"हॆलो"
"आपण क्रांति साडेकर बोलताय?"
"हो. आपण कोण बोलताय?"
"मागेन एवढे मी, हातून या घडावे
काही नवे, निराळे अन् जातिवंत आता!
या आपल्या ओळी खूप भावल्या, म्हणून आवर्जून फोन केला."
तेव्हा मला लक्षात आलं की आज बुधवार, सकाळमध्ये गझल-गुंजन या सदराचा समारोप करताना माझी "माझा वसंत" ही गझल निवडली आहे असं पांचाळे काकांनी सांगितलं होतं! सकाळ विशेषमध्ये पाहिलं, तर त्या गझलसोबत मोबाईल नंबरही दिलेला.
"धन्यवाद सर, आपण कोण बोलताय?"
"तुम्हाला लगेचच दाद मिळावी, म्हणूनच मोबाईल नंबर देता ना? मिळाली ना दाद? मग मी कोण आहे हे कशाला कळायला हवं?"
"ही माझ्या काव्याला मिळालेली पहिली दाद आहे, म्हणून आपला नंबर मी सेव्ह करून ठेवेन."
"त्याचं काही एवढं महत्त्व नाही. तुमची गझल माझ्या वाचनात आली, मला ती मनापासून आवडली, तुमचा नंबर होता सोबत, म्हणून मी तुम्हाला फोन केला. बरं, कुठं असता तुम्ही? काय करता?"
"सर, मी नागपूरला बीएसएनएलमध्ये काम करते."
"अच्छा. माझाही बीएसएनएलचा दूरध्वनी आहे. तुम्ही कोणत्या कार्यालयात असता ?"
"सर, मी सक्करदरा कार्यालयात आहे. आपला कोणता एरिया आहे?"
"मी धंतोलीत रहातो." क्षणभर काही अंदाज घेण्याचा प्रयत्न करतेय, तोवर पुढचा प्रश्न आला, "आता माझं नाव सांगू? विश्वास बसेल तुमचा?"
"हो सर"
"मी ग्रेस बोलतोय."
"सर, आपण?" मी अवाक!! काहीही कळत नाहीय मला! चक्क सूर्याची काजव्याला दाद? मी स्वप्नात तर नाही? माझ्या घरातच आहे मी की चंद्रमाधवीच्या प्रदेशात?
"होय, मी ग्रेस बोलतोय. मी कधीही खोटं बोलत नाही, नागपुरात ग्रेस या नावाचा एकुलता एकच माणूस आहे, माझा कुणीही जुळा भाऊ नाही आणि माझी कुठं शाखाही नाही!"
मी काय ऐकतेय, काय बोलतेय, मला काहीही कळत नाहीय.
"सर, मला आपली भेट घ्यायची होती. पण..............."
"पण काय? तुम्ही मला शोधायचा प्रयत्न नाही केला. या गझलच्या निमित्तानं मी तुम्हाला शोधलंय, तुम्ही मला शोधलं नाहीय. मी तुम्हाला मिळवलंय, तुम्ही मला नाही मिळवलं!"
"सर, आपली ही दाद माझ्यासाठी खूप मोठी भेट आहे, आज मी खरंच खूप काही मिळवलंय."
"ते आता तुम्ही पहा! तुमची गझल मला मनापासून आवडली, मी तुम्हाला दाद दिली. मला चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला आवडतं."
"सर, मी नक्कीच आपली भेट घेईन. आपल्या कविता मला खूप आवडतात. मी आपल्या कवितांची वेडी आहे."
"अरे, असं चांगलं लिहिणारी माणसं वेडी नसतात, खूप शहाणी असतात. माझी भेट तुम्ही केव्हाही घेऊ शकता, पण एक आहे, मी कुणाला कवितांसाठी मार्गदर्शन वगैरे करत नाही. तुम्ही या, पण मार्गदर्शन मिळेल ह्या अपेक्षेनं नाही."
"काही हरकत नाही सर."
"आणि तसंही तुमचं काव्य सांगतंय की तुम्हाला या सार्या सोपस्कारांची गरजही नाही. कुणाच्या चार ओळींनी किंवा प्रस्तावनेनं कुणाचं काव्य मोठं होत नाही. मुळातच जे चांगलं आहे, त्याला दाद मिळणारच! तेव्हा लिहित रहा, असंच चांगलं, आतून आलेलं, मनापासून लिहा. तुमच्या काव्यप्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा."
"धन्यवाद सर."
"ठीक आहे, आता मी फोन ठेवतो. तुमचा सकाळचा बराच बहुमूल्य वेळ घेतलाय मी." आणि फोन बंद झाला.
मी अजूनही हवेत. हे सगळं जे घडलं, ते खरंच खरं होतं?
या धुंदीतून बाहेर येऊन बहिणीला [स्वातीला] फोन केला, ती बोलते, "सण आहे आज तुझ्यासाठी!"
खरंच! सणच होता तो दिवस! खुळ्यासारखी ही वार्ता लेक, बंधुराज, आई, बहिणी, सगळ्या मित्र-मैत्रिणींना सांगत सुटले आणि स्वत:चंच कौतुक करून घेत राहिले दिवसभर! एखाद्या लहान मुलानं शाळेत मिळालेलं बक्षिस दाखवत सुटावं सगळ्यांना, तस्सं!
स्वत: पांचाळे काका, तुषार जोशी, सुरुची नाईक, रूपालीताई बक्षी, स्मिताताई जोशी, गाण्याच्या क्लासमधल्या मैत्रिणी सगळे सगळे खूश झाले अगदी! विजयाताई मारोतकर म्हणाल्या, "मला तुझा खूप अभिमान वाटतो, आणि माझाही, कारण मी तुझी मैत्रिण आहे!!बघ, जाता जाता जुन्या वर्षानं तुला केवढं मोठं देणं दिलंय!" प्रमोद देवकाकांना जेव्हा हे सांगितलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, "तुझ्या या अनुभवावर एक स्फुट लिही, म्हणजे आपल्या जालावरच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ही आनंदवार्ता कळेल." त्यांनी लगेचच ईसकाळ.कॊम वरचा दुवा शोधून काढला, त्यावर फक्त लेख दिसतोय, गझल दिसत नाही, म्हणून सकाळच्या संपादकीय विभागात फीडबॆकही दिला! नंतर दिवसभर सगळ्या विदर्भातून गझल आवडल्याबद्दल फोन येत राहिले, मेसेज येत राहिले, पण पहिली दाद माझ्यासाठी अमृताचा घोट होती!
या सरत्या वर्षानं मला जाता जाता जे दिलंय, ते खरंच खूप अनमोल आहे, मर्मबंधातली ठेव आहे ती माझी! वयाच्या १४व्या वर्षी प्रत्यक्ष गझलसम्राटाचं, मराठी गझलक्षेत्रातल्या शंकराचार्यांचं, कै. सुरेश भट काकांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन, आणि आज वयाच्या ४८व्या वर्षी मराठी काव्यातल्या ग्रेस नामक वलयांकित, ध्रुवतार्यासारख्या अढळ पदावरील व्यक्तिमत्वाचं माझ्यासारख्या कोशातल्या सुरवंटाची दखल घेणं! माझ्या आयुष्याच्या प्रवासातले हे दोन टप्पे म्हणजे मैलाचे दगड ठरले आहेत माझ्यासाठी. मी लिहीत रहावं म्हणून मला सतत प्रोत्साहन देत रहाणारे, प्रसंगी रागावणारे माझे बाबा आणि भट काका आज या जगात नाहीत, पण तरीही या प्रसंगानं ते नक्कीच समाधान पावले असतील!
solid....ekdam mast...abhi ani nandan ekdam ...:)
ReplyDeletechaan
ReplyDeleteक्रान्ति, खराच सोनियाचा दिनू आहे हा. अभिनंदन! मला हे वाचून इतका आनंद झाला आहे. तुला जेव्हां त्यांनी स्वत:चे नाव सांगितले असेल त्या क्षणाच्या कल्पनेनेही रोमांच उभे राहीले.
ReplyDeleteसखे, अशीच बहरत राहा.
नव वर्षाच्या यापरत्या मौल्यवान शुभेच्छा कुठल्या असतील... :)
पुन्हा एकवार अभिनंदन आणि शुभेच्छा!
taaydDe, khupach chaan ekda nakki bhetun ye aani majhyaa kaDun pan namaskar kar tyanaa.
ReplyDeleteharshad.
क्या बात है गं.... :)
ReplyDeleteमनापासून अभिनंदन... खरचं new year happy झाले तुझे happy च कशाला happiest म्हणूया :)
पुन्हा एकवार खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा :) ... लिहीत रहा गं!!
तन्वी
AAJ TUMHI MAZYA MITRANCHYA YADIT AHAT YAcha mala abhiman watatoy ................
ReplyDeleteअपर्णा, रमेश, तन्वी, भाग्यश्री, हर्षद, परमेश्वर खूप खूप धन्यवाद. हर्षद, नक्कीच भेटून येईन मी ग्रेस सरांना आणि तुझा नमस्कार सांगेन. :)
ReplyDeleteAbhinandan.....
ReplyDeleteअभिनंदन ! क्रांति, त्रिवार अभिनंदन !
ReplyDeleteभीमराव पांचाळेंनी तुमच्या गझलेची सर्वोत्कृष्ट म्हणून निवड करणे आणि कविवर्य ग्रेस यांनी स्वत: फोन करून तुम्हाला दाद देणे या गोष्टी अतिशय आनंदाच्या आणि अभिमानाच्या आहेत.
तुमच्या त्या गझलेतल्या,
“दाही दिशा उभ्या या हासून स्वागताला”
या ओळीनुसार (की मिसर्यानुसार ?) तुमचा पुढील प्रवास घडो आणि तुमच्या यशाचा, भरभराटीचा आलेख निरंतर चढत जावो, ही सदिच्छा.
धन्यवाद विश्वास, भिडेकाका. तुमच्यासारख्या हितचिंतकांचे, मित्रमैत्रिणींचे आशिर्वाद आणि शुभेच्छा नेहमीच माझ्या पाठीशी असतात, आणि मला चांगलं काही लिहायला प्रोत्साहन देत रहातात. त्यामुळेच माझ्या हातून असं काही अकल्पित घडून जातं!
ReplyDeleteसही...अभिनंदन...!!! :-)
ReplyDelete