Friday, December 25, 2009

गुलमोहर


बाग फुलवायची हौस तर खरी, पण फ्लॆटमध्ये ते सुख कुठून मिळणार? त्यात जागा कमी पडते, म्हणून बाल्कनी पण ठेवली नाही, शेवटी कशातरी दोन-चार कुंड्या ठेवून तुळस, मनीप्लांट, गोकर्ण लावलेली. अनायासे तळमजल्यावरचं लहानसं दुकान स्वस्तात मिळालं, म्हणून घेऊन टाकलं. काही नाही केलं, तरी गाडी पार्क करायला जागा झाली, आणि बागेचीही हौस भागली. कंपाउंडच्या बाहेर एका बाजूला आपोआपच उगवलेला औदुंबर वाढत होता. माझ्या आईनं तिच्या जावयबापूंना सांगितलं "तिला गुलमोहर खूप आवडतो. तोच लावू या बाहेर." त्यांनी पण कौतुकानं देशी गुलाब, जास्वंद, पारिजात, जाई यांच्यासोबत गुलमोहराचं रोप आणलं, लावणं झालं. खतपाणी व्यवस्थित वेळच्यावेळी झालं. गुलमोहर भराभर वाढत होता. बघता बघता औदुंबर आणि गुलमोहर दुस-या मजल्यापर्यंत उंच झाले. किचनच्या खिडकीतून खाली बसूनही दिसतील इतके! दोघांच्या फांद्या हातात हात धरावे, तशा एकमेकांत मिसळून गेल्या. रोज औदुंबरावर फळं खाण्यासाठी पाखरांची गर्दी, इवल्याशा खारुल्यांचं लग्नात करवल्या मिरवाव्या तशा तुरुतुरू या झाडावरून त्या झाडावर धावणं! पण चार-पाच वर्षं झाली, तरी गुलमोहराला बहर काही आला नाही! त्याच्या बहराच्या काळात रस्त्यानं जातायेता इवल्याशा झाडांनाही फुलं आलेली पाहिली, की वाटायचं आपला गुलमोहर इतका मोठा होऊनही फुलत का नाही? नवरोबांचं म्हणणं, "अग फुलेल पुढच्या सीझनला." पण तो सीझन काही आलाच नाही! त्यातच पुन्हा दोन वेळा वादळ-वारं काहीही नसताना त्याच्या दोन-दोन मोठ्या फांद्या अचानक तुटून पडल्या! औदुंबराच्या हातातला त्याचा हात सुटून गेला. अगदीच केविलवाणा दिसायला लागला तो!अखेरीस एका रविवारी माळीबाबा आल्यावर बागेत गेले. त्याचं काम सुरूच होतं. "माळीबाबा, आपल्या गुलमोहराला फुलं कशी येत नाहीत हो अजून? एवढा तर मोठा झालाय!" मी विचारलं."कंचा गुलमोहर?" त्यांच्या त्या प्रश्नानं मी उडालेच! "अहो, हा काय!" मी गुलमोहराकडे हात दाखवला."त्यो कुटला गुलमोहर? त्यो तर चिचवा व्हय!" इति माळीबाबा."काय? चिचवा?" मी हैराण!"व्हयं तर! त्यो चिचवा, रस्त्याच्या कडंन लावत्यात. जंगली झाड व्हय त्ये." माळीबाबांनी माहिती पुरवली."इतकं तकलादू झाड रस्त्याच्या कडेला लावतात?" मला नवल वाटलं."तकलादू काऊन जी? त्ये तर मस टणक -हातं. लई मोटं व्हतं. सावलीला बरं आसतं." माळीबाबा त्याचा कैवार घेत बोलले."मग याच्या तर फांद्या बिना वादळवा-याच्याच तुटल्या!" तक्रारीच्या सुरात मी!"तुटन न्हाई तर काय व्हईल? उधईनं खाल्लंय न्हवं त्याईले!" माळीबाबांचा हा खुलासा ऐकून मला फक्त रडायला यायचंच बाकी राहिलं होतं! ज्याचं जीवापाड कौतुक केलं, एक तर तो लाडका गुलमोहर नाही, आणि त्यातूनही त्याला वाळवी लागलेली! बरं, आता गुलमोहरासाठी बागेत जागाही नाही! अरे देवा!"का हो, तुम्ही एवढे बागायतदार, शेतीत मुरलेले, आणि तुम्हाला गुलमोहर आणि चिचव्यातला फरक नाही कळला रोप आणताना?" मी नवरोबांना मारलेला हा टोमणा प्रत्युत्तरार्थ होता. वरो-याहून बाबांच्या आनंदवनातून आणलेल्या कृष्णतुळशीच्या बिया, पंधरा तास बसचा प्रवास करून आणलेलं आईच्या बागेतलं बोटाएवढं चिमुरडं अबोलीचं रोप आणि गोकर्णाच्या बिया मी कुंडीत लावताना त्यांनी जी लेक्चर्स दिली होती, त्याचा बूमरॆंग! {ती अबोली आता मस्त फुललीय आणि गोकर्णाची तर बागच झालीय!}"अग, त्या फॊरेस्टच्या नर्सरीमधल्या माळ्यानं दिलं ते गुलमोहर म्हणून!" आपली चूक दुस-यावर ढकलण्यात तरबेज असणा-या नवरोबाचं मवाळ उत्तर!छे! त्या गुलमोहराच्या निमित्तानं मनात बरंच वादळ उठलं. आयुष्यातही बरेचदा अशा एखाद्या वळणावर आपली निवड चुकल्याचं कळतं, की जिथून परतीची वाटही नसते, सुधारण्याची संधीही नसते, आणि त्या चुकीच्या निवडीला स्वीकारण्याशिवाय पर्यायही नसतो! पण पश्चाताप करूनही उपयोग नसतो. अशा वेळी कुढत रहाण्यापेक्षा आहे ते आहे तसं गोड मानून घेणं बरं ना? जे समोर येतंय, ते हसतमुखानं स्वीकारण्यात कदाचित खरं सुख असेल! त्या झाडाची काय चूक? त्याला गुलमोहर समजत होते, तोवर त्यानं दिलेला आनंद तर अवर्णनीयच होता ना? आणि अजून तरी काय झालंय? त्याच्या त्या नव्या नाजूक पोपटी पालवीतली इवलीइवलीशी पानं जेव्हा वा-यावर हलत असतात, तेव्हा एखादी सुरेलशी सुरावट मनात तरळून जाते. या वयातही मनापासून आवडणा-या "टॊम ऎंड जेरी" मधल्या जेरीनं पियानोच्या पेटीत बसून सूर छेडावेत, आणि वरच्या स्वरपट्ट्या जादूनं फिरल्यासारख्या आपोआप हलाव्यात, तशीच ती पालवी दिसते.कुठंतरी मनातून दुखत असतानाच मनाची अशी समजूत काढून बागेतल्या इतर घडामोडींकडे पहात असतानाच एक सुखद धक्का बसला. जेमतेम कमरेइतक्या उंचीच्या प्राजक्ताला कळ्या आल्यात! त्याचा बहराचा मोसम अजून यायचाच आहे, तरीही तो फुललाय! गुलमोहराचं नसणं थोडंसं कोप-यात गेलंय मनाच्या. कुणीतरी फुलतंय ना माझ्या बागेत!


2 टिप्पणी(ण्या):

चुरापाव म्हणाले...

झाडांत खूप गुंतून जायला होतं ना? कळ्या येताना मस्त वाटतं, फुलतात किती कौतुक करू आणि किती नको असं होतं.मस्त लिहिलय खास करून शेवट 'कुणीतरी फुलतंय ना माझ्या बागेत!' सही९ डिसेंबर २००९ ९-२७ am

Gouri म्हणाले...

sundar!!! aga tujha ha blog baghitalaach navhataa. aataa sagalaa vaachoon kaadhate.maajhyakade ek poncetia aahe ... pivala mhanoon aanala ani nantar chakk gulabee nighala. phulalyaavarach samajale, ani dusarya laal baharasamor ha pharach phika disayala lagala. baag bahataanaa aai mhanaalee, 'agadeech vitakaa disato aahe na!' tar aataa itaka bichara jhalay to ... purveesaarakhaa mast vadhatach nahiye.२४ डिसेंबर २००९ ३-३२ am

कहाणी स्फूर्तिदेवतेचीऐका स्फूर्तिदेवते तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक वेडी यक्षकन्या रहात होती. बालपणापासून तिला आपला शब्द-सुरांशी खेळण्याचा छंद! नवनवे शब्द गोळा करावे, त्यांना सुरांत गुंफून त्यांच्या माळा, गोफ विणत रहावेत आणि त्यांच्यातच रमून जावं हेच तिचं काम. कायम आपली आपल्यातच गुंतलेली. यक्षपित्यानं तिच्यातलं हे वेड जाणलं आणि तिची ओळख करून दिली साहित्याच्या अफाट विश्वाशी. अलिबाबाच्या गुहेत जावं आणि डोळे दिपावेत तशी हिची अवस्था झाली. हरखून गेली ती तो अमोल ठेवा पाहून. त्या विश्वात रमली, रुजली, गुंतत गेली. विचारांचे तरंग तिच्या मनात उठत राहिले, त्यांना शब्दरूप देत गेली. यक्षपित्याला परमानंद झाला. चिमुकल्या यक्षकन्येचं कौतुक झालं. थोरामोठ्यांनी तिचे बोबडे बोल नावाजले. एका महान सिद्धहस्त व्यक्तिमत्त्वानं तिच्या शब्दबंधांनी प्रभावित होऊन तिचं गुरूपद स्वीकारलं, तिला आपला वारसा दिला. भरभरून आशिर्वाद दिले. ती फुलत गेली, बहरत गेली. तिचं शब्दविश्व समृद्ध होत गेलं. असेच दिवस सरत गेले.


मधल्या कालावधीत तिच्या आयुष्यात बरीच स्थित्यंतरं घडली. तिचं अवघं विश्व बदललं. ते बदल असे होते, की ती फुलता फुलता अचानक कोमेजूनच गेली! तिच्या संवेदना गोठून गेल्या, शब्द हरवून गेले, सूर दिसेनासे झाले. पंख कापलेल्या पाखरासारखी ती कैद झाली अदृश्य पिंज-यात. एका अनाकलनीय कोशात गुरफटून गेली. फुलपाखराचं सुरवंट झालं! यक्षपित्याच्या यातनांना अंत नव्हता. काय करून बसलो आपण हे? या मनस्विनीला असं कधीच पाहिलं नव्हतं, खुरटलेलं, सुकलेलं. त्याची धडपड सुरू होती, हिनं कोशाबाहेर पडावं म्हणून. पण खळाळून वहाणा-या नदीचं एका डोहात रूपांतर व्हावं, असं काहीसं तिचं आयुष्य बदलून गेलं होतं. वाट्याला आलेले भोग सोसत कोशालाच आपलं विश्व मानून ही मूक झाली होती. शब्दसुरांशी तिचं नातं तुटलं होतं इतर नाती सांभाळता सांभाळता. यक्षपित्याला कळत नव्हतं, हे असं का झालं.

एक दिवस त्यानं तिला गुरुदेवांकडे नेलं. त्यांना हिच्या शब्दसुरांच्या दुराव्याची हकीकत सांगितली. गुरुदेवांनी तिला बोलती करायचा खूप यत्न केला, पण ही आपली गप्पच. ते चिडले, रागावले, आणि हिला म्हणाले, "माझे शब्द लक्षात ठेव. एक दिवस असा येईल की लिहिल्याशिवाय तू जगू शकणार नाहीस!" ही बिचारी उगीच राहिली. पुन्हा गेली गुरफटून आपल्या कोशात. जसं काही कधी हे झालंच नव्हते. मध्यंतरी असा विचित्र वणवा आला, की हिचं जपलेलं सारं शब्दभांडार जळून खाक झालं! [हीच कशी वाचली न कळे!] मग सुरू झाला एक अविरत संघर्ष, स्वतःचा स्वतःशीच. गुरुदेव, यक्षपिता तोवर न परतीच्या वाटेवर गेले होते, आता ही एकटीच आपल्या कोशात. तिची स्फूर्तिदेवता तिच्यावर रुसली होती, की हीच रुसली होती स्वतःवर?

जवळजवळ दोन तपं अशीच सरली. तिच्या पिंज-याचे गज भक्कम होत गेले. कोशाच्या भिंती हवा सुद्धा आत जाणार नाही, अशा मजबूत झाल्या. आणि अचानक एक दिवस कुठूनतरी एक कोवळी सुगंधी झुळूक त्या कोशात शिरली. हे काय? ही आली कुठून? यक्षकन्या चमकली. हळूच डोकावून पाहिलं, तर हिच्या "उध्वस्त मांडवाच्या दारी वसंत"आलेला! फुलांचे गंधित बहर, कोकिळाचे मंजुळ गीत, उल्हासाचे खळाळते झरे, वा-याच्या सुरेल लकेरी घेऊन! हिनं मनाची कवाडं घट्ट बंद करून घेतली. जसं आपण काही पाहिलंच नाही! पण आतून ती अस्वस्थ झाली, वेड्या मनाची चलबिचल झाली. का हा असा अवेळी छळतोय? इथे न निखारा, न ठिणगी, शोधतोय काय हा या राखेत? सगळे कोंब जळून गेले वैशाखवणव्यात, आता कुणासाठी हा बहराचा निरोप घेऊन आलाय?

पुन्हा पुन्हा तो वेडा वसंत हिला खुणावत राहिला, ही पुन्हा पुन्हा त्याच्या आर्जवांना टाळत राहिली. त्याच्यापासून दूर दूर जाण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहिली.

तिची ही असोशी, चलबिचल, अस्वस्थता तिचंच रंगरूप घेऊन आलेल्या देवकन्यांनी जाणली. तिला पुसलं, " का अशी अस्वस्थ तू? होतंय काय तुला?"


हिनं आपलं मन त्या इवल्याशा देवकन्यांपुढे उलगडलं. त्या आनंदल्या, वठलेल्या वृक्षाला पुन्हा पालवी फुटू पहात होती, कोमेजलेली वेल पुन्हा उमलू पहात होती. त्या हसल्या. त्यांनी तिला सांगितलं, "विसर जगाला, जग जरा स्वतःसाठी. लिहीत रहा मनात येईल ते सारं, स्वतःसाठीच. नको कोमेजून जाऊस आता." त्यांनी तिला दिला फुलण्याचा वसा! कसा आहे हा वसा? घ्यावा कसा? वसावा कसा?

मनातली निराशेची जाळ्या-जळमटं काढून टाकावी, उदासीनतेचे रंग खरडून काढून उल्हासाचे, चैतन्याचे रंग भरावे, दारी आशेच्या फुलांचं, स्वप्नांच्या पानांचं तोरण बांधावं, सुंदर शब्दांच्या रांगोळ्या काढाव्या, सूर-तालांचे सनई-चौघडे घुमवावे, कल्पनेचा पाट मांडावा, मनोभावे स्फूर्तिदेवतेची आराधना करावी. ती आली, की तिला डोळ्यांतल्या निर्मळ पाण्यानं स्नान घालावं, आत्म्याचं निरांजन करून भावनांच्या ज्योतींनी तिची आरती करावी. ती प्रसन्न होऊन आशिर्वाद देईल. हा वसा कधीही, कुठेही घ्यावा, पण उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये!

हिनं देवकन्यांकडून वसा घेतला. आपल्या कोशातून बाहेर निघाली. त्या वेड्या वसंताच्या चरणी स्वतःला अर्पण केलं! मनात येईल ते, मनाला वाटेल तसं लिहित राहिली, स्वतःच स्वतःशी वाचत राहिली, देवकन्यांना दाखवत राहिली. पुन्हा सुरवंटाचं फुलपाखरू झालं.

करता करता एक दिवस स्फूर्तिदेवता आली, तिनं विचारलं,"ही शब्द-सुरांची आरास कुणी मांडली?" ही समोर आली, आणि देवतेच्या चरणी लागली. स्फूर्तिदेवता हिला पाहून प्रसन्न झाली. हिच्यातला आमूलाग्र बदल देवतेला सुखावून गेला. देवतेनं काय केलं? हिचे शब्द आभाळाच्या को-या पाटीवर मांडले. खट्याळ वा-यानं ते ओंजळीत घेतले आणि दिले उधळून आसमंतात! सगळ्या सीमा ओलांडून सातासमुद्रापल्याड पोहोचले शब्द तिचे! कुणी त्यांच्यात प्रतिसादांचे, कौतुकाचे रंग भरले आणि त्यांच्या चित्तवेधक रांगोळ्या झाल्या. मैत्रीचा, स्नेहाचा गंध माळून त्यांची फुलं झाली, आत्मीयतेच्या, आपुलकीच्या सुरांत गुंफून त्यांची गीतं झाली, प्रासादिकतेच्या कोंदणात जडून त्यांचे मंत्र झाले! ती हरखून गेली. तिनं मनोभावे देवतेला वंदन केलं. तशी देवतेनं तिला आशिर्वाद दिला, 'फुलत रहा!'

स्फूर्तिदेवता हिला म्हणाली, '"अग वेडे, फुलणा-याला सुकावं लागतंच, हा तर निसर्गनियम आहे. पण सुकावं लागणार आहे, म्हणून फुलण्याआधीच कोमेजणं हा शाप आहे, स्वतःच स्वतःला दिलेला! दिवस सरणार आहे, रात्र येणारच आहे आणि ती पुन्हा नवा दिवस आणणारच आहे, पण नवा दिवस उगवला तरी कवाडं-गवाक्ष बंद ठेवून अंधाराला जवळ करून "अजून रात्रच आहे, दिवस उगवणारच नाहीय" असं समजणं हा करंटेपणा आहे. आता तरी मोकळी हो या शापातून! सुख-दु:ख, हसू-आसू, आशा-निराशा सगळंच व्यक्त करत रहा. वसंत-शरद-वर्षाच नाही , तर ग्रीष्म-हेमंत-शिशिरालाही दे शब्दांचे फुलोरे. भावनांना कोंडू नकोस, संवेदनांना गोठवू नकोस. दु:खालाही दे शब्दांचं कोंदण आणि घडव त्यांचे मनमोहक अलंकार. काट्यांनाही फुलवत रहा, उजळत रहा मनात कल्पनांच्या ज्योती, मिटव घुसमटत्या अंधाराला. वैशाखवणवे येतच रहाणार, जुनं सारं जळतच रहाणार. पण एखादा हिरवा कोंब वळवाच्या एका थेंबाच्या मदतीनं पुन्हा देवराई वसवू शकतो, हे विसरू नकोस. अग, मनाला कुंपण, भावनांना वय, स्वप्नांना बंधनं, कल्पनेला भय आणि बहराला काळ-वेळ नसते कधीच! हो स्वतःच स्वतःचे स्फूर्ति आणि मिळव विजय मनावर!" मनातली वास्तुदेवता धीरगंभीर आवाजात बोलली "तथास्तु!" यक्षपिता आणि गुरुदेवांनी आसमंतातून आशिर्वादाची फुलं उधळली. देवकन्या आनंदल्या.

तिनं मनाशी निश्चय केला, "कितीही वणवे आले, वादळं आली तरी मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. फुलत राहीन गुलमोहरासारखी, वैशाखातही. काट्यांतही डौलानं फुलणा-या गुलाबकळीसारखी, कुंपणाला सजवणा-या मधुमालतीसारखी, सुकूनही गंध उधळणा-या बकुळीसारखी."

ती फुलतेच आहे, सुकेपर्यंत फुलत रहायचं व्रत मनोभावे करते आहे. जशी तिला स्फूर्तिदेवता प्रसन्न झाली, तशी तुम्हा-आम्हा सर्वांना होवो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

महिला आघाडीची जुगलबंदीचमकून जाऊ नका मंडळी. राजकारण हा माझा प्रांत नाही आणि ज्यांच्यावर मी हा लेख लिहितेय, त्यांचाही नाही.  तर हा लेख आहे हिंदी चित्रपट संगीतातील दोन किंवा अधिक गायिकांनी गायिलेल्या गाण्यांबद्दल. १९५० ते १९७०-७५ हे हिंदी चित्रपट संगीताचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात चित्रपट संगीतात अनेक प्रयोग झाले, ते सर्वांगांनी बहरलं. त्यातला एक प्रयोग होता द्वंद्वगीतांचा, जी दोन गायिकांनी गायिली आहेत. परवा कधीतरी सकाळी सकाळी "ना मैं धन चाहूं" हे अप्रतिम भजन ऐकलं आणि मग या दिशेनं मनाचा प्रवास सुरू झाला. सचिनदांच्या संगीतातलं काला बाजार या चित्रपटातलं हे सुरेल भजन ऐकताना आणि पहातानाही साक्षात देव दिसेल! लीला चिटणीस आणि बेबी नंदा यांचा तरल अभिनय, गीताबाई आणि सुधा मल्होत्रा यांचे भावपूर्ण गायन आणि ऐकणारे उदंड रसिक! असंच यमन रागातलं हे भजन राजेश रोशन यांनी संगीत दिलेलं. आशाबाईंचा आलाप अगदी गाभा-यातून यावा तस्सा! हे फक्त श्रवणीय! [अर्धं भजन होईपर्यंत छोटा छोटा स्कर्ट घातलेल्या लक्ष्मीबाईंना पहावं लागतं त्यात!] हे आहे जुलीमधलं 'सांचा नाम तेरा | तू श्याम मेरा'.

सचिनदांच्याच संगीतात एक अत्यंत भन्नाट जुगलबंदी आहे, मधुबालाचा खट्याळपणा आणि मीनू मुमताजचा अवखळपणा यांचं सुरेल रूप आशाबाई आणि गीताजींच्या आवाजात. रसिकांनी ओळ्खलं असेलच म्हणा, तरीही दुवा देते ही पहा मैत्रिणींची छेडछाड! "जानूं जानूं री". काय ठेका, काय ठसका! पहिल्या 'जानू' मध्येच घायाळ! असंच अल्लड शशिकला आणि शांत नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सुमधुर गीत! "बचपन के दिन भी क्या दिन थे". सचिनदांचा हा अंदाज पण अगदी सही! चलती का नाम गाडी या चित्रपटातलं खूप कमी ऐकायला मिळणारं हेलनवर चित्रित एक जुगलबंदी गीत आहे 'हम तुम्हारे हैं जरा घरसे निकलकर देखो' या गाण्यातला तबला! [माझ्या अंदाजाप्रमाणे तो रूपक ताल असावा, तज्ञांनी मार्गदर्शन करावे.] हेच ते सुधा मल्होत्रा आणि आशाबाईंचे गाणे.

ही झाली पिताश्रींची कमाल. छोटे मियां तरी कुठे मागे राहिलेत? आठवते ही पडोसन? "मैं चली मैं चली" मस्त पिकनिक सुरू आहे सायकलवर! पंचमदांचा अंदाज काही औरच! क्या बात है! आशाबाई, लताबाई आणि भन्नाट पिकनिक! याला म्हणतात गाणं!

आपले एलपी, लक्ष्मी-प्यारे यांनी तर सुरुवातच अशा जुगलबंदीनं केलीय! हा "नूरानी चेहरा" आठवला? हेलनबाई, लताबाई, कमल बारोट आणि सुरेखसं गाणं. भेंड्यांमधलं हमखास गाणं.

त्यांचाच हा एक अंदाज पहा. कव्वालीच ना ही? "ऐ काश किसी दीवाने को " [आशाबाई आणि लताबाईंची. आशा पारेखबरोबरची सहनायिका कोण, ते आठवत नाही! कुणी सांगेल का?]

आणि हा पंजाबी लहजा? "नी मैं यार मनाना णी" लताबाई आणि मिनू पुरुषोत्तम यांचं हे ठसकेबाज गाणं मनात ठसतं. हा एक नाजूकसा अंदाज एलपी, आशाबाई आणि लताबाई यांचा. रेखा आणि अनुराधा पटेल, "मन क्युं बहका ". हे सगळे याच महान व्यक्तिमत्वांचे विविध अंदाज. किती ऐकावं आणि किती नाही ?

आता मोहरा शंकर जयकिशनजींकडे. त्यांच्या संगीतातली प्रोफेसरमधलं 'हमरे गांव कोई आयेगा', जानवरमधलं ' आंखों-आंखों में किसीसे बात हुई' चोरी चोरीमधलं 'मनभावन के घर जाये गोरी', आणि जिस देशमें मधलं 'क्या हुआ ये मुझे क्या पता?' हे पद्मिनीवर चित्रित झालेलं गीत! पण या सगळ्यांपेक्षा मला आवडतं ते बसंतबहारमधलं हे अप्रतिम गीत! "कर गया रे" निम्मीच्या चेह-यावरचे भाव, लताबाईंचा आवाज आणि तो जीवघेणा प्रश्न "पत्थर की मूरत के दर्शन करा दूं?" वा! दु:ख इतकं सुरेल असतं?

असंच सुरेल दु:ख नौशादमियांच्या मदर इंडियामधल्या "दुनियामें हम आये हैं तो जीनाही पडेगा" मध्ये दिसतं. असं गाणं गात दु:खाला, संकटाला सामोरं गेलं तर ते नक्कीच विरघळेल!

नौशादमियांच्या "मेरे मेहबूब में क्या नहीं"  कव्वालीचा थाट काय वर्णावा! साधना आणि अमिताची अहमहमिका, कुणाचा सखा जास्त सुंदर! आणि ही छेडछाड शेवटी दोघींचा सखा एकच तर नाही? या शंकेवर संपते! लताबाई आणि आशाबाई या रिद्धी-सिद्धी तर नाहीत?

मुगलेआझमची निगार आणि मधुबालाची कव्वाली, चढेल निगारला गुलाब, तर नम्र, लीन मधुबालाला काटे, "जहेनसीब, कांटों को मुरझाने का खौफ नहीं होता!" शमशादजी आणि लताबाई! क्या बात है! "किस्मत आजमाकर हम भी देखेंगे!"

संगीतकार रवी यांची चौदहवी का चांद मधली 'शरमाके ये क्युं सब परदानशीं आंचल को संवारा करते हैं?' ही देखिल आशाजी आणि शमशादजी यांची सुरेल जुगलबंदी! जुन्या झीनत चित्रपटातली 'आंहे न भरी शिकवे न किये' ही लहानपणच्या नूरजहांची आणि ब-याच इतर गायिकांनी गायिलेली कव्वाली पण याच माळेतली!

कव्वालीवरून आठवलं, रोशनजींच्या 'बरसात की रात' मधली 'ना तो कारवां की तलाश है' या कव्वालीत एक सुरेल अंतरा आशाबाई आणि सुधा मल्होत्रा यांच्या आवाजात आहे, चारच ओळींच्या त्या अंत-याची सुरुवात आशाबाईंच्या आलापानं होते, तो आलाप अक्षरशः काळजात घुसतो! शामाच्या चेह-यावरची निराशा, तबस्सुमचा अगतिकपणा आणि बस! याच चित्रपटात सुमन कल्याणपुर आणि मुबारक बेगम यांचं हे गौडमल्हारातलं अप्रतिम गीत! "गरजत बरसत सावन आयो रे" सावन असाच यायला हवा ना सुरेलपणे? आणि चित्रलेखाला कोण विसरेल? 'काहे तरसाये जियरा' या कलावती रागातल्या गीताची मोहिनी कधीतरी कमी होणं शक्य आहे? आशाबाई आणि उषाबाईंचं हे अप्रतिम गीत अजूनही ताजंतवानं आहे, फुलत्या गुलाबासारखं!

काही पोशाखी चित्रपटांत अशी गाणी नेहमीच येत गेली. जी. एस. कोहली यांचं "तुमको पिया दिल दिया" कसं विसरणं शक्य आहे? याच चित्रपटात [शिकारी] हेलन आणि रागिनी यांच्यावर चित्रित "मांगी हैं दुवाएं हमने सनम" कमी ऐकायला मिळतं पण तेही सुरेख आहे. बर्मा रोड नामक चित्रपटात एक असंच सुंदर गीत आहे, कुमकुमवर चित्रित असलेलं. लताबाई आणि उषाबाई यांचं हे गीत आहे, "बांके पिया कहो हां दगाबाज हो" हेच ते चित्रगुप्त यांच्या संगीतातलं गीत. तसंच परवरीश या चित्रपटात 'जाने कैसा जादू किया रे बेदर्दी बालम'  हे आशाबाई आणि सुधा मल्होत्रा यांचं गीत, संगीत इक्बाल कुरेशी यांचं!

आता अण्णांची गाणी! "अपलम चपलम" आजही प्रत्येक नृत्यस्पर्धेत ठाण मांडून बसलेलं आहे. किती वर्षं झाली, तरी त्याची गोडी अवीटच आहे! शारदामधलं शामा आणि मीनाकुमारीवर चित्रित हे अप्रतिम गीत "ओ चांद जहां वो जायें" आज जरी त्याची पार्श्वभूमी मोबाइल युगामुळे बदलली असली, तरी ते गाणं मनात जे घर करून राहिलेलं आहे, ते तिथेच आहे! लताबाई आणि आशाबाई! याच जोडीचं "सखी री सुन बोले पपीहा उसपार" मिस मेरीमधलं गाणं. मीनाकुमारी आणि जमुना. अप्रतिम बिहाग बरसतोय जसा! त्या सुरेल, मधुर ताना ऐकताना देवाचे आभार मानावेसे वाटतात, की त्यानं आपल्याला श्रवणशक्ती दिली! मंगेशकर घराणं नसतं तर हिंदी चित्रपट संगीताचं काय झालं असतं, देव जाणे!

ओपीजींची "रेशमी सलवार कुरता जाली का " [नया दौर] कुमकुम आणि मिनू मुमताजवर चित्रित केलेली ठसकेबाज रचना भेंडीच्या खेळात हमखास आठवतेच. तसंच "कजरा मुहब्बतवाला " [किस्मत] धमाल गाणं! मात्र हे फक्त ऐकायचं गाणं आहे. बायकी अवतारातला विश्वजीत नाचताना पाहून डोळे बंद करावेसे वाटतात. बबिता जरा बरी तरी दिसते! पण गाणं ही ऐकायचीच गोष्ट आहे ना! आशाबाई आणि शमशाद यांचं हे गाणं कमालीचं लोकप्रिय झालंय. [म्हणूनच त्याचे रिमिक्स करून भ्रष्ट नक्कल केली जाते!]

बाबू नामक संगीतकारानं संगीतबद्ध केलेलं गीताजी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायिलेलं सारा जहां हमारा या चित्रपटातलं एक नाजूक, गोड गाणं "फुलवाबंद महके, देखो लहके डाली डाली" यातल्या दुस-या ओळीत "भंवरा करे फेरे, मोहे घेरे अरी आली" मधल्या 'आली'वर सुमनजींची छोटीशी गोड मोहक मुरकी क्या कहने! तसंच हीरामोतीमधलं भोजपुरी ढंगाचं "कौन रंग मुंगवा कवन रंग मोतिया" हे निरुपा रॉय आणि शुभा खोटे यांचं गाणं मला नेहमीच साधी माणसं मधल्या "राजाच्या रंगम्हाली रानी ही रुसली" या सुलोचना आणि जयश्रीबाई यांच्या गाण्याची आठवण करुन देतं. वसंत देसाई यांच्या सुमधुर संगीतानं आणि बिस्मिलाखांजींच्या सनईनं गाजलेल्या गूंज उठी शहनाई मधलं गीताबाई आणि लताबाई यांचं "अखियां भूल गयी हैं सोना" हे छेडछाड करणारं सुंदर गाणंही याच पठडीतलं. किती गाणी आठवावीत, किती साठवावीत आणि किती ऐकावीत! विविधभारतीच्या भूले बिसरे गीत या रोज सकाळी ६.३० ते ७.३० लागणा-या कार्यक्रमात अशी बरीच अनमोल गाणी ऐकायला मिळतात, आणि सकाळ प्रसन्न होते, दिवस चांगला जातो. पण एरवी ही गाणी बरीच कमी ऐकायला मिळतात.

आणि आता शेवटी अत्यंत अनमोल रत्न! मदनमोहनजींची ही रचना आजकाल खूप कमी ऐकायला मिळते, पण ती ऐकणं म्हणजे केवळ स्वर्गसुख आहे! लताबाईची पुन्हा एक वेड लावणारी ही अप्रतिम कव्वाली. दुल्हन एक रात की मधली "कभी ऐ हकीकत-ए-मुंतजर नजर आ लिबासे-मजाज में ". आरंभसंगीतापासून मनाची पकड घेणा-या या गीतातल्या लताबाईंच्या पहिल्या तानेला कशाची उपमा द्यावी, हा गहन प्रश्न आहे! त्या आवाजाला, त्या कलेला 'अन्य नसे उपमान!' एका उर्दू गझलला दिलेलं कव्वालीचं हे रूप इतकं अप्रतिम आहे! आणि खास उर्दू लहजा! कलेजा खलास झाला, अशीच अवस्था हे गीत ऐकल्यावर होते. मदनमोहन खरंच सुरांचे जादुगार होते!

तो आला!

अखेर एकदाचा तो आला! तब्बल ६ ते ८ महिने काहिलीत राहिलेल्या जीवासाठी जरासा का होईना, उतारा घेऊन आला! पण असा अचानक? दुपारी १ वाजता ऑफिसमधून ५ मिनिटांच्या रस्त्यावर असलेल्या बँकेत जाऊन येईपर्यंत सगळ्या आयुधांना [पक्षी - सनकोट, स्कार्फ, हातमोजे, बूट इ. इ. ] पुरून उरणा-या उन्हानं निखा-यावर मक्याचं कणीस भाजावं, तसं भाजून काढलं होतं. आल्यावरही पंखे, कूलर, एसी यांना दाद न देणारा प्रचंड उकाडा! ढगाच्या तुकड्याचाही मागमूस नाही!


आणि अचानक ४.३० च्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले, एकदम अंधारच झाला! गणेश चतुर्थीला गणपती आणायला जाताना एखाद्या दादानं एक जोरदार हाळी मारावी, आणि पाचपन्नास पोरं गोळा करावी, संदलवाल्यानं, ढोलवाल्यानं जोशात वाजवायला सुरुवात करावी आणि पोरांनी हवा तस्सा धुडगुस घालावा, तसं यानं भराभरा काळे ढग गोळा केले, गडगडून ढोलताशे वाजवले आणि केली सुरुवात धिंगाणा घालायला! मातीचा गंध मनात भरून गेला! सगळं वातावरणच बदलून गेलं एकदम!

ऐन ऑफिस सुटायच्या वेळेला आला, पण आज त्याचा राग नाही आला. वेधशाळेचा अंदाज होता तो येईल असा, त्यामुळे रेनकोट सोबत ठेवायचं कारण नव्हतं! मग काय! तो इतक्या कौतुकानं आला, आणि त्याच्या जाण्याची वाट पहात बसायचा करंटेपणा कोण करणार? मस्तपैकी गाडीला किक मारली, आणि निघाले भिजत भिजत! म्हटलं, होऊ दे सर्दी झाली तर! या मोसमाचा पहिला वहिला बहुप्रतिक्षित सखा आलाय आणि आपण नाजुकपणा करायचा? ऑफिसपासून अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर असणा-या घरी यायला अर्धा तास लागला. जोर तर भरपूर होता त्याचा, अक्षरशः डोळ्यांवर फटके मारावेत, तसे थेंब पडत होते, निम्मा रस्ता तर डोळे झाकून चालवावी, तशी गाडी चालवली. रस्त्यावर माझ्यासारखेच तुरळक वेडे दुचाकी घेऊन होते, बाकी चारचाकीवाले, आणि रस्ता बराचसा मोकळा! पण आजची ही संधी दवडणं शक्य नव्हतं! चिंब भिजून घरी आले, तर तो थांबूनच गेला!

उद्या कदाचित तो याच वेळेला आला, तर त्याचा राग येईल, त्याच्यापासून वाचण्याची आयुधं बरोबर ठेवायचं संकट वाटेल, रस्त्यावरचं पाणी अंगावर उडवणा-या चारचाकीवाल्याला ठेवणीतल्या शेलक्या विशेषणांनी झाडलं जाईल, पण आजचा त्याचा आनंद वेगळाच! याचं वर्णन करायला सगळ्या भाषांमधले सगळे शब्द अपुरे पडतील!हे माझं वेडंवाकुडं निरुपण त्या लाडक्या सख्या पावसासाठी!

एका तळ्याची गोष्टकिती तपं लोटली या गोष्टीला! एक सुरेखसं तळं होतं. शांत, नितळ, स्वच्छ निळंशार पाणी. काठावरची हिरवीगार उंच उंच झाडं वाकून प्रतिबिंब पहायची त्यात. आभाळही आपली निळाई शोधायचं त्या तरल पाण्यात. चिमणी पाखरं जाता येता हळूच आपल्या इवल्याशा चोचीत इतकासा थेंब वेचून हलकेसे तरंग उठवून जात. सूर्याचे किरण सकाळ-संध्याकाळी त्या पाण्यात सोन्याच्या राशी ओतत असत. तळं खूप आनंदात होतं.


अचानक सगळं चित्र बदललं. कोणा एकानं गंमत म्हणून तळ्यात एक खडा टाकला. तळ्याचा थरकाप झाला. नितळ पाण्यावर कितीतरी तरंग उठले. त्या एकाला अजूनच गंमत वाटली. त्यानं आणखी एक खडा टाकला. तरंग उठतच राहिले. आता हा एक नवा खेळच झाला! कोणीही यावं, तळ्यात खडे टाकावे, कोणाचा खडा लांब जातो, किती जास्त तरंग उठतात अशा चढाओढी सुरू झाल्या. दोन तपं लोटली, खेळ सुरूच राहिला.

तळ्याच्या वेदनांचा विचारच नाही केला कुणी. खड्यांनी केलेल्या जखमा वहात राहिल्या, चिघळत राहिल्या. नितळ निळाईला हळू हळू रक्ताच्या लाल रंगानं वेढलं. खड्यांवर हिरवट, निसरडं शेवाळ पसरत गेलं, आणि पहाता पहाता त्या सुंदरशा तळ्याचं काळाकभिन्न, कुबट डोहात रूपांतर झालं. त्याचा भोवतालही बदलत गेला. पाखरांनी तळ्याची वाट सोडली. काठावरची झाडं सुकून गेली, निष्पर्ण, शुष्क खोडांवरच्या उजाड ढोल्यांमध्ये घुबडांनी घरटी बांधली.

आभाळानं तळ्यात डोकावणं सोडून दिलं. सूर्यकिरणांनीही पाठ फिरवली त्याच्याकडे. आता एकाकी तळं, तळं कुठं राहिलं? तो काळा डोह, घुबडांचे चीत्कार, ती निष्पर्ण खोडं, उजाड, भकास, एखाद्या भयकथेच्या पार्श्वभूमीसारखं! त्यालाही दोन तपं लोटली. डोह आहे तसाच राहिला, चैतन्याची वाट पहात!

आजच कुठूनतरी मंद, हलकासा सुगंध दरवळला वा-यासवे. प्राजक्त तर नाही हा? कुणा पाखराचे मंजुळ सूरही येताहेत कानी. कशाचे हे संकेत? तुला काय वाटतं, बदलतील दिवस तळ्याचे?

होय! नक्कीच बदलणार आहेत! कोणा एकानं त्या डोहातलं शेवाळ काढायला सुरुवात केलीय. हळू हळू ते शेवाळ, खडे सगळं निघून जाईल, तळ्याचं पाणी पुन्हा नितळ निळं होईल, सकाळ-संध्याकाळी सोन्याचं रूप घेईल, आभाळ पुन्हा उतरेल त्या पाण्यात. झाडं पुन्हा हिरवी होतील, पाखरं पुन्हा चोचीनं हलकेसे तरंग उठवतील, त्यांच्या इवल्याशा पावलांचे ठसे जपत तळं पुन्हा हसायला लागेल.
भाग्यश्रीन खो दिला, म्हणून उत्तरं दिली खरीखरी, तर नाही पचली! माझा अख्खा ब्लॉग गायब झाला! आता हा नवा बनवला. पहिलाच तास प्रश्नोत्तराचा!
 1.Where is your cell phone?

हा काय माझ्यासमोर बसून गाणी गातोय! [त्याच काम तेवढच आहे!]
2.Your hair?

अगदी सरळ [माझ्यासारखे], कायम गळ्यात असतात, {थेट जमिनीपर्यंत [गळतात हं!]}
3.Your mother? 4.Your father?

जगातले आदर्श आई-बाबा. बाबा आता नाहित, फक्त त्यांच्या स्मृति आणि संस्कार उरले आहेत.
5.Your favorite food?
आयतं मिळणार असेल तर सगळ आवडतं.[फक्त शाकाहारी!]
6.Your dream last night?

झोपेत पाहिलेलं की जागेपणी?
7.Your favorite drink?

फिल्टर कोंफी [स्पेशल]
8.Your dream/goal?

स्वप्न, ध्येय, आशा यांची होतसे का कधी पूर्ती? कशासाठी जपतो या आम्ही भंगणा-या मूर्ति?
9.What room are you in?

हॉल कम स्टडीरूम
10.Your hobby?

गाणी ऐकणे, माझ्या चार पायांच्या लेकराशी खेळणे
11.Your fear?

डरना मना है!
12.Where do you want to be in 6 years?
६ वर्षं? किती उरलीत कुणास ठाउक! आणि असलीच तर इथेच, नागपुरात.
13.Where were you last night?
अर्थातच घरात, याच जागेवर!
14.Something that you aren’t diplomatic?

I hate diplomacy .
15.Muffins?

-----
17.Where did you grow up?

सोलापूर [चादरींच गाव]
18.Last thing you did?

नवा ब्लॉग बनवला.
19.What are you wearing?

सलवार कुर्ता
20.Your TV?

सोनी [बिच्चारा, माझ्या राज्यात बंद असतो.]
21.Your pets?

जर्मन शेफर्ड ४ वर्षांचा. Don नाव आहे त्याचं. [आहे पण नावासारखा!]
22.Friends?

भरपूर. [जिवाभावाचे दोन - friend is one soul dwelling in two bodies   असे.]
23.Your life?

जिंदगी तुझको  तो बस ख्वाब में देखा हमने!
24.Your mood?

मस्त!
25.Missing someone?

missing myself !
26.Vehicle?

हीरो होंडा प्लेझर.
27.Something you’re not wearing?

बुराई का कफ़न
28.Your favorite store?

समोरचं किराणा दुकान [तिथं माझी आवडती kitkat  असते  हवी तेव्हा.]
29. Your favorite color?

हिरवा. [लेक हरितक्रांति म्हणते.] Black   तर जिवलग! [ग्रीष्म  सोडला तर कायम संक्रांत सुरु असते.
30.When was the last time you laughed?

पीएचडी करावी लागेल!
31.Last time you cried?

हा पण संशोधनाचा विषय आहे यार!
32.Your best friend?

सृजन [माझं लेखन आणि काव्य], संगीत.
34.One person who emails me regularly?

है कोई. सबको क्यों बताएं? [ती मीच]
35.Favorite place to eat?

भुकेला गरमागरम जिथे मिळेल ती.
आता ही उत्तरं तरी चालतील का जालाला की पुन्हा ब्लॉग गायब?