Saturday, January 8, 2011

एका बंदिशीची गोष्ट

         आपलं शास्त्रीय संगीत हा एक विशाल असा महासागर आहे. यातला एखादा थेंब जरी लाभला, तरी आयुष्याचं सार्थक होईल! वर्षानुवर्षंच नाही, तर तपानुतपं गुणीजन या अनमोल खजिन्यात आपल्या योगदानानं मोलाची भर घालत आहेत.

         या विषयावर मी काही लिहावं, इतका माझा अधिकार नाही. पण शास्त्रीय संगीताची एक विद्यार्थिनी म्हणून धाडस करतेय या महासागरात उतरण्याचं! सर्वसाधारणपणे असं समजलं जातं, की शास्त्रीय संगीतात स्वर, ताल आणि लय यांचं महत्त्व शब्दांपेक्षा अधिक आहे, सुगम संगीतात शब्द, त्यांचे अर्थ, भाव या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. याचा अर्थ असा मुळीच नाही, की शास्त्रीय संगीतात भाव किंवा शब्द फारसे विचारात घेतले जात नाहीत. त्याशिवाय का राग आणि रस यांचं अतूट नातं आहे? अर्थात सगळ्याच विषयांप्रमाणे याही विषयात भिन्न भिन्न मतप्रवाह आहेतच, असोत! पं अजय पोहनकरजी यांनी आकाशवाणीवरील संगीत-सरिता या कार्यक्रमात हेच सांगितलं होतं, की स्वर-ताल-लय यांप्रमाणेच भाव आणि शब्द यांचंही शास्त्रीय संगीतातलं महत्त्व कमी नाही!
        
          शास्त्रीय बंदिशींचे विषय वेगवेगळे असतात. भक्ती हा त्यातला मुख्य विषय. हीच भक्ती जेव्हा कृष्णलीला वर्णिते, तेव्हा त्या बंदिशी आपोआपच शृंगाररसाचा आविष्कार करतात. भगवान कृष्ण आणि त्याच्या लीला हा तर नुसतं संगीतच काय, पण अगदी ६४ कलांच्या असंख्य कलाकारांचा युगानुयुगे जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याशिवाय पूर्वी शास्त्रीय संगीतगायक ज्या राजदरबारात आपली कला सादर करत, त्या राजाचं गुणवर्णन, संगीताची महती, सृष्टी, जगरहाटी असे कितीतरी विषय या बंदिशींमधून मांडले गेले आहेत आणि जात आहेत. हिंदी बंदिशींमधला आणखी एक अनादि-अनंत विषय म्हणजे नाती. त्यातल्या त्यात पिया आणि सास-ननदिया हे तर अगदी खास!

          तर मी ज्या बंदिशीची गोष्ट सांगतेय, ती याच विषयावरची. या बंदिशीची नायिका म्हणजे खटल्याच्या घरातली मधली सून, जिला सासू, नणंद यांच्या सोबतच जावा [मोठ्या आणि धाकट्या पण!] आहेत त्रास द्यायला. आणि अशा रगाड्यातून पिया भेटणं हे किती जिकीरीचं आणि कठीण आहे, ते तिचं तिलाच ठाऊक! तरीही ती पियाला भेटण्याचं धाडस म्हणा की साहस म्हणा, करते आणि आपल्या सखीला त्या घटनेचा इतिवृत्तांत सांगते, ही या बंदिशीची मध्यवर्ती कल्पना! आता हे तर काही विशेष नाही ना, ज्यावर एवढं घडीभर तेल ओतायला हवंय नमनालाच! पण तरीही मी ते काम करतेय, कारण या बंदिशीतला एकेक भाव, एकेक शब्द तिच्या स्वरावलीनं पेलून धरलाय!

         ही अप्रतिम बंदिश आहे पूरिया रागातली. सायंकाळच्या कातरवेळेत गाइला जाणारा मारवा थाटातला हा सायंकालीन संधिप्रकाशी राग. [अलिकडे तो रात्रीच्या प्रथम प्रहरातही गाइला जातो.] कोमल रिषभ, तीव्र मध्यम आणि पंचम वर्जित असलेला हा अतिशय सुरेख राग. या रागातली "मैं कर आई पियासंग रंगरलियां" ही ती सुरेख आणि सुरेल बंदिश! ही बंदिश मी ऐकली ती परितोष पोहनकरजी यांच्या आवाजात. त्याच वेळी ती मला अत्यंत भावली होती. आणि नेमकी शिकतानाही तीच माझ्या पुढ्यात उभी! जन्माचं सार्थक म्हणतात, ते हेच असावं का?

         अवघ्या पाच ओळींत त्या नायिकेच्या किती भावनांचं इंद्रधनू गुंफलं आहे स्वरांनी! ही बंदिश शिकत असताना अक्षरश: त्या नायिकेच्या भूमिकेत स्वत:ला ठेवावं, इतकं एकरूप केलं त्या भावना, शब्द आणि स्वरांनी!

मैं कर आई पियासंग रंगरलियां
आलि जात पनघट की बाट ॥
स्थायीमधल्या या दोन ओळींत तिचा खट्याळ, लाजरा, हसरा चेहरा दिसतो!

मैंS कर आई पियासंग रंगरलियाSSS
मंद्र निषादापासून सुरू होणारी, षड्ज, तीव्र मध्यम, गंधार, कोमल रिषभ यांच्या साथीनं पुन्हा षड्जावरून खाली उतरत मंद्र धैवत, मंद्र निषाद, षड्ज, कोमल रिषभ अशी वर चढत मध्य षड्जावर संपणारी पहिली ओळ त्या सखीला जणु सांगतेय, की घरच्या सगळ्या कटकटी विसरून, सासू-नणंद, जावा सगळ्यांच्या नाकावर टिच्चून मी पियाशी रंगरलियां, [या रंगरलियां शब्दातलं पहिलंच अक्षर समेवर आलंय, कोमल धैवतावरची ही सम त्या रंगरलियांचं महत्त्व आणखीनच वाढवतेय!] चेष्टामस्करी, शृंगार करून आले, तो कुठे? तर
आSलि जाSत पनघट कि बाSट !
पाणी भरायच्या निमित्तानं पाणवठ्यावर जाता जाता सख्यानं मला घेरलं! मंद्र निषादावरून कोमल रिषभाचा हात धरून गंधार, तीव्र मध्यम अशा पायर्‍यांवरून वर चढत चढत मध्य निषादाला स्पर्शून गंधार आणि तीव्र मध्यमासोबत धैवताच्या भोज्याला शिवून पुन्हा कोमल रिषभावर उतरणारी ही दुसरी ओळ या लाजर्‍या न् साजर्‍या मुखड्याचा आरसाच आहे जणु! काय सुख मिळालं असेल तिला त्या अवघ्या काही क्षणांच्या भेटीत? पण तरीही ती इतकी खुललेली, फुललेली आहे की जसं अख्खं आयुष्य जगलीय त्या क्षणांत!

आता यात कसलं आलंय कौतुक? पाणवठ्याच्या वाटेवर पियाशी रंगरलियां करण्यात काय विशेष? याचं उत्तर दिलंय अंतरेत!

एक डर है मोहे सास-ननंदको,
दूजे देरनिया-जेठनिया सतावे,
निसदिन कर रही हमरी बात!
हे आहे तिचं दु:ख, तिची व्यथा! आणि म्हणून तिला पियाला भेटण्यासाठी पाणवठ्याच्या वाटेचा सहारा घ्यावा लागलाय!!

एक डर हैS मोहे साSस ननंदकोS
गंधारानं सजवलेलं तिचं दु:ख तीव्र मध्यमानं धैवतासोबत वाढवत नेऊन दिलंय तार षड्जाच्या हाती आणि त्यानं मागे वळून मध्य निषादाला सोपवलंय, पण निषादाला ते सहन न होऊन त्यानं तार सप्तकातल्या कोमल रिषभाला हाताशी धरत पुन्हा ते तार षड्जाकडे सुपूर्द केलंय! तिच्या त्या दु:खातली तीव्रता, तिचं ते घाबरणं, घुसमटून रहाणं केवळ स्वरांतून जाणवतं!
दूजे देरनीSया जेठनीSया सताSवे
या सासू-नणंदेची भीती कमी झाली म्हणून की काय, धाकट्या जावा [देरनिया] आणि मोठ्या जावाही [जेठनिया] त्रास देत रहातात.
या ओळीत मध्य निषादानं आळवलेलं दु:ख तार सप्तकातल्या कोमल रिषभानं तार गंधार आणि मध्य निषादासोबत खो-खो खेळत मध्य धैवत, मध्य निषाद, मध्य सप्तकातला तीव्र मध्यम, मध्य गंधार, मध्य सप्तकातला कोमल रिषभ यांच्या वळणावळणानं जात षड्जाच्या झोळीत घातलंय!
निसदिन कर रही हमरी बाSत!
पुन्हा मंद्रातल्या निषादानं मध्यातल्या कोमल रिषभाच्या हातात हात गुंफून, गंधार, तीव्र मध्यम, धैवत, मध्य निषादापर्यंत चढवत नेलेली तिची अगतिक कैफियत तीव्र मध्यमानं मध्य धैवत, गंधार यांच्याशी खो-खो खेळत कोमल रिषभावर आणून पोहोचवली आहे.
धाकट्या तर ठीक आहे, त्यांना काही कळत नाही, पण निदान मोठ्या जावांनी तरी समजून घ्यायला हवंय ना! त्या माझ्याच वाटेनं गेलेल्या असतील ना! पण छे! त्याही [मेल्या!] माझ्याबद्दल कुचुकुचु बोलत रहातात! हे सगळे सगळे भाव त्या सुरावटींनी इतके सुरेख आणि सुरेल मांडले आहेत, की गुंतून जायला होतं त्या बंदिशीत!

          ही बंदिश एक बंदिश न रहाता, केवळ एका रागाचं रूप जाणून घेण्यासाठी शिकलेली किंवा ऐकलेली रचना न रहाता त्या अल्लड वयातल्या त्रासलेल्या पण तरीही उत्साहानं उधाणलेल्या नायिकेची गोष्ट होते! आणि हा सारा त्या स्वरावलीचा खेळ! अतिशय अप्रतिम अशी ही बंदिश इथे ऐकायला मिळेल. ऐका, आणि जाणून घ्या तिची गोष्ट!
http://www.youtube.com/watch?v=v8bOeHRz_Kc

1 comment:

  1. अतिसुंदर. तुमच्या ब्लॉगमुळे आज पुन्हा पुरिया ऐकला. बंदिश ऐकली होती आज भिडली. आणखी लिखाण येवू द्या.

    ReplyDelete