शाख पर जब धूप आयी हाथ छूने के लिये छांव छमसे नीचे कूदी, हंसके बोली "आइये" यहां सुबह से खेला करती है शाम! गुलजार
Friday, December 25, 2009
महिला आघाडीची जुगलबंदी
चमकून जाऊ नका मंडळी. राजकारण हा माझा प्रांत नाही आणि ज्यांच्यावर मी हा लेख लिहितेय, त्यांचाही नाही. तर हा लेख आहे हिंदी चित्रपट संगीतातील दोन किंवा अधिक गायिकांनी गायिलेल्या गाण्यांबद्दल. १९५० ते १९७०-७५ हे हिंदी चित्रपट संगीताचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात चित्रपट संगीतात अनेक प्रयोग झाले, ते सर्वांगांनी बहरलं. त्यातला एक प्रयोग होता द्वंद्वगीतांचा, जी दोन गायिकांनी गायिली आहेत. परवा कधीतरी सकाळी सकाळी "ना मैं धन चाहूं" हे अप्रतिम भजन ऐकलं आणि मग या दिशेनं मनाचा प्रवास सुरू झाला. सचिनदांच्या संगीतातलं काला बाजार या चित्रपटातलं हे सुरेल भजन ऐकताना आणि पहातानाही साक्षात देव दिसेल! लीला चिटणीस आणि बेबी नंदा यांचा तरल अभिनय, गीताबाई आणि सुधा मल्होत्रा यांचे भावपूर्ण गायन आणि ऐकणारे उदंड रसिक! असंच यमन रागातलं हे भजन राजेश रोशन यांनी संगीत दिलेलं. आशाबाईंचा आलाप अगदी गाभा-यातून यावा तस्सा! हे फक्त श्रवणीय! [अर्धं भजन होईपर्यंत छोटा छोटा स्कर्ट घातलेल्या लक्ष्मीबाईंना पहावं लागतं त्यात!] हे आहे जुलीमधलं 'सांचा नाम तेरा | तू श्याम मेरा'.
सचिनदांच्याच संगीतात एक अत्यंत भन्नाट जुगलबंदी आहे, मधुबालाचा खट्याळपणा आणि मीनू मुमताजचा अवखळपणा यांचं सुरेल रूप आशाबाई आणि गीताजींच्या आवाजात. रसिकांनी ओळ्खलं असेलच म्हणा, तरीही दुवा देते ही पहा मैत्रिणींची छेडछाड! "जानूं जानूं री". काय ठेका, काय ठसका! पहिल्या 'जानू' मध्येच घायाळ! असंच अल्लड शशिकला आणि शांत नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सुमधुर गीत! "बचपन के दिन भी क्या दिन थे". सचिनदांचा हा अंदाज पण अगदी सही! चलती का नाम गाडी या चित्रपटातलं खूप कमी ऐकायला मिळणारं हेलनवर चित्रित एक जुगलबंदी गीत आहे 'हम तुम्हारे हैं जरा घरसे निकलकर देखो' या गाण्यातला तबला! [माझ्या अंदाजाप्रमाणे तो रूपक ताल असावा, तज्ञांनी मार्गदर्शन करावे.] हेच ते सुधा मल्होत्रा आणि आशाबाईंचे गाणे.
ही झाली पिताश्रींची कमाल. छोटे मियां तरी कुठे मागे राहिलेत? आठवते ही पडोसन? "मैं चली मैं चली" मस्त पिकनिक सुरू आहे सायकलवर! पंचमदांचा अंदाज काही औरच! क्या बात है! आशाबाई, लताबाई आणि भन्नाट पिकनिक! याला म्हणतात गाणं!
आपले एलपी, लक्ष्मी-प्यारे यांनी तर सुरुवातच अशा जुगलबंदीनं केलीय! हा "नूरानी चेहरा" आठवला? हेलनबाई, लताबाई, कमल बारोट आणि सुरेखसं गाणं. भेंड्यांमधलं हमखास गाणं.
त्यांचाच हा एक अंदाज पहा. कव्वालीच ना ही? "ऐ काश किसी दीवाने को " [आशाबाई आणि लताबाईंची. आशा पारेखबरोबरची सहनायिका कोण, ते आठवत नाही! कुणी सांगेल का?]
आणि हा पंजाबी लहजा? "नी मैं यार मनाना णी" लताबाई आणि मिनू पुरुषोत्तम यांचं हे ठसकेबाज गाणं मनात ठसतं. हा एक नाजूकसा अंदाज एलपी, आशाबाई आणि लताबाई यांचा. रेखा आणि अनुराधा पटेल, "मन क्युं बहका ". हे सगळे याच महान व्यक्तिमत्वांचे विविध अंदाज. किती ऐकावं आणि किती नाही ?
आता मोहरा शंकर जयकिशनजींकडे. त्यांच्या संगीतातली प्रोफेसरमधलं 'हमरे गांव कोई आयेगा', जानवरमधलं ' आंखों-आंखों में किसीसे बात हुई' चोरी चोरीमधलं 'मनभावन के घर जाये गोरी', आणि जिस देशमें मधलं 'क्या हुआ ये मुझे क्या पता?' हे पद्मिनीवर चित्रित झालेलं गीत! पण या सगळ्यांपेक्षा मला आवडतं ते बसंतबहारमधलं हे अप्रतिम गीत! "कर गया रे" निम्मीच्या चेह-यावरचे भाव, लताबाईंचा आवाज आणि तो जीवघेणा प्रश्न "पत्थर की मूरत के दर्शन करा दूं?" वा! दु:ख इतकं सुरेल असतं?
असंच सुरेल दु:ख नौशादमियांच्या मदर इंडियामधल्या "दुनियामें हम आये हैं तो जीनाही पडेगा" मध्ये दिसतं. असं गाणं गात दु:खाला, संकटाला सामोरं गेलं तर ते नक्कीच विरघळेल!
नौशादमियांच्या "मेरे मेहबूब में क्या नहीं" कव्वालीचा थाट काय वर्णावा! साधना आणि अमिताची अहमहमिका, कुणाचा सखा जास्त सुंदर! आणि ही छेडछाड शेवटी दोघींचा सखा एकच तर नाही? या शंकेवर संपते! लताबाई आणि आशाबाई या रिद्धी-सिद्धी तर नाहीत?
मुगलेआझमची निगार आणि मधुबालाची कव्वाली, चढेल निगारला गुलाब, तर नम्र, लीन मधुबालाला काटे, "जहेनसीब, कांटों को मुरझाने का खौफ नहीं होता!" शमशादजी आणि लताबाई! क्या बात है! "किस्मत आजमाकर हम भी देखेंगे!"
संगीतकार रवी यांची चौदहवी का चांद मधली 'शरमाके ये क्युं सब परदानशीं आंचल को संवारा करते हैं?' ही देखिल आशाजी आणि शमशादजी यांची सुरेल जुगलबंदी! जुन्या झीनत चित्रपटातली 'आंहे न भरी शिकवे न किये' ही लहानपणच्या नूरजहांची आणि ब-याच इतर गायिकांनी गायिलेली कव्वाली पण याच माळेतली!
कव्वालीवरून आठवलं, रोशनजींच्या 'बरसात की रात' मधली 'ना तो कारवां की तलाश है' या कव्वालीत एक सुरेल अंतरा आशाबाई आणि सुधा मल्होत्रा यांच्या आवाजात आहे, चारच ओळींच्या त्या अंत-याची सुरुवात आशाबाईंच्या आलापानं होते, तो आलाप अक्षरशः काळजात घुसतो! शामाच्या चेह-यावरची निराशा, तबस्सुमचा अगतिकपणा आणि बस! याच चित्रपटात सुमन कल्याणपुर आणि मुबारक बेगम यांचं हे गौडमल्हारातलं अप्रतिम गीत! "गरजत बरसत सावन आयो रे" सावन असाच यायला हवा ना सुरेलपणे? आणि चित्रलेखाला कोण विसरेल? 'काहे तरसाये जियरा' या कलावती रागातल्या गीताची मोहिनी कधीतरी कमी होणं शक्य आहे? आशाबाई आणि उषाबाईंचं हे अप्रतिम गीत अजूनही ताजंतवानं आहे, फुलत्या गुलाबासारखं!
काही पोशाखी चित्रपटांत अशी गाणी नेहमीच येत गेली. जी. एस. कोहली यांचं "तुमको पिया दिल दिया" कसं विसरणं शक्य आहे? याच चित्रपटात [शिकारी] हेलन आणि रागिनी यांच्यावर चित्रित "मांगी हैं दुवाएं हमने सनम" कमी ऐकायला मिळतं पण तेही सुरेख आहे. बर्मा रोड नामक चित्रपटात एक असंच सुंदर गीत आहे, कुमकुमवर चित्रित असलेलं. लताबाई आणि उषाबाई यांचं हे गीत आहे, "बांके पिया कहो हां दगाबाज हो" हेच ते चित्रगुप्त यांच्या संगीतातलं गीत. तसंच परवरीश या चित्रपटात 'जाने कैसा जादू किया रे बेदर्दी बालम' हे आशाबाई आणि सुधा मल्होत्रा यांचं गीत, संगीत इक्बाल कुरेशी यांचं!
आता अण्णांची गाणी! "अपलम चपलम" आजही प्रत्येक नृत्यस्पर्धेत ठाण मांडून बसलेलं आहे. किती वर्षं झाली, तरी त्याची गोडी अवीटच आहे! शारदामधलं शामा आणि मीनाकुमारीवर चित्रित हे अप्रतिम गीत "ओ चांद जहां वो जायें" आज जरी त्याची पार्श्वभूमी मोबाइल युगामुळे बदलली असली, तरी ते गाणं मनात जे घर करून राहिलेलं आहे, ते तिथेच आहे! लताबाई आणि आशाबाई! याच जोडीचं "सखी री सुन बोले पपीहा उसपार" मिस मेरीमधलं गाणं. मीनाकुमारी आणि जमुना. अप्रतिम बिहाग बरसतोय जसा! त्या सुरेल, मधुर ताना ऐकताना देवाचे आभार मानावेसे वाटतात, की त्यानं आपल्याला श्रवणशक्ती दिली! मंगेशकर घराणं नसतं तर हिंदी चित्रपट संगीताचं काय झालं असतं, देव जाणे!
ओपीजींची "रेशमी सलवार कुरता जाली का " [नया दौर] कुमकुम आणि मिनू मुमताजवर चित्रित केलेली ठसकेबाज रचना भेंडीच्या खेळात हमखास आठवतेच. तसंच "कजरा मुहब्बतवाला " [किस्मत] धमाल गाणं! मात्र हे फक्त ऐकायचं गाणं आहे. बायकी अवतारातला विश्वजीत नाचताना पाहून डोळे बंद करावेसे वाटतात. बबिता जरा बरी तरी दिसते! पण गाणं ही ऐकायचीच गोष्ट आहे ना! आशाबाई आणि शमशाद यांचं हे गाणं कमालीचं लोकप्रिय झालंय. [म्हणूनच त्याचे रिमिक्स करून भ्रष्ट नक्कल केली जाते!]
बाबू नामक संगीतकारानं संगीतबद्ध केलेलं गीताजी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायिलेलं सारा जहां हमारा या चित्रपटातलं एक नाजूक, गोड गाणं "फुलवाबंद महके, देखो लहके डाली डाली" यातल्या दुस-या ओळीत "भंवरा करे फेरे, मोहे घेरे अरी आली" मधल्या 'आली'वर सुमनजींची छोटीशी गोड मोहक मुरकी क्या कहने! तसंच हीरामोतीमधलं भोजपुरी ढंगाचं "कौन रंग मुंगवा कवन रंग मोतिया" हे निरुपा रॉय आणि शुभा खोटे यांचं गाणं मला नेहमीच साधी माणसं मधल्या "राजाच्या रंगम्हाली रानी ही रुसली" या सुलोचना आणि जयश्रीबाई यांच्या गाण्याची आठवण करुन देतं. वसंत देसाई यांच्या सुमधुर संगीतानं आणि बिस्मिलाखांजींच्या सनईनं गाजलेल्या गूंज उठी शहनाई मधलं गीताबाई आणि लताबाई यांचं "अखियां भूल गयी हैं सोना" हे छेडछाड करणारं सुंदर गाणंही याच पठडीतलं. किती गाणी आठवावीत, किती साठवावीत आणि किती ऐकावीत! विविधभारतीच्या भूले बिसरे गीत या रोज सकाळी ६.३० ते ७.३० लागणा-या कार्यक्रमात अशी बरीच अनमोल गाणी ऐकायला मिळतात, आणि सकाळ प्रसन्न होते, दिवस चांगला जातो. पण एरवी ही गाणी बरीच कमी ऐकायला मिळतात.
आणि आता शेवटी अत्यंत अनमोल रत्न! मदनमोहनजींची ही रचना आजकाल खूप कमी ऐकायला मिळते, पण ती ऐकणं म्हणजे केवळ स्वर्गसुख आहे! लताबाईची पुन्हा एक वेड लावणारी ही अप्रतिम कव्वाली. दुल्हन एक रात की मधली "कभी ऐ हकीकत-ए-मुंतजर नजर आ लिबासे-मजाज में ". आरंभसंगीतापासून मनाची पकड घेणा-या या गीतातल्या लताबाईंच्या पहिल्या तानेला कशाची उपमा द्यावी, हा गहन प्रश्न आहे! त्या आवाजाला, त्या कलेला 'अन्य नसे उपमान!' एका उर्दू गझलला दिलेलं कव्वालीचं हे रूप इतकं अप्रतिम आहे! आणि खास उर्दू लहजा! कलेजा खलास झाला, अशीच अवस्था हे गीत ऐकल्यावर होते. मदनमोहन खरंच सुरांचे जादुगार होते!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment