Friday, December 25, 2009

गुलमोहर


बाग फुलवायची हौस तर खरी, पण फ्लॆटमध्ये ते सुख कुठून मिळणार? त्यात जागा कमी पडते, म्हणून बाल्कनी पण ठेवली नाही, शेवटी कशातरी दोन-चार कुंड्या ठेवून तुळस, मनीप्लांट, गोकर्ण लावलेली. अनायासे तळमजल्यावरचं लहानसं दुकान स्वस्तात मिळालं, म्हणून घेऊन टाकलं. काही नाही केलं, तरी गाडी पार्क करायला जागा झाली, आणि बागेचीही हौस भागली. कंपाउंडच्या बाहेर एका बाजूला आपोआपच उगवलेला औदुंबर वाढत होता. माझ्या आईनं तिच्या जावयबापूंना सांगितलं "तिला गुलमोहर खूप आवडतो. तोच लावू या बाहेर." त्यांनी पण कौतुकानं देशी गुलाब, जास्वंद, पारिजात, जाई यांच्यासोबत गुलमोहराचं रोप आणलं, लावणं झालं. खतपाणी व्यवस्थित वेळच्यावेळी झालं. गुलमोहर भराभर वाढत होता. बघता बघता औदुंबर आणि गुलमोहर दुस-या मजल्यापर्यंत उंच झाले. किचनच्या खिडकीतून खाली बसूनही दिसतील इतके! दोघांच्या फांद्या हातात हात धरावे, तशा एकमेकांत मिसळून गेल्या. रोज औदुंबरावर फळं खाण्यासाठी पाखरांची गर्दी, इवल्याशा खारुल्यांचं लग्नात करवल्या मिरवाव्या तशा तुरुतुरू या झाडावरून त्या झाडावर धावणं! पण चार-पाच वर्षं झाली, तरी गुलमोहराला बहर काही आला नाही! त्याच्या बहराच्या काळात रस्त्यानं जातायेता इवल्याशा झाडांनाही फुलं आलेली पाहिली, की वाटायचं आपला गुलमोहर इतका मोठा होऊनही फुलत का नाही? नवरोबांचं म्हणणं, "अग फुलेल पुढच्या सीझनला." पण तो सीझन काही आलाच नाही! त्यातच पुन्हा दोन वेळा वादळ-वारं काहीही नसताना त्याच्या दोन-दोन मोठ्या फांद्या अचानक तुटून पडल्या! औदुंबराच्या हातातला त्याचा हात सुटून गेला. अगदीच केविलवाणा दिसायला लागला तो!



अखेरीस एका रविवारी माळीबाबा आल्यावर बागेत गेले. त्याचं काम सुरूच होतं. "माळीबाबा, आपल्या गुलमोहराला फुलं कशी येत नाहीत हो अजून? एवढा तर मोठा झालाय!" मी विचारलं.



"कंचा गुलमोहर?" त्यांच्या त्या प्रश्नानं मी उडालेच! "अहो, हा काय!" मी गुलमोहराकडे हात दाखवला.



"त्यो कुटला गुलमोहर? त्यो तर चिचवा व्हय!" इति माळीबाबा.



"काय? चिचवा?" मी हैराण!



"व्हयं तर! त्यो चिचवा, रस्त्याच्या कडंन लावत्यात. जंगली झाड व्हय त्ये." माळीबाबांनी माहिती पुरवली.



"इतकं तकलादू झाड रस्त्याच्या कडेला लावतात?" मला नवल वाटलं.



"तकलादू काऊन जी? त्ये तर मस टणक -हातं. लई मोटं व्हतं. सावलीला बरं आसतं." माळीबाबा त्याचा कैवार घेत बोलले.



"मग याच्या तर फांद्या बिना वादळवा-याच्याच तुटल्या!" तक्रारीच्या सुरात मी!



"तुटन न्हाई तर काय व्हईल? उधईनं खाल्लंय न्हवं त्याईले!" माळीबाबांचा हा खुलासा ऐकून मला फक्त रडायला यायचंच बाकी राहिलं होतं! ज्याचं जीवापाड कौतुक केलं, एक तर तो लाडका गुलमोहर नाही, आणि त्यातूनही त्याला वाळवी लागलेली! बरं, आता गुलमोहरासाठी बागेत जागाही नाही! अरे देवा!



"का हो, तुम्ही एवढे बागायतदार, शेतीत मुरलेले, आणि तुम्हाला गुलमोहर आणि चिचव्यातला फरक नाही कळला रोप आणताना?" मी नवरोबांना मारलेला हा टोमणा प्रत्युत्तरार्थ होता. वरो-याहून बाबांच्या आनंदवनातून आणलेल्या कृष्णतुळशीच्या बिया, पंधरा तास बसचा प्रवास करून आणलेलं आईच्या बागेतलं बोटाएवढं चिमुरडं अबोलीचं रोप आणि गोकर्णाच्या बिया मी कुंडीत लावताना त्यांनी जी लेक्चर्स दिली होती, त्याचा बूमरॆंग! {ती अबोली आता मस्त फुललीय आणि गोकर्णाची तर बागच झालीय!}



"अग, त्या फॊरेस्टच्या नर्सरीमधल्या माळ्यानं दिलं ते गुलमोहर म्हणून!" आपली चूक दुस-यावर ढकलण्यात तरबेज असणा-या नवरोबाचं मवाळ उत्तर!



छे! त्या गुलमोहराच्या निमित्तानं मनात बरंच वादळ उठलं. आयुष्यातही बरेचदा अशा एखाद्या वळणावर आपली निवड चुकल्याचं कळतं, की जिथून परतीची वाटही नसते, सुधारण्याची संधीही नसते, आणि त्या चुकीच्या निवडीला स्वीकारण्याशिवाय पर्यायही नसतो! पण पश्चाताप करूनही उपयोग नसतो. अशा वेळी कुढत रहाण्यापेक्षा आहे ते आहे तसं गोड मानून घेणं बरं ना? जे समोर येतंय, ते हसतमुखानं स्वीकारण्यात कदाचित खरं सुख असेल! त्या झाडाची काय चूक? त्याला गुलमोहर समजत होते, तोवर त्यानं दिलेला आनंद तर अवर्णनीयच होता ना? आणि अजून तरी काय झालंय? त्याच्या त्या नव्या नाजूक पोपटी पालवीतली इवलीइवलीशी पानं जेव्हा वा-यावर हलत असतात, तेव्हा एखादी सुरेलशी सुरावट मनात तरळून जाते. या वयातही मनापासून आवडणा-या "टॊम ऎंड जेरी" मधल्या जेरीनं पियानोच्या पेटीत बसून सूर छेडावेत, आणि वरच्या स्वरपट्ट्या जादूनं फिरल्यासारख्या आपोआप हलाव्यात, तशीच ती पालवी दिसते.



कुठंतरी मनातून दुखत असतानाच मनाची अशी समजूत काढून बागेतल्या इतर घडामोडींकडे पहात असतानाच एक सुखद धक्का बसला. जेमतेम कमरेइतक्या उंचीच्या प्राजक्ताला कळ्या आल्यात! त्याचा बहराचा मोसम अजून यायचाच आहे, तरीही तो फुललाय! गुलमोहराचं नसणं थोडंसं कोप-यात गेलंय मनाच्या. कुणीतरी फुलतंय ना माझ्या बागेत!


2 टिप्पणी(ण्या):

चुरापाव म्हणाले...

झाडांत खूप गुंतून जायला होतं ना? कळ्या येताना मस्त वाटतं, फुलतात किती कौतुक करू आणि किती नको असं होतं.



मस्त लिहिलय खास करून शेवट 'कुणीतरी फुलतंय ना माझ्या बागेत!' सही



९ डिसेंबर २००९ ९-२७ am

Gouri म्हणाले...

sundar!!! aga tujha ha blog baghitalaach navhataa. aataa sagalaa vaachoon kaadhate.



maajhyakade ek poncetia aahe ... pivala mhanoon aanala ani nantar chakk gulabee nighala. phulalyaavarach samajale, ani dusarya laal baharasamor ha pharach phika disayala lagala. baag bahataanaa aai mhanaalee, 'agadeech vitakaa disato aahe na!' tar aataa itaka bichara jhalay to ... purveesaarakhaa mast vadhatach nahiye.



२४ डिसेंबर २००९ ३-३२ am

1 comment:

  1. क्रांती तुझ्या या blog वर पहिल्यांदाच आले..एवढा उशीर का हा प्रश्न पडलाय खरंतर...पण त्याआधी सांगाव वाटतय ते या गुलमोहोराच्या पोस्टसंदर्भात. प्रचंड आवडलं हे लिखाण तुझं. बाकीचंपण वाचेल तसं लिहीणार आहे. कोणीतरी जिवाभावाची मैत्रीण भेट्लीये एवढ जवळच वाटतय हे सगळं :)

    ReplyDelete