Friday, December 25, 2009

कहाणी स्फूर्तिदेवतेची



ऐका स्फूर्तिदेवते तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक वेडी यक्षकन्या रहात होती. बालपणापासून तिला आपला शब्द-सुरांशी खेळण्याचा छंद! नवनवे शब्द गोळा करावे, त्यांना सुरांत गुंफून त्यांच्या माळा, गोफ विणत रहावेत आणि त्यांच्यातच रमून जावं हेच तिचं काम. कायम आपली आपल्यातच गुंतलेली. यक्षपित्यानं तिच्यातलं हे वेड जाणलं आणि तिची ओळख करून दिली साहित्याच्या अफाट विश्वाशी. अलिबाबाच्या गुहेत जावं आणि डोळे दिपावेत तशी हिची अवस्था झाली. हरखून गेली ती तो अमोल ठेवा पाहून. त्या विश्वात रमली, रुजली, गुंतत गेली. विचारांचे तरंग तिच्या मनात उठत राहिले, त्यांना शब्दरूप देत गेली. यक्षपित्याला परमानंद झाला. चिमुकल्या यक्षकन्येचं कौतुक झालं. थोरामोठ्यांनी तिचे बोबडे बोल नावाजले. एका महान सिद्धहस्त व्यक्तिमत्त्वानं तिच्या शब्दबंधांनी प्रभावित होऊन तिचं गुरूपद स्वीकारलं, तिला आपला वारसा दिला. भरभरून आशिर्वाद दिले. ती फुलत गेली, बहरत गेली. तिचं शब्दविश्व समृद्ध होत गेलं. असेच दिवस सरत गेले.


मधल्या कालावधीत तिच्या आयुष्यात बरीच स्थित्यंतरं घडली. तिचं अवघं विश्व बदललं. ते बदल असे होते, की ती फुलता फुलता अचानक कोमेजूनच गेली! तिच्या संवेदना गोठून गेल्या, शब्द हरवून गेले, सूर दिसेनासे झाले. पंख कापलेल्या पाखरासारखी ती कैद झाली अदृश्य पिंज-यात. एका अनाकलनीय कोशात गुरफटून गेली. फुलपाखराचं सुरवंट झालं! यक्षपित्याच्या यातनांना अंत नव्हता. काय करून बसलो आपण हे? या मनस्विनीला असं कधीच पाहिलं नव्हतं, खुरटलेलं, सुकलेलं. त्याची धडपड सुरू होती, हिनं कोशाबाहेर पडावं म्हणून. पण खळाळून वहाणा-या नदीचं एका डोहात रूपांतर व्हावं, असं काहीसं तिचं आयुष्य बदलून गेलं होतं. वाट्याला आलेले भोग सोसत कोशालाच आपलं विश्व मानून ही मूक झाली होती. शब्दसुरांशी तिचं नातं तुटलं होतं इतर नाती सांभाळता सांभाळता. यक्षपित्याला कळत नव्हतं, हे असं का झालं.

एक दिवस त्यानं तिला गुरुदेवांकडे नेलं. त्यांना हिच्या शब्दसुरांच्या दुराव्याची हकीकत सांगितली. गुरुदेवांनी तिला बोलती करायचा खूप यत्न केला, पण ही आपली गप्पच. ते चिडले, रागावले, आणि हिला म्हणाले, "माझे शब्द लक्षात ठेव. एक दिवस असा येईल की लिहिल्याशिवाय तू जगू शकणार नाहीस!" ही बिचारी उगीच राहिली. पुन्हा गेली गुरफटून आपल्या कोशात. जसं काही कधी हे झालंच नव्हते. मध्यंतरी असा विचित्र वणवा आला, की हिचं जपलेलं सारं शब्दभांडार जळून खाक झालं! [हीच कशी वाचली न कळे!] मग सुरू झाला एक अविरत संघर्ष, स्वतःचा स्वतःशीच. गुरुदेव, यक्षपिता तोवर न परतीच्या वाटेवर गेले होते, आता ही एकटीच आपल्या कोशात. तिची स्फूर्तिदेवता तिच्यावर रुसली होती, की हीच रुसली होती स्वतःवर?

जवळजवळ दोन तपं अशीच सरली. तिच्या पिंज-याचे गज भक्कम होत गेले. कोशाच्या भिंती हवा सुद्धा आत जाणार नाही, अशा मजबूत झाल्या. आणि अचानक एक दिवस कुठूनतरी एक कोवळी सुगंधी झुळूक त्या कोशात शिरली. हे काय? ही आली कुठून? यक्षकन्या चमकली. हळूच डोकावून पाहिलं, तर हिच्या "उध्वस्त मांडवाच्या दारी वसंत"आलेला! फुलांचे गंधित बहर, कोकिळाचे मंजुळ गीत, उल्हासाचे खळाळते झरे, वा-याच्या सुरेल लकेरी घेऊन! हिनं मनाची कवाडं घट्ट बंद करून घेतली. जसं आपण काही पाहिलंच नाही! पण आतून ती अस्वस्थ झाली, वेड्या मनाची चलबिचल झाली. का हा असा अवेळी छळतोय? इथे न निखारा, न ठिणगी, शोधतोय काय हा या राखेत? सगळे कोंब जळून गेले वैशाखवणव्यात, आता कुणासाठी हा बहराचा निरोप घेऊन आलाय?

पुन्हा पुन्हा तो वेडा वसंत हिला खुणावत राहिला, ही पुन्हा पुन्हा त्याच्या आर्जवांना टाळत राहिली. त्याच्यापासून दूर दूर जाण्याचा निष्फळ प्रयत्न करत राहिली.

तिची ही असोशी, चलबिचल, अस्वस्थता तिचंच रंगरूप घेऊन आलेल्या देवकन्यांनी जाणली. तिला पुसलं, " का अशी अस्वस्थ तू? होतंय काय तुला?"


हिनं आपलं मन त्या इवल्याशा देवकन्यांपुढे उलगडलं. त्या आनंदल्या, वठलेल्या वृक्षाला पुन्हा पालवी फुटू पहात होती, कोमेजलेली वेल पुन्हा उमलू पहात होती. त्या हसल्या. त्यांनी तिला सांगितलं, "विसर जगाला, जग जरा स्वतःसाठी. लिहीत रहा मनात येईल ते सारं, स्वतःसाठीच. नको कोमेजून जाऊस आता." त्यांनी तिला दिला फुलण्याचा वसा! कसा आहे हा वसा? घ्यावा कसा? वसावा कसा?

मनातली निराशेची जाळ्या-जळमटं काढून टाकावी, उदासीनतेचे रंग खरडून काढून उल्हासाचे, चैतन्याचे रंग भरावे, दारी आशेच्या फुलांचं, स्वप्नांच्या पानांचं तोरण बांधावं, सुंदर शब्दांच्या रांगोळ्या काढाव्या, सूर-तालांचे सनई-चौघडे घुमवावे, कल्पनेचा पाट मांडावा, मनोभावे स्फूर्तिदेवतेची आराधना करावी. ती आली, की तिला डोळ्यांतल्या निर्मळ पाण्यानं स्नान घालावं, आत्म्याचं निरांजन करून भावनांच्या ज्योतींनी तिची आरती करावी. ती प्रसन्न होऊन आशिर्वाद देईल. हा वसा कधीही, कुठेही घ्यावा, पण उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये!

हिनं देवकन्यांकडून वसा घेतला. आपल्या कोशातून बाहेर निघाली. त्या वेड्या वसंताच्या चरणी स्वतःला अर्पण केलं! मनात येईल ते, मनाला वाटेल तसं लिहित राहिली, स्वतःच स्वतःशी वाचत राहिली, देवकन्यांना दाखवत राहिली. पुन्हा सुरवंटाचं फुलपाखरू झालं.

करता करता एक दिवस स्फूर्तिदेवता आली, तिनं विचारलं,"ही शब्द-सुरांची आरास कुणी मांडली?" ही समोर आली, आणि देवतेच्या चरणी लागली. स्फूर्तिदेवता हिला पाहून प्रसन्न झाली. हिच्यातला आमूलाग्र बदल देवतेला सुखावून गेला. देवतेनं काय केलं? हिचे शब्द आभाळाच्या को-या पाटीवर मांडले. खट्याळ वा-यानं ते ओंजळीत घेतले आणि दिले उधळून आसमंतात! सगळ्या सीमा ओलांडून सातासमुद्रापल्याड पोहोचले शब्द तिचे! कुणी त्यांच्यात प्रतिसादांचे, कौतुकाचे रंग भरले आणि त्यांच्या चित्तवेधक रांगोळ्या झाल्या. मैत्रीचा, स्नेहाचा गंध माळून त्यांची फुलं झाली, आत्मीयतेच्या, आपुलकीच्या सुरांत गुंफून त्यांची गीतं झाली, प्रासादिकतेच्या कोंदणात जडून त्यांचे मंत्र झाले! ती हरखून गेली. तिनं मनोभावे देवतेला वंदन केलं. तशी देवतेनं तिला आशिर्वाद दिला, 'फुलत रहा!'

स्फूर्तिदेवता हिला म्हणाली, '"अग वेडे, फुलणा-याला सुकावं लागतंच, हा तर निसर्गनियम आहे. पण सुकावं लागणार आहे, म्हणून फुलण्याआधीच कोमेजणं हा शाप आहे, स्वतःच स्वतःला दिलेला! दिवस सरणार आहे, रात्र येणारच आहे आणि ती पुन्हा नवा दिवस आणणारच आहे, पण नवा दिवस उगवला तरी कवाडं-गवाक्ष बंद ठेवून अंधाराला जवळ करून "अजून रात्रच आहे, दिवस उगवणारच नाहीय" असं समजणं हा करंटेपणा आहे. आता तरी मोकळी हो या शापातून! सुख-दु:ख, हसू-आसू, आशा-निराशा सगळंच व्यक्त करत रहा. वसंत-शरद-वर्षाच नाही , तर ग्रीष्म-हेमंत-शिशिरालाही दे शब्दांचे फुलोरे. भावनांना कोंडू नकोस, संवेदनांना गोठवू नकोस. दु:खालाही दे शब्दांचं कोंदण आणि घडव त्यांचे मनमोहक अलंकार. काट्यांनाही फुलवत रहा, उजळत रहा मनात कल्पनांच्या ज्योती, मिटव घुसमटत्या अंधाराला. वैशाखवणवे येतच रहाणार, जुनं सारं जळतच रहाणार. पण एखादा हिरवा कोंब वळवाच्या एका थेंबाच्या मदतीनं पुन्हा देवराई वसवू शकतो, हे विसरू नकोस. अग, मनाला कुंपण, भावनांना वय, स्वप्नांना बंधनं, कल्पनेला भय आणि बहराला काळ-वेळ नसते कधीच! हो स्वतःच स्वतःचे स्फूर्ति आणि मिळव विजय मनावर!" मनातली वास्तुदेवता धीरगंभीर आवाजात बोलली "तथास्तु!" यक्षपिता आणि गुरुदेवांनी आसमंतातून आशिर्वादाची फुलं उधळली. देवकन्या आनंदल्या.

तिनं मनाशी निश्चय केला, "कितीही वणवे आले, वादळं आली तरी मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. फुलत राहीन गुलमोहरासारखी, वैशाखातही. काट्यांतही डौलानं फुलणा-या गुलाबकळीसारखी, कुंपणाला सजवणा-या मधुमालतीसारखी, सुकूनही गंध उधळणा-या बकुळीसारखी."

ती फुलतेच आहे, सुकेपर्यंत फुलत रहायचं व्रत मनोभावे करते आहे. जशी तिला स्फूर्तिदेवता प्रसन्न झाली, तशी तुम्हा-आम्हा सर्वांना होवो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

No comments:

Post a Comment