात नाही! यात त्या रसिकाची काही चूक नाही, ही समस्त मानवजातीची मानसिकताच आहे.  त्यामुळे त्या कलाकारानंच आपलं हसं करून घेण्यापूर्वी मानानं निवृत्ती स्वीकारावी. आणि रसिकानंही त्याला बाध्य करू नये तसं करायला. कदाचित याला कुणी पलायनवाद म्हणेल, कुणी हार म्हणेल त्या कलावंताची. पण आपली पत ठेवून सन्मानानं जगणार्‍या कलावंतासाठी ही कविता नक्कीच एक प्रेरणा आहे!

Sunday, September 5, 2010

तिचं प्राजक्ती स्वप्न


पुन्हा गौरी-गणपतीचे दिवस आले, सगळीकडे हिरवाई, उत्साह, उल्हास, जल्लोष घेऊन. पण तिच्या मनाची एक जुनी जखम, बुजली असेल असं वाटता वाटता खपली निघून पुन्हा भळभळून वहायला लागली. कुठल्याही चुकीशिवाय, कारणाशिवाय कुणीतरी केलेली जखम! तशाही मनाच्या जखमा ब-या होतच नसतात म्हणा! काळ हे सगळ्या वेदना, व्यथा, दु:खांवरचं औषध असतं, असं म्हणतात खरं. पण काही वेदना या कालातीत असतात.

हेच ते दिवस, ज्यावेळी तिची सहज साधी इच्छा पूर्ण करण्याच्या नादात तिला ही जखम मिळाली, भेट म्हणून! हो, भेटच म्हणायला हवी. कारण नंतर याच जखमेतून उमललं एक सुंदरसं स्वप्न! या स्वप्नानं तिला भरभरून सुख दिलं, जगायचं बळ दिलं, स्फूर्ती दिली. प्राजक्तासारखं टवटवीत, प्रसन्न, मंद सुगंध उधळत रहाणारं स्वप्न!

तरीही हे दिवस आले, आणि ती सैरभैर झाली. तिच्या जिवाची वाट चुकलेल्या वासरासारखी घालमेल होतेय. कशाकशात मन लागत नाही, सगळं चुकत चुकत जायला लागलंय! लहान मुलाच्या हातातून त्याचं आवडतं खेळणं काढून घेतल्यावर त्याची जी अवस्था होते, तसं काहीसं झालंय तिच्या मनाचं. ती अस्वस्थ होतेय घायाळ हरिणीसारखी. तिचं मन मुक्यानंच आतल्या आत रडतंय.

आणि अशा वेळी ते सुगंधी प्राजक्ती स्वप्न हळूच येतं, तिच्या खुळ्या मनाला गोंजारतं, तिची समजून काढतं. कल्पनेत रमायचं, पण वास्तवात, वास्तवाचं भान ठेवायचं याची जाणीव तिला हळुवारपणे करून देतं. तिच्या जुन्या जखमेवर फुंकर घालतं आणि मग कुठं ती पुन्हा भानावर येते, त्या स्वप्नाचं अस्तित्व सतत मनात जपत नव्या उमेदीनं, नव्या उत्साहानं आल्या दिवसाचं हसून स्वागत करते आणि तिच्यातला हा बदल पाहून तिचं स्वप्नही सुखावतं! "माझ्या खुळ्या मनाला वेळोवेळी समजावणा-या या प्राजक्ती स्वप्नाची संगत अशीच लाभत रहावी", असं त्या जगन्नियंत्याला विनवणं, एवढंच तिच्या हातात असतं!

Sunday, July 25, 2010

आजोळ

"अरे किती वेळ लावताय पोरांनो गुच्छ करायला! माझे बघा बरं सहा गुच्छ तयारही झाले." रत्नामावशीचा उत्साह अगदी सळसळून वहात होता! कॉफी घेऊन आलेल्या केतकीला तिनं लहान मुलाच्या कौतुकानं मुलांनी बनवलेले गुच्छ दाखवले. सगळी तयारी अगदी जय्यत झाली होती. आज रत्नामावशीच्या पाळणाघराचा 'आजोळ'चा पहिला वाढदिवस होता. साठीच्या घरातली रत्नामावशी अगदी लहान मूल झाली होती! तिला असं आनंदानं रसरसलेलं पहाताना केतकी खूप खूप मागे गेली.

रत्ना, केतकीच्या आईची दूरच्या नात्यातली बहीण. आठ बहिणी आणि एक भाऊ यांच्यातली सगळ्यांत धाकटी. बालपण असं तिला लाभलंच नाही. जरा कुठं समज येईतो वडील गेले, आईची आजारपणं काढण्यात, बहिण-भावाच्या लग्नकार्यात धावपळ करण्यात रत्नाचं बालपण हरवूनच गेलं. आजारी आई गेल्यावर तर रत्नाला अक्षरशः भावंडांच्या दयेवरच जगावं लागलं. लग्नकार्य, सणवार यांत अगदी हक्काची कामवाली म्हणूनच सगळ्यांनी तिचा उपयोग करून घेतला. तिचं वय उलटून गेलं लग्नाचं, तरी कुणी विषय म्हणून काढला नाही! एक तर पुढाकार कुणी घ्यावा, खर्च कुणी करावा, हा प्रश्न आणि दुसरं म्हणजे हक्काची मोलकरीण गेली असती हातातून! अखेरीस केतकीच्या आजीनं तिच्या भावंडांना अक्षरशः दटावलं, तेव्हा कुठं त्यांचे डोळे उघडले.

वय वाढल्यानं प्रथमवर मिळणं महागात पडलं असतं, म्हणून रत्नाच्या थोरल्या मेहुण्यानं आणलेलं बिजवराचं स्थळ बघायचं ठरलं. तीर्थाच्या ठिकाणी रहाणारं कुटुंब, आई, चार भाऊ, त्यांच्या बायका, लेकरं. घरात उपाध्येपण वंशपरंपरागत चालत आलेलं. येणार्‍या यात्रेकरूंना रहायला जागा, त्यांची पूजा-नैवेद्याची सोय करणं हा व्यवसाय. रोजचं १००-१५० पान जेवायला. पुरण-वरणाचा स्वयंपाक. घरच्याच सुना सगळं करायच्या. रत्नासाठी पाहिलेला सगळ्यात मोठा भाऊ. चाळिशी गाठलेला. त्याची पहिली बायको अपघातानं गेली म्हणे, पण तिनं आत्महत्या केली अशी गावात चर्चा. खरं-खोटं देव जाणे! त्याला एक मुलगा ५-६ वर्षांचा. असेना! त्याच्याशी काय देणं-घेणं? रत्नीला उजवली, म्हणजे झालं! तिला विचारायचाही प्रश्न नव्हताच. कसंबसं उरकायचं म्हणून लग्न उरकलं आणि रत्ना त्या खटल्यात येऊन पडली. एक दावं सोडून गरीब गाय दुसर्‍या दाव्याला बांधली, भावंडांचं कर्तव्य संपलं!

रत्नाच्या जावा तिच्यापेक्षा मानानं धाकट्या असल्या तरी वयानं मोठ्या असल्यानं त्यांनी अगदी साळसूदपणे सगळी कष्टाची कामं आल्याबरोबर तिच्या गळ्यात घातली. सासू तिखट, खवीस, नवरा तिरसट, पण त्याची नाटकं फक्त बायकोपुढेच चालायची. आई आणि भावांपुढे अगदी भिजल्या मांजरासारखा मुका व्हायचा तो. रत्ना लहानपणापासून फक्त सोसणं शिकली होती, त्यामुळे समोर येईल त्याचा मुकाट्यानं सामना करणं हेच तिला ठाऊक होतं. तिनं कुठल्याही गोष्टीची कधी तक्रार केली नाही, आणि चेहर्‍यावरचं हास्य मावळू दिलं नाही.

केतकीला लहानपणापासून रत्नामावशी सगळ्यात जास्त आवडायची. ती जेव्हा आजीकडे यायची, तेव्हा सगळी भावंडं सोडून रत्नामावशीसोबतच रहायची. तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असायचं. रत्नामावशी पुस्तकांच्या शाळेत जरी कमी शिकली असली, तरी अनुभवाच्या शाळेत खूप शिकली होती. तिच्या लग्नानंतर केतकीचा आणि तिचा संपर्क बराच कमी झाला होता. एकदाच केव्हातरी देवीची पूजा करायला म्हणून केतकी आईबरोबर रत्नामावशीकडे गेली होती, त्यावेळी तिला पाहून केतकीला रडूच फुटलं होतं! काय बारीक झाली होती रत्नामावशी! अगदी म्हातारीच दिसायला लागली होती! तशी दिसायला ती दहाजणींत उठून दिसणारी होती, पण आता तिची पार रया गेली होती. त्या भेटीनंतर मात्र केतकी तिला कधीच भेटली नाही. बाबांच्या बदलीमुळे पार संपर्कच तुटला तिच्याशी. केतकीच्या लग्नातही रत्नामावशी येऊ शकली नव्हती. कधीतरी आईकडून तिची थोडीफार माहिती मिळत होती.

रत्नाच्या दिरांनी मोठ्या भावाला फसवून घराबाहेर काढलं, मिळकतीतला कणभरही वाटा दिला नाही. वडिलोपार्जित संपत्तीत खोट्यानाट्या कागदपत्रांच्या आधारे त्याचं नावही लावलं नाही. अचानक आलेल्या या संकटानं त्यानं हाय खाल्ली आणि तो आजारी पडला. या परिस्थितीतही डगमगून न जाता रत्नानं भावंडांची, गावकर्‍यांची थोडी मदत घेऊन बाजूच्या गावात चार स्वैपाकाची कामं धरली. नवर्‍याच्या खाण्यापिण्याची, औषधपाण्याची आबाळ होऊ नये, एवढी तरी कमाई मिळायला लागली तिला. सोबतच थोडं शिवण-टिपण, विणकाम असं जमेल तसं करून वादळातल्या नावेला किनार्‍यावर न्यायची तिची धडपड सुरू झाली. कशीबशी ती सावरत होती, त्यात कमी झालं म्हणून की काय, तिच्या सासूला अर्धांगाचा झटका आला, आणि दिरांनी तिला रत्नाच्या दारात आणून सोडून दिलं! तिच्या पोराला मात्र स्वतःकडे ठेवून घेतलं होतं हक्काचा नोकर म्हणून! रत्नानं कसलीही कुरकूर न करता दोन्ही आजारी जिवांची मन लावून सेवा केली. मुलाला शाळेतून काढलं, त्याला वेडीवाकडी संगत लागली, तो बिघडतोय असं तिच्या कानावर येताच शांतपणे त्याला घेऊन आली आणि भाऊ-मेहुण्यांच्या मदतीनं त्याला दूर बोर्डिंग शाळेत घातलं शिकायला. एव्हाना तिच्या गुणांची तिच्या नवर्‍याला आणि सासूला खात्री पटली होती, आणि आपल्या वागण्याचा पश्चातापही झाला होता. रत्नासाठी तेही कमी नव्हतं. जन्मजात असलेल्या पाककौशल्यानं तिची कामं वाढली होती आणि नवरा-सासूच्या आजाराच्या खर्चासोबत पोराच्या शिक्षणाचीही सोय झाली होती. तिनं वेळोवेळी जमवलेल्या गंगाजळीतून एक लहानशी जागाही विकत घेतली. आता कुठं तिचे बरे दिवस आले होते. पहिल्याच वर्षी पोरानं चांगले मार्क मिळवून तिच्या कष्टांचं सार्थक केलं आणि नातवाची प्रगती पाहून तृप्त मनानं तिची सासू तिला उदंड आशिर्वाद देऊन देवाघरी गेली. त्यापुढच्या वर्षी पोरानं अजून चांगली भरारी घेतली आणि सवतीचं पोर असूनही त्याच्या भलेपणासाठी झटणार्‍या आपल्या बायकोला धन्यवाद देत तिच्या नवर्‍यानं जग सोडलं. आता रत्नासाठी फक्त मुलाचं शिक्षण महत्त्वाचं होतं. आता तिला रिकामा वेळही बराच होता, दोन बायका सोबत घेऊन तिनं पापड-लोणची वगैरे करायला सुरुवात केली. पुढं तिचा मुलगा शिकून चांगल्या हुद्द्यावर नोकरीला लागला, परदेशात गेला, त्यानं आपल्यासोबत आईलाही तिकडे नेलं असं उडत उडत कळलं होतं, पण का कोण जाणे, केतकीला काही वेगळीच हुरहूर वाटत होती. तिला सतत रत्नामावशीची आठवण येत होती.

दोन वर्षांखाली रेल्वे अपघातात निरंजनचे आई-बाबा गेले, गेल्या वर्षी केतकीची आई गेली, बाबा त्यांच्या गुरूंसोबत तीर्थयात्रेला गेले तेव्हापासून लहानग्या ओंकारला सांभाळण्यासाठी केतकीनं आपली पीएचडी अर्धवटच ठेवली, निरंजनला मदत म्हणून त्याच्या फॅक्टरीत जाणं सोडलं. त्यात भर म्हणून की काय, स्वैपाकाच्या सखूबाईंनी काम सोडणार असल्याचं सांगितलं. निरंजनच्या बालपणापासून त्यांच्याकडे कामाला असलेल्या सखूबाई अगदी विश्वासाच्या, जशा काही घरच्याच होत्या. त्या काम सोडणार म्हणजे त्याचं कारणही तसंच काही महत्त्वाचं असणार!

"पोरी, अग माज्या लेकाला तिकडं मुंबैला नोकरी लागली फ्याक्टरीत. र्‍हायला जागा बी मिलनार हाय. मग त्याचं लगीन हुईपरेंत तरी त्याला करून खाऊ घालायला पायजेल का न्हाई कुनी? आन मी तर हितं काय करीन यकटा जीव! लेक म्हने, तू बी चल तकडंच. लई इचार करून निगाले बग. आग, त्याचा बी अर्दा जीव इतं न् अर्दा तितं र्‍हायचा. त्यापरास जाते आपली त्याच्यासंग. तसं इतं तरी काय हाय आपलं! ना घर, ना जमीनजजुमला. त्यो द्येव ठरीवनारा कुनी कुटं र्‍हायचं ते!" सखूबाईंनी काम सोडायचं कारण सांगितलं, त्याला विरोध करणंच शक्य नव्हतं.

"पण मग मला आता तुमच्यासारखी विश्वासाची बाई कुठं मिळणार? इतके दिवस मीच काय, पण हे घरच पूर्णपणे तुमच्यावर विसंबून आहे. अगदी घरच्याच एक होऊन तुम्ही या घरासाठी कष्ट केलेत. असं इतकं आपलेपण असणारं आता कोण मिळणार मला?" केतकी बोलली.

"अग पोरी, त्याची काळजी आपन कोन करनार? त्यो बसलाय न्हवं वर त्याची फिकर करनारा. आग, तुला सांगते, येक माउली हाय. भल्या घरची, चांगली बाई हाय माज्याच शेजारी र्‍हातीय. बिचारीच्या जल्माची चित्तरकता आइकशीला तर थक व्हशील. आशी येळ त्या इट्टलानं का आनली तिच्यावर, त्यालाच ठावं. तिला मी तुज्याकडं घिऊन येते कामाला. माज्यापरीस झ्याक काम करतीया. हाताची गोडी तर आशी हाय तिच्या की मी बी हक्कानं तिला कालवन मागून घेते जेवताना. तू बग येक डाव तिला." सखूबाईंनी दुसर्‍या बाईची सोय तर केली होती खरी, पण ती कोण, कुठली याची माहिती हवीच होती ना!

"कोण, कुठली आहे पण ती?" केतकीनं विचारलं.

"द्येवाघरची हाय, त्यानं धर्माची बहिन म्हून तिला वारकरी बुवाच्या ताब्यात दिली, आन वारकरी बुवानं माज्या हाती सोपवली."

सखूबाईंचा नवरा वारकरी होता. दरवर्षी पायी वारी करायचा तो पंढरीची. विठ्ठलावर त्या कुटुंबाची प्रचंड भक्ती होती.

"मला नीट सांगा बरं काय ते."

"आग, दोन वर्सापल्याड वारीला गेलते बुवा, तवाची गोस्ट हाय. येक पोरगा आन त्याची माय बुवाच्या मागं लायनीत थांबलं व्हतं दर्सनासाटी. मदीच त्यो पोरगा बुवाला बोलला, "बाबाजी, जरा माज्या आईसाटी पानी आन खायला कायतरी घिऊन येतो, तवर तिला बगा." आन त्यो जो गेला, दर्सन झालं, भजन झालं, फराल झाला तरी त्येचा पत्त्याच न्हाई! रात झाली तसं वारकरी बुवानं तिला तिचा ठावठिकाना इचारला. दोन दिवस आजून मुक्काम व्हता त्येंचा पंडरीत. तवर तिला आपल्या मंडळीतल्या बायांच्या सोबत दिऊन बुवा तिच्या गावाकडं जाऊन आले, तवा तेला समजलं की पोरानं मायला वारीत नेऊन वार्‍यावर सोडलं आन तिकडं तिच्या घराचा सौदा करून पैशे घिऊनशान त्यो गायब झाला! सांग आता काय म्हनावं या कर्माला!"

"बाप रे! किती विचित्र! मग पुढे काय झालं?" केतकी चक्रावूनच गेली ते ऐकून!

'पुडं काय व्हनार? बुवानं त्या माउलीला समदी हाकीकत सांगितली, आन म्हनाले, बग माय, तू मला इट्टलाच्या दारात भेटलीस. तुला वार्‍यावर सोडीन तर द्येव मला कवाच मापी देनार न्हाई. तवा तू माज्यासंगट गावाकडं चल, माज्या लक्षिमीच्या झोळीत घालतो तुला. तुमी दोगी ठरवा काय कराचं ते."

सगळंच विलक्षण होतं ऐकलेलं!

सखूबाईंनी पुढं सांगायला सुरुवात केली. "बुवा तिला घिऊन आले. मला तिची समदी हाकीकत सांगितली. मला बी भरून आलं माय. चांगल्या घरची माउली ती, आन तिला आसे दिवस दावले त्या इटूनं! आसल काई गेल्या जल्माचं! म्या तिला घरातच र्‍हा म्हनलं. तिनं म्हटलं, मला दोन-चार कामं मिळवून दे, आसं बसून रहानं बर न्हाई. मग तिला कामं मिळवून दिली, जवळच येक खोली किरायानं घिऊन दिली. गेल्या साली बुवा वरती गेले, तवा माज्याकडून वचन घेतलं त्येनं की त्या माउलीला मरस्तोवर आंतर दिऊ नकोस. आता या पोराला नोकरी मिळाली, तर त्याला तर कसं वार्‍यावर सोडू? तिला तिकडं चल म्हनलं तर ती नको म्हनतीय. म्हनून तिला तुज्या वटीत घालते, तूच आता तिला संबाळ." सखूबाईंनी केतकीला विनवलं.

"उद्या रविवार आहे. उद्या निरंजनही घरीच आहे. तिला घेऊन या तुम्ही." केतकी म्हणाली. रात्री जेवतानाच केतकीनं सखूबाईच्या धर्माच्या नणंदेची चित्तरकथा निरंजनला सांगितली होती, त्यावर त्यांची दोघांची बरीच चर्चाही झाली होती. आईबाबावेड्या निरंजनला हे सगळं ऐकून अगदी गहिवरून आलं होतं आणि आपल्याकडून जितकं करता येईल तितकं करू असं त्यानं ठरवलं होतं.
...............
दुपार सरत आली होती. रविवारची सगळी जास्तीची कामं नुकतीच हातावेगळी करून झाली होती. ओंकार आणि निरंजनचं बागकाम, केतकीची साफसफाई सगळं संपवून संध्याकाळच्या कामांची तयारी सुरू होती.

"केतकीबाय" सखूबाईची हाक आली, तशी केतकी धावलीच. एक क्षण फक्त सखूबाईच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तिनं पाहिलं आणि "रत्नामावशी............." अशी हाक घालून तिच्या गळ्यातच पडली! निरंजन, ओंकार आणि सखूबाई यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही!

रत्नामावशीसाठी सतत झुरणार्‍या केतकीला रत्नामावशीचा अखेरीस शोध लागला होता तो असा!

दोघी दारातच गळ्यात गळे घालून भावनांना वाट करून देत होत्या. त्यांच्या भावनांचा भर ओसरल्यावर त्या भानावर आल्या. घरात येत केतकी म्हणाली, "आता मी तुला मुळीच सोडणार नाही रत्नामावशी. तू माझ्याच घरी रहायचं!"

"अग पोरी, कष्टावर वाढलेला जीव हा. याला निवांत रहाणं कसं जमायचं आता?" रत्नामावशी बोलली.

"रत्नामावशी, तुला कामच करायचं आहे ना?" या निरंजनची कमाल आहे हं! केतकीला त्याचं अगदी कौतुक वाटलं. समोरच्या माणसाला कसं वश करावं याची विद्या त्याला चांगलीच अवगत आहे! अगदी नकळत त्यानं संवादाची सूत्रं आपल्या हातात घेतली होती.

"हो, आणि मी तुला अहो सासूबाई वगैरे म्हणणार नाही. तू माझ्यासाठीही रत्नामावशीच रहाशील. हं, तर तुला आवडतं काम जर मी दिलं, तर तुझी काही तक्रार नाही ना? हं, पण ते काम इथं या घरात राहूनच करावं लागेल. आहे का तयारी तुझी?"

"आग माय, या वयात येकली र्‍हान्यापरास तुजी आपली मानसं मिळाली तर त्येंच्यासोबर र्‍हा न. तुला सांगते माय, आग दोगबी लई ग्वाड सोबावाची हायेत ग लेकरं. मला बी आगदी घरच्यावानी वागवलंया इतके दिस त्येंनी. तू तर त्येंना आईसारकी. इचार नग करूस." सखूबाईंनी जसं काही निरंजनला अनुमोदनच दिलं!

"हे बघ मावशी, तुला मुलं खूप आवडतात ना? हो, केतकीकडून खूप खूप ऐकलंय तुझ्याबद्दल. तुला बागकाम आवडतं, तुला लहान मुलांशी खेळायला, त्यांना गोष्टी सांगायला खूप आवडतं. हो ना? चल तर मग. आता ठरलं. आपल्या मागच्या आउट हाउसमध्ये आपण पाळणाघर काढू या. अगदी ओंकारसह आणखी कितीतरी मुलं अशी आहेत, ज्यांना आजीची गरज आहे. अशी मुलं मी तुला मिळवून देतो, आपल्या वरकामाच्या सगुणाबाईंची मनिषा नुकतीच मॉंटेसरीचा कोर्स करून आलीय तिला देतो तुझ्या मदतीला आणि आम्हीही आहोतच."

"लेकरा, काय म्हणू रे तुला? बोलायला काही शिल्लकच ठेवलं नाहीस मला म्हातारीला." रत्नामावशीचा कंठ दाटून आला होता.

"अग मावशी, आई-बाबा गेल्यापासून आम्ही अगदी एकाकी झालो होतो ग! आम्हालाही तर कुणीतरी आपलं, हक्काचं मोठं माणूस हवंच होतं. तू आलीस आणि आम्ही निवांत झालो. आता केतकीला तिची पीएचडी पूर्ण करता येईल, मला मदत करता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे ओंकारला आजी मिळेल."

केतकीनं सगळ्यांसाठी कॉफी आणली. सखूबाई जायला निघाल्या, तशी केतकी त्यांच्या पायाला बिलगली आणि भरल्या गळ्यानं बोलली, "आज माझं हरवलेलं बालपण मला दिलंत तुम्ही सखूबाई! आयुष्यभर तुमच्या ऋणात राहीन मी!"

"तिला नीट संबाळ पोरी. लई लई कष्ट भोगले ग त्या माउलीनं. आता तरी तिला सुकात र्‍हाऊ दे!" सखूबाई पण भावनाविवश होऊन बोलली.
.....................
जवळजवळ पन्नास मुलं यायला लागली होती पाळणाघरात. पाळणाघर कसलं, ते तर आजोळच झालं होतं मुलांचं. सुटीदिवशी पण त्यांना घरात बसवत नव्हतं, इतका रत्नाआजीचा लळा लागला होता. संध्याकाळी जाण्याआधी शुभंकरोती, पाढे, कधी बागकाम तर कधी कागदकाम, वेगवेगळे खेळ अगदी मजेत रहायची मुलं तिथं. रत्नामावशीच्या आग्रहास्तव निरंजनच्या घराण्यातली जवळजवळ बंद पडलेली वारकर्‍यांना जेवण द्यायची परंपराही पुन्हा सुरू झाली होती. रत्नामावशीच्या येण्यानं भरभराट झाली होती. पहाता पहाता वर्ष झालं होतं त्या घटनेला. आज त्याच आजोळाचा पहिला वाढदिवस होता. फुगे फुगवून झाले होते, फुलांचे गुच्छ बनवून झाले होते, रांगोळ्या काढून झाल्या होत्या. मुंबईहून खास पाहुणे सखूबाई आणि त्यांचा मुलगा येणार होते सोहळ्याला.

"अग ए, पाहुणे आले ना बाई, कुठं आहे तुझं लक्ष?" खूप खूप मागे गेलेल्या केतकीला निरंजनच्या शब्दांनी भानावर आणलं. सगळी मुलं, त्यांचे पालक अगदी घरचं कार्य असावं तसे झटत होते. दृष्ट लागेल असा मस्त सोहळा झाला वाढदिवसाचा. सखूबाई अगदी खूश होत्या सगळं पाहून. रात्रभर दोघी जिवाभावाच्या नणंदभावजया [की मैत्रिणी?] गप्पा मारत बसल्या होत्या. सकाळी निघताना केतकीनं सखूबाईला भरगच्च आहेर केला. भारावलेली सखूबाई आभाळाकडं पहात इतकंच बोलली, "वारकरी बुवा, तुमच्या धर्माच्या बहिनीला सुकात बगताय न्हवं? आज मी तुमाला दिलेल्या वचनातुन मोकळी झाले बगा!"

Saturday, March 6, 2010

कोलाज

चिऊताईला काल नुकतंच तिसरं संपून चौथं लागलं होतं. आज चिऊताईची झोप नेहमीपेक्षा लौकरच उघडली. खरं तर काल रात्री वाढदिवसाच्या भेटी उघडून पहाता पहाता झोपायला बराच उशीर झाला होता. पण स्वप्नात भेटीत आलेल्या वेगवेगळ्या रंगपेट्या, चित्रांच्या वह्या, स्केच पेन यांनी धमाल केली होती, सकाळी उठून कितीतरी चित्रं काढायची ठरली होती. मग वेळ नको पुरायला?


चित्रांच्या नादात आज अगदी शहाण्या मुलीसारखं आईला त्रास न देता दात घासून, दूध पिऊन झालं, बाबाच्या आधीच आवरूनही झालं. एरवी जबरदस्तीनं भरवावी लागणारी पालकाची नावडती भाजी पण आज विनासायास पोटात गेली.

"मग आज काय, मस्त मस्त चित्रं काढणार तर?" बाबानं विचारलं. "हो, तू ऑफिसमधून येशील तेव्हा बघच मी किती छान छान गंमत करते चित्रांची." चिऊताईनं बाबाला प्रॉमिस केलं. त्याला हसून दुजोरा देऊन बाबा ऑफिसला गेला, आईचंही सगळं आवरून झालं आणि मग मायलेकीचं राज्य!

आत्यानं आणलेली मोठी स्केच बुक, मावशी, काका, आजी यांनी दिलेल्या रंगीत पेन्सिली, खडूच्या पेट्या, स्केच पेन, बाबाच्या मित्रानं दिलेली गोल गोल वड्यावाली वॉटरकलरची छानशी रंगपेटी, आईच्या मैत्रिणीनं दिलेलं सुंदर चित्रांचं पुस्तक सगळी मंडळी हॉलमध्ये गोळा झाली. कार्पेटवर फतकल मारून चिऊताईची रंगसाधना सुरू झाली.

कुठंतरी गरगट्टा, कुठं दोनच फराटे, एका पानावर दोनचार टिकल्या, आकार ना उकार अशा आगळ्यावेगळ्या कलेनं अख्खी वही भरूनही गेली अर्ध्या तासात! मग ती आईला दाखवून झाली. "हा किनई, हत्ती आहे, तो ढगातून उडतोय. आणि हे आहेत टॉम आणि जेरी. ती जेरी टॉमला मारतेय. ही सोनपरी. तिच्या हातात जादूची कांडी आहे. ती फिरवली की दुष्ट राक्षसाचं कबुतर होतं. आणि हा बघ तो राक्षस. हा आहे डोनाल्ड डक आणि आणि हा मिकी." एक एक करत सगळ्या चित्रांचं वर्णन करून झालं. आईच्या चेहर्‍यावर कौतुक ओसंडून वहात होतं. मध्येच स्वारी पहिल्या पानावर गेली. "ए आई, हे काय आहे ग?"

"अग, हा तर हत्ती आहे ना ढगातून उडणारा?"

"हट् मुळी! तो हत्ती नाही दिसत. तो तर भोपळा झालाय! आणि त्या जेरीला तर शेपटीच नाहीय! सोनपरी नकटी दिसतीय." गाल फुगवून चिऊताई बोलली. हळू हळू सगळ्या चित्रांमधल्या चुका शोधून झाल्या. चिऊताई जाम वैतागली. "हूं, मला मुळी चित्रच नाही काढता येत. सगळा नुस्ता कचरा झालाय. मला नाय आवडली ही चित्रं." त्राग्यानं तिनं उरलासुरला रंग प्रत्येक चित्रावर अक्षरशः फासला, आणि अख्ख्या वहीचे तुकडे तुकडे केले. रात्रीची उरलीसुरली झोप डोळ्यांत दाटून आली होती. फुरंगटून, हिरमुसून चिऊताई तिथंच झोपून गेली.

तासाभरानं चिऊताई उठली, तेव्हा आईनं सगळा पसारा आवरून ठेवलेला होता. वाटीत डाळिंबाचे लालचुटूक दाणे घेऊन आई चिऊताईची वाट पहात होती. पण तिचा रुसवा अजून गेलाच नव्हता. "तुझ्या सोनपरीनं तुझ्यासाठी एक गंमत ठेवलीय. तू एवढे दाणे खाल्लेस, की ती तुला मिळेल." आईनं समजूत काढली. "मी नाई इतके सगळे खाणार. एक्कच घास खाईन!" रुसुबाई चिऊताई अजूनही घुश्शातच होती. "ठीक आहे राणी. एक्कच घास खा, मग तुला ती गंमत देते." कसेबसे चार दाणे खाऊन चिऊताई आईच्या मागे गेली, तर एका मोठ्या पांढर्‍या कागदावर ढगात उडणारा हत्ती होता, तिच्याच रंगांचा! "वॉव! हा तर खराच उडणारा हत्ती! ए आई, हा कसा आला ग?"

चिऊताईच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी आईनं एक-एक कागद तिच्यापुढं ठेवायला सुरुवात केली. सोनपरी, दुष्ट राक्षस, टॉमला मारणारी जेरी, मिकी, अगदी चिऊताईला हव्या असणार्‍या मित्रांची सगळी चित्रं त्यात होती, फक्त रंग नव्हते. "आई, पण सोनपरी यात रंग भरायला विसरली का ग?" बघता बघता चिऊताई खुलली होती. "नाही, ते तुला भरायचे आहेत, आणि तेही रंगपेटीतून नाही." आईनं रिकामी झालेली डाळिंबाच्या दाण्यांची वाटी ओट्यावर ठेवली. चित्रं पहाता पहाता आपण सगळे दाणे फस्त केलेत, हे चिऊताईला कळलंही नाही! "मग सांग ना कसे भरायचे?" ही तर एक नवीनच गंमत होती!

आईनं चिऊताईच्या चित्रकलेच्या वहीचे फाटके कागद, कात्री, फेविकॉलची ट्यूब घेतली. त्या वेड्यावाकड्या कागदांचे छानसे आकार कापले आणि एका चित्रात ते आकार चिकटवले. चिऊताई मन लावून पहात होती. बघता बघता सोनपरी हातात जादूची कांडी घेऊन त्या कागदावर उतरली! "काय मस्त! ए आई, हे मी करू?" चिऊताईला हे नवं काम आवडलं. "हो, हे तुलाच तर करायचं आहे!" आणि हे चिकटकाम आईनं चिऊताईला दिलं करायला. मग ते झाल्यावर स्केच पेननं डोळे, नाक, कान काढून झाले. बघता बघता सगळी चित्रं हवी तश्शी तयार झाली! चिऊताई मनापासून खूश झाली. मनासारख्या जमलेल्या त्या कलाकृती पहाताना तिचा आनंद डोळ्यांतून ओसंडून वहात होता!

बिघडलेल्या चित्रांच्या कपट्यांमधून मनासारखं कोलाज घडवण्याची कला किती सहजपणे शिकली होती ती!

Thursday, January 21, 2010

द्रौपदी

ती कोण, कुठली, कुणाची काहीच ठाउक नाही. तिचं मी माझ्यापुरतं ठेवलेलं नाव द्रौपदी. तेही तिच्या अवतारावरून.  तिच्या अंगावर एक नेसूची साडी असते आणि तीन ते चार साड्या पोटावर बांधलेल्या. त्याशिवाय सोबत असलेल्या कापडी पिशवीत दोन-तीन साड्या असतात. साध्याच जुनेर झालेल्या, विटलेल्या, रंग उडालेल्या त्या साड्या ही तिची दौलत!
तिची माझी पहिली भेट (?) अगदी लक्षात रहावी अशी. रविवारची निवांत दुपार. माझ्या घरातल्या दोन जागा माझ्या सगळ्यात जास्त आवडीच्या. एक तर हॉलमधलं माझं कंप्यूटर टेबल आणि दुसरी म्हणजे दोन चौक पार करणारा वाहता रस्ता जिथून दिसतो, अशा माझ्या किचनच्या खिडक्या. त्या खिडकीतून रविवारचा शांत रस्ता पाहत असताना अचानक बिल्डिंगच्या वॉचमनचा कुणाशी तरी भांडत असल्याचा आवाज आला. खाली लक्ष गेलं तर ही दिसली. नाकी डोळी नीटस, उंचीपुरी, गव्हाळ वर्ण,  चेह-यावर कळत-नकळत दिसणारे बारीक डाग [कदाचित देवीचे असावेत], कपाळावर भलं मोठं लालभडक कुंकू, मधल्या भांगात अथपासून इतिपर्यंत भरलेला सिंदूर, हातभर लालभडक काचेच्या बांगड्या, गळ्यात जाड मण्यांची काळी पोत, आता रंग उडालेली पण कोणे एके काळी  लग्नातली चुनडी असावी अशी लाल साडी नेसलेली ती बिल्डिंगच्या गेटसमोर  असलेल्या हातपंपावर बसून होती. तिनं हातातल्या कापडी पिशवीमधून दोन-तीन साड्या काढल्या होत्या, आणि ती त्या हातपंपावर भिजवत होती. वॉचमनच्या दरडावण्याला जराही भीक न घालता ती अगदी तार सप्तकातल्या वरच्या षड्जात कुठल्या तरी अगम्य भाषेत ओरडत होती. अखेरीस कुणीतरी वॉचमनला समजावलं आणि तो बिचारा आपल्या जागेवर येऊन चुपचाप बसून गेला. पण हिची बडबड अखंड सुरूच होती.  आता ती  हळूहळू तार सप्तकातल्या पहिल्या "सा"  पर्यंत आली होती. एकीकडे साड्या अगदी आपटून धोपटून धुणं सुरू होतं आणि एकीकडे तोंड सुरू! तिची ती भाषा जरी अनाकलनीय होती, तरी भावना लक्षात येण्यासारख्या होत्या. एखाद्या सुनेनं सासूच्या टोमण्याना तोडीस तोड प्रतिसाद द्यावेत, असं काहीसं तिचं ते बोलणं वाटत होतं. हळूहळू स्वर अजून खाली आला. आता नव-याकडे सासूची तक्रार करावी, असं धुसफुसत बोलणं सुरू झालं. आता मध्य सप्तकातल्या मध्यमापर्यंत खालची पट्टी, आणि लेकराची समजूत काढावी, तसा काहीसा भाव.
मधेच तिनं गाणं सुरू केलं. तिच्या त्या जाड्या भरड्या आवाजातलं ते गायन अगदी सुश्राव्य नसलं तरी फारच बेसूरही नाही वाटलं. कधी त्या सुरांनी "अबके बरस भेज भैया को बाबुल" च्या माहेरासाठी आसुसलेल्या सासुरवाशिणीची आठवण करून दिली तर कधी "चंदामामा दूर के, पुएँ पकाए बूर के" च्या लडिवाळ गोष्टी सांगितल्या. काही अल्लड सूर "पड गए झूले सावन रुत आई रे" च्या स्मृती जागवत सख्यांच्या मस्तीभ-या जगातही घेऊन गेले. एक तर हीर होती "डोली चढ़तेही वीरने बैन किये, मुझे ले चले बाबुल ले चले वे!" काहीशी भोजपुरी, काहीशी राजस्तानी, अवधेची मैथिली थोडीशी पंजाबी अशा काही भाषांच मिश्रण  होतं तिच्या बोलण्यात  आणि गाण्यात.
सुमारे तासभर तिचं धुणं सुरू होतं अगदी मनापासून. कुण्या जन्माचं कर्म धूत होती, देव जाणे! मग तिनं एकेक साडी जिन्याच्या कठड्यावर अगदी व्यवस्थित वाळत घातली. कपाळावरच्या कुंकवाच्या टिळ्याला जराही फिकट न होऊ देता स्वच्छ चेहरा धुतला, हात-पाय धुतले आणि साड्या सुकेपर्यंत त्याच बडबडीची पहिल्यापासूनची उजळणी करत उन्हात बसली. साड्या थोड्याशा सुकल्यावर दोन-तीन साड्या व्यवस्थित घडी घालून पिशवीत भरल्या, बाकीच्या तीन-चार साड्या पोटावर पंचा गुंडाळावा, तशा गुंडाळल्या आणि हातपंपाचं पाणी पिऊन ती तिथून निघाली. जातानाही तिची केसेट सुरूच होती!
ती गेली आणि पूर्ण वेळ तिचा तो समारंभ पहाणा-या माझ्या मनात प्रश्नांचं मोहोळ उठलं. ती कोण असेल, कुठली असेल? तिच्या घरी कोण कोण असेल? ती अशी घरादारापासून दूर, एकटी, एकाकी, उन्मनी अवस्थेत का फिरत असेल? असं काय घडलं असेल तिच्या आयुष्यात की ती ............................ फक्त प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! त्यांची उत्तरं शोधायची कुठे आणि कुणी? ती तर निघूनही गेली, पण मी उगाचच तिच्यात गुंतून गेले!
पुन्हा एखाद्या महिन्यानंतर ती आली, तशीच रविवारी दुपारी. पुन्हा तिचा तोच धुण्याचा कार्यक्रम आणि तीच "गीतोंभरी कहानी"! आणि मीही तशीच तिच्या हालचाली बारकाईने न्याहाळत आणि तिच्या कहाणीत गुंतून जात उभी. जवळजवळ वर्षभर तिचे रविवार चुकले नाहीत, आणि माझेही!
अलीकडे चार-पाच महिन्यांत ती आली नाही. मी मात्र तिच्यातून स्वत:ला अजून बाहेर काढू शकले नाहीय. कुठे गेली असेल ती? काय झालं असेल तिला? तब्येत तर ठीक असेल ना तिची? तिला या जागेची आठवण  होत असेल की नाही? कुठे रहात असेल ती? असेल तरी की नसेलही?
ती तर जशी अदृश्य झालीय, पण माझ्यासाठी कितीतरी अनुत्तरित प्रश्न ठेऊन गेलीय!