Friday, December 25, 2009

तो आला!

अखेर एकदाचा तो आला! तब्बल ६ ते ८ महिने काहिलीत राहिलेल्या जीवासाठी जरासा का होईना, उतारा घेऊन आला! पण असा अचानक? दुपारी १ वाजता ऑफिसमधून ५ मिनिटांच्या रस्त्यावर असलेल्या बँकेत जाऊन येईपर्यंत सगळ्या आयुधांना [पक्षी - सनकोट, स्कार्फ, हातमोजे, बूट इ. इ. ] पुरून उरणा-या उन्हानं निखा-यावर मक्याचं कणीस भाजावं, तसं भाजून काढलं होतं. आल्यावरही पंखे, कूलर, एसी यांना दाद न देणारा प्रचंड उकाडा! ढगाच्या तुकड्याचाही मागमूस नाही!


आणि अचानक ४.३० च्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले, एकदम अंधारच झाला! गणेश चतुर्थीला गणपती आणायला जाताना एखाद्या दादानं एक जोरदार हाळी मारावी, आणि पाचपन्नास पोरं गोळा करावी, संदलवाल्यानं, ढोलवाल्यानं जोशात वाजवायला सुरुवात करावी आणि पोरांनी हवा तस्सा धुडगुस घालावा, तसं यानं भराभरा काळे ढग गोळा केले, गडगडून ढोलताशे वाजवले आणि केली सुरुवात धिंगाणा घालायला! मातीचा गंध मनात भरून गेला! सगळं वातावरणच बदलून गेलं एकदम!

ऐन ऑफिस सुटायच्या वेळेला आला, पण आज त्याचा राग नाही आला. वेधशाळेचा अंदाज होता तो येईल असा, त्यामुळे रेनकोट सोबत ठेवायचं कारण नव्हतं! मग काय! तो इतक्या कौतुकानं आला, आणि त्याच्या जाण्याची वाट पहात बसायचा करंटेपणा कोण करणार? मस्तपैकी गाडीला किक मारली, आणि निघाले भिजत भिजत! म्हटलं, होऊ दे सर्दी झाली तर! या मोसमाचा पहिला वहिला बहुप्रतिक्षित सखा आलाय आणि आपण नाजुकपणा करायचा? ऑफिसपासून अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर असणा-या घरी यायला अर्धा तास लागला. जोर तर भरपूर होता त्याचा, अक्षरशः डोळ्यांवर फटके मारावेत, तसे थेंब पडत होते, निम्मा रस्ता तर डोळे झाकून चालवावी, तशी गाडी चालवली. रस्त्यावर माझ्यासारखेच तुरळक वेडे दुचाकी घेऊन होते, बाकी चारचाकीवाले, आणि रस्ता बराचसा मोकळा! पण आजची ही संधी दवडणं शक्य नव्हतं! चिंब भिजून घरी आले, तर तो थांबूनच गेला!

उद्या कदाचित तो याच वेळेला आला, तर त्याचा राग येईल, त्याच्यापासून वाचण्याची आयुधं बरोबर ठेवायचं संकट वाटेल, रस्त्यावरचं पाणी अंगावर उडवणा-या चारचाकीवाल्याला ठेवणीतल्या शेलक्या विशेषणांनी झाडलं जाईल, पण आजचा त्याचा आनंद वेगळाच! याचं वर्णन करायला सगळ्या भाषांमधले सगळे शब्द अपुरे पडतील!हे माझं वेडंवाकुडं निरुपण त्या लाडक्या सख्या पावसासाठी!

1 comment:

  1. wow! great! kranti!pn kharach aashe sagali tali
    sawcha hotil ka? maansachi maan hi hoti ka?...kharch jhali tar kiti changle hoil nahi... ur great writer..

    ReplyDelete