Sunday, September 5, 2010

तिचं प्राजक्ती स्वप्न


पुन्हा गौरी-गणपतीचे दिवस आले, सगळीकडे हिरवाई, उत्साह, उल्हास, जल्लोष घेऊन. पण तिच्या मनाची एक जुनी जखम, बुजली असेल असं वाटता वाटता खपली निघून पुन्हा भळभळून वहायला लागली. कुठल्याही चुकीशिवाय, कारणाशिवाय कुणीतरी केलेली जखम! तशाही मनाच्या जखमा ब-या होतच नसतात म्हणा! काळ हे सगळ्या वेदना, व्यथा, दु:खांवरचं औषध असतं, असं म्हणतात खरं. पण काही वेदना या कालातीत असतात.

हेच ते दिवस, ज्यावेळी तिची सहज साधी इच्छा पूर्ण करण्याच्या नादात तिला ही जखम मिळाली, भेट म्हणून! हो, भेटच म्हणायला हवी. कारण नंतर याच जखमेतून उमललं एक सुंदरसं स्वप्न! या स्वप्नानं तिला भरभरून सुख दिलं, जगायचं बळ दिलं, स्फूर्ती दिली. प्राजक्तासारखं टवटवीत, प्रसन्न, मंद सुगंध उधळत रहाणारं स्वप्न!

तरीही हे दिवस आले, आणि ती सैरभैर झाली. तिच्या जिवाची वाट चुकलेल्या वासरासारखी घालमेल होतेय. कशाकशात मन लागत नाही, सगळं चुकत चुकत जायला लागलंय! लहान मुलाच्या हातातून त्याचं आवडतं खेळणं काढून घेतल्यावर त्याची जी अवस्था होते, तसं काहीसं झालंय तिच्या मनाचं. ती अस्वस्थ होतेय घायाळ हरिणीसारखी. तिचं मन मुक्यानंच आतल्या आत रडतंय.

आणि अशा वेळी ते सुगंधी प्राजक्ती स्वप्न हळूच येतं, तिच्या खुळ्या मनाला गोंजारतं, तिची समजून काढतं. कल्पनेत रमायचं, पण वास्तवात, वास्तवाचं भान ठेवायचं याची जाणीव तिला हळुवारपणे करून देतं. तिच्या जुन्या जखमेवर फुंकर घालतं आणि मग कुठं ती पुन्हा भानावर येते, त्या स्वप्नाचं अस्तित्व सतत मनात जपत नव्या उमेदीनं, नव्या उत्साहानं आल्या दिवसाचं हसून स्वागत करते आणि तिच्यातला हा बदल पाहून तिचं स्वप्नही सुखावतं! "माझ्या खुळ्या मनाला वेळोवेळी समजावणा-या या प्राजक्ती स्वप्नाची संगत अशीच लाभत रहावी", असं त्या जगन्नियंत्याला विनवणं, एवढंच तिच्या हातात असतं!