Thursday, December 30, 2010

संध्याछाया भिवविती हृदया

मराठी कविता ही प्रत्येक मराठी मनाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मुळात कळायला लागायच्याही आधीपासून, अगदी डोळे उघडल्यापासून आईची, आजीची, अंगाई, मावशीची, आत्याबाई, काकू यांची कौतुकाची बाळगाणी इथूनच मराठी मनाची कवितेशी तोंडओळख होते. कधी निंबोणीच्या झाडामागे झोपलेला चंद्र खुणावतो तर कधी पापणीच्या पंखात स्वप्नांची पाखरं झोपतात. बाळाची झोप झाल्यावर अंघोळ घालताना गंगा-यमुना-भागीरथी गाणी गात बाळाला रिझवतात.
अडगुलं-मडगुलं, सोन्याचं कडगुलं,
रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा तीट लावा
असं गात गात बाळाचा नट्टापट्टा केला जातो, घास भरवताना काऊ-चिऊ, मनीमाऊ, गोठ्यातली गाई-वासरं सार्‍यांना गोळा करून खेळीमेळीत अंगतपंगत केली जाते. हा गीतसोहळा असा प्रत्येक प्रसंगाशी बांधलेला असतो जसा काही! म्हणूनच बालपणापासून मराठी माणूस आणि कविता यांचं अतिशय अतूट असं नातं आहे. हे सगळं कौतुक सांगायचा उद्देश एवढाच, की लहानपणापासून ऐकलेल्या, शिकलेल्या, वाचलेल्या असंख्य कवितांपैकी काही कवितांशी आपलं इतकं सख्य जुळून जातं, की कुठेही, कधीही ती कविता आपल्या मनात रुंजी घालत रहाते. अगदी जिवाभावाची सखी होते ती कविता आपली.

माझी अशी सखी असणारी कविता आहे कविवर्य भा. रा. तांबे यांची "रिकामे मधुघट" ही! जशी कवितेशी पहिल्या दिवसापासून नाळ जुळलेली, तशीच गाण्याशीही जुळल्यामुळे लताबाईंच्या सुमधूर आवाजात ती सतत ऐकलेलीच होती, आणि जुन्या एसएससीच्या कुठल्याशा अभ्यासक्रमाच्या क्रमिक पुस्तकातही ती होती. माझे बाबा जुन्या एसएससीचे मराठी, इतिहास, भूगोल या विषयांचे क्लास घ्यायचे घरी. त्यावेळी बाबांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना ही कविता समजावून दिली होती आणि तिचं जे रसग्रहण, निरूपण केलं होतं, ते त्या लहान वयात म्हणजे साधारणपणे ६ ते ७ वर्षाच्या वयात जे डोक्यात बसून गेलंय, ते आजही तिथंच, तस्संच आहे! तसं तर ते वय या गोष्टी कळायचं नव्हतंही, पण कळत्या वयात तो अर्थ इतका भिनून गेला, की आजही "मधु मागसी माझ्या सख्या परी" हे गाणं कुठेही लागलं की डोळ्यांसमोर येतो बाबांचा तो क्लास, ते अगदी एकतान होऊन कविता समजावून सांगणारे बाबा, ते तल्लीन होऊन ऐकणारे विद्यार्थी आणि ते निरूपण!

भा. रा. तांबे यांच्या कविता कितीतरी विषयांना स्वत:त सामावून घेणार्‍या! अगदी प्रेम, भक्ती, जीवनाचं सार, नाती, निसर्ग, मानवी प्रवृत्ती असा मोठा आवाका आहे त्या काव्याचा. पण त्यांचा स्वत:चा अतिशय आवडता विषय म्हणजे मृत्यू! या विषयावर त्यांच्या बर्‍याच कविता दिसतात. "जन पळभर म्हणतील हाय हाय" "मरणात खरोखर जग जगते" आणखीही कितीतरी! "रिकामे मधुघट" ही कविता जरी त्या विषयावरची नसली, तरी जवळपास जाणारी, त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीची. ती प्रेमकविता नाही, तर आयुष्याचं अद्वितीय तत्वज्ञान सांगणारी, कलावंताची तळमळ, कळकळ, अगतिकता दाखवणारी ती कविता आहे! आणि उतरत्या काळातल्या प्रत्येक कलावंताचीच ती कहाणी आहे! त्या काळात कुणी मित्र सहजच त्यांना म्हणाला होता, "तांबेजी, बर्‍याच दिवसांत तुम्ही काही नवीन लिहिलं नाहीत, तुमच्या नवनव्या रसभरीत कविता ऐकायची, वाचायची इतकी सवय लागलीय मनाला, ऐकवा ना काहीतरी नवं!" यावरचं उत्तर म्हणजे हे उत्कट काव्य!

मधु मागसी माझ्या सख्या परी
मधुघटचि रिकामे पडती घरी!
सख्या, अरे तू काव्याचा, कल्पनेचा, नाविन्याचा मध मागतोयस खरा, पण या मनात आता नवीन काही येत नाहीय रे! काहीच सुचत नाहीय! कल्पनेच्या मधाच्या घागरी जशा रिकाम्या पडल्या आहेत! एका कलावंताची ही विलक्षण खंत आहे. उतारवयात नवं काहीतरी करण्याचा अट्टाहास कशासाठी?

आजवरी कमलाच्या द्रोणी
मधू पाजिला तुला भरोनी
सेवा ही पूर्वीची स्मरोनी
करी न रोष सख्या, दया करी!
किती हा विनय, किती ही समर्पणभावना! रसिका, आजवर तुझ्यासाठी खूप सुंदर सुंदर काही लिहिलं, खूप काही दिलं तुला, विविध प्रकारांनी तुला हव्या त्या पद्धतीनं मांडणी केली, तुझी मनोभावे सेवा केली ती लक्षात घे आणि आता मला काही जमत नाहीय, याचा राग नको धरूस रे मनात! एवढी दया कर माझ्यावर! [आठवला गुरुदत्तजींचा "कागज़ के फूल"? तसेच त्यांचे स्वत:चे शेवटचे दिवस? स्व. गीता दत्त यांनीही सचिनदांना फोन करून म्हटलं होतं, "दादा, आप तो हमें भूल ही गए!" आणि मग त्यांनी कनू रॊय यांच्या संगीतनिर्देशनातील "अनुभव" चित्रपटातली "कोई चुपकेसे आके" आणि "मुझे जा न कहो मेरी जां" ही दोन गाणी त्यांना दिली होती.] पडत्या काळात कलावंताचा हाच अनुभव असतो का? आणि तोही प्रत्येक क्षेत्रात? तो अनुभव तांब्यांच्या या चार ओळीत किती सहजी व्यक्त झालाय!

नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठी
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशी तरी!
सगळं काही संपलंय रे आता! अगदी मोजकंच उरलंय आयुष्य! पूर्वीचं सारं सारं काही सरलंय! सारा मान-सन्मान, हारतुरे, तो दिव्यांचा लखलखाट सगळं विसरलोय मी. आता फक्त माझं, माझ्यापुरतं राहिलंय आयुष्य! रसिकाला देव मानणार्‍या या कलावंताजवळ आता मधुमधुर काही उरलं नाहीय, केवळ इवलीशी दुधाची वाटी आहे नैवेद्यापुरती या रसिकदेवतेसाठी! या उरल्यासुरल्या दिवसांत जे काही सुचेल ते, सुचेल तसं तुला द्यायचा प्रयत्न करतोय, ते गुलाबासारखं डौलदार, मोगर्‍यासारखं सुगंधी नाहीय, तर विनासायास कुठंही उगवणार्‍या आणि दुर्लक्षितपणे फुलत रहाणार्‍या कोरांटीसारखं आहे. पण कोरांटी जरी दुर्लक्षित असली तरी तिचं हे वैशिष्ट्य आहे, की ती देवपुजेला चालते! म्हणजेच रसिकाला देव मानून या कलावंतानं हे आर्जव केलंय की जे काही मी या शेवटच्या दिवसांत तुला देतोय, ते थोडं कमी दर्जाचं असेल, पण टाकाऊ नक्कीच नाही! अरे, देवासाठी का कुणी काही टाकाऊ देतं? तेव्हा तेही तू सांभाळून ठेव, कसंतरी का होईना, पण सांभाळ! देवाला नैवेद्य दाखवणं महत्वाचं, मग तो अगदी पंचपक्वानांचा असो, की घोटभर दुधाचा!

तरुणतरुणिंची सलज्ज कुजबुज
वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज
संसाराचे मर्म हवे तुज
मधु पिळण्या परी बळ न करी!
तांब्यांच्या कवितेत काय नाहीय? प्रेमकाव्य आहे [डोळे हे जुल्मी गडे, नववधू प्रिया मी], निसर्गसौंदर्य [पिवळे तांबुस ऊन कोवळे]. भक्ती [भाग्य उजळले तुझे चरण पाहिले], जीवनविषयक तत्वज्ञान [जन पळभर म्हणतील, कळा ज्या लागल्या जीवा, घन तमी शुक्र बघ राज्य करी]
काय नाही दिलंय मी तुला रसिका? प्रेम दिलं, निसर्गाचं कौतुक दिलं, संसाराचं, जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं, आता मात्र तू यातलं काहीही मागू नकोस! रसिक म्हणून तुझा माझ्यावर हक्क आहे खरा, पण आता तो गाजवू नकोस, एवढीच विनंती!
जोरजबरदस्तीनं उतारवयात कलाकारानंही लोकांना आवडेल म्हणून किंवा नाव रहावं म्हणून काहीही वाटेल ते करू नये, रसिकानंही त्या कलावंताकडून तशी अपेक्षा करू नये आणि त्याचं हसं करू नये, त्याला सन्मानानं निवृत्त होऊ द्यावं ही कळकळ या शब्दांतून कवींनी व्यक्त केलीय, आणि ती कालातीत आहे, आजही ती समर्पक आहे! [तलत मेहमूद यांच्या रेशमी आवाजातलं "बेचैन नजर बेताब जिगर" हे यास्मीन चित्रपटातलं गीत पूर्वी रेकॊर्ड झालेलं आणि नंतर कधीतरी त्यांनी गाइलेलं यातला फरक दर्दी रसिकाला अगदी चटकन जाणवतो, आणि मग लगेच "अरेरे" नाही तर "छे, हे काहीतरीच वाटतंय" असे उद्गार निघतात त्याच्या तोंडून!] ही वेळ रसिकानं आपल्या आवडत्या कलाकारावर आणू नये, हेच कवींचं सांगणं असेल ना?

ढळला रे ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविती हृदया
अता मधूचे नाव कासया
लागले नेत्र रे पैलतिरी!
अरे, आता माझे दिवस संपले! सांज आलीय आयुष्याची! त्या लांबत जाणार्‍या सावल्या भीती दाखवतात रे! त्या हेच सांगतात की तुझी सद्दी संपली! आता मधाची अपेक्षा नकोस करू माझ्याकडून! तारुण्यात जे काही उत्तम, गोड, सुंदर, मधुर देता आलं तुला माझ्या कलेच्या माध्यमातून, ते सारं काही दिलं, पण आता आयुष्याच्या उतरणीवर अशी काही अपेक्षा ठेवू नकोस रसिका! अरे, आता मला पैलतीर खुणावतोय! तिकडे जायचे वेध लागले आहेत! आता उरलेलं आयुष्य ईशचिंतनात घालवू दे मला, काहीतरी भलतं नको मागू सख्या!

डोळ्यांत पाणी आणणारी ही अप्रतिम काव्यरचना केवळ एका कवीच्या आयुष्यापुरती मर्यादित नाही, तर ती जवळजवळ प्रत्येक कलाकाराची मनोव्यथा आहे.  अर्थात अखेरच्या श्वासापर्यंत रंगमंच गाजवणारे विठ्ठल उमपही असतात पण ते एखादेच, वयाच्या सत्तरी-पंचाहत्तरीतही आपल्या आवाजाच्या मोहिनीनं जनतेला वेड लावणार्‍या लताबाई-आशाबाईंसारख्या देवकन्या रोज रोज येत नसतात या विश्वात! कोणे एके काळी अगदी डोक्यावर घेऊन नाचणारा रसिक उतरत्या काळात विदूषकी भूमिका करून पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करणार्‍या कलाकाराला संपूर्णपणे दुर्लक्षित करतो, कधी त्याची कीव करतो तर कधी त्याचं नावही विसरून जातो, त्याला बदनाम करायलाही मागेपुढे पहात नाही! यात त्या रसिकाची काही चूक नाही, ही समस्त मानवजातीची मानसिकताच आहे.  त्यामुळे त्या कलाकारानंच आपलं हसं करून घेण्यापूर्वी मानानं निवृत्ती स्वीकारावी. आणि रसिकानंही त्याला बाध्य करू नये तसं करायला. कदाचित याला कुणी पलायनवाद म्हणेल, कुणी हार म्हणेल त्या कलावंताची. पण आपली पत ठेवून सन्मानानं जगणार्‍या कलावंतासाठी ही कविता नक्कीच एक प्रेरणा आहे!

4 comments:

  1. अगदी..खरं हे...जेवढ्या १० ओळी लिहिलेल्या आपल्याला समजायला अन् वाचायला वेळ लागतो..पण कवितेच्या चार ओळी अगदी सगळं अगदी सहज समजून सांगतात....अन् हेच कवितेचे वैशिष्ट आहे ........

    ReplyDelete
  2. ’कवितेचे” रसग्रहण खूप भावले.

    नववर्षाच्या शुभेच्छा!

    ReplyDelete
  3. he asa ahe????


    surprising!!!


    hee kavita kalakar ani rasik yanchyat aahe ase vatat nahi...

    ha ek arth asu shakto, no doubt

    but jast barobar vatnara arth - prem ani utaravashta..ya baddal chach ahe..


    kadachi baba nni 7vya varshi sagale arth samjavle nastill

    ReplyDelete