Friday, December 25, 2009

एका तळ्याची गोष्ट



किती तपं लोटली या गोष्टीला! एक सुरेखसं तळं होतं. शांत, नितळ, स्वच्छ निळंशार पाणी. काठावरची हिरवीगार उंच उंच झाडं वाकून प्रतिबिंब पहायची त्यात. आभाळही आपली निळाई शोधायचं त्या तरल पाण्यात. चिमणी पाखरं जाता येता हळूच आपल्या इवल्याशा चोचीत इतकासा थेंब वेचून हलकेसे तरंग उठवून जात. सूर्याचे किरण सकाळ-संध्याकाळी त्या पाण्यात सोन्याच्या राशी ओतत असत. तळं खूप आनंदात होतं.


अचानक सगळं चित्र बदललं. कोणा एकानं गंमत म्हणून तळ्यात एक खडा टाकला. तळ्याचा थरकाप झाला. नितळ पाण्यावर कितीतरी तरंग उठले. त्या एकाला अजूनच गंमत वाटली. त्यानं आणखी एक खडा टाकला. तरंग उठतच राहिले. आता हा एक नवा खेळच झाला! कोणीही यावं, तळ्यात खडे टाकावे, कोणाचा खडा लांब जातो, किती जास्त तरंग उठतात अशा चढाओढी सुरू झाल्या. दोन तपं लोटली, खेळ सुरूच राहिला.

तळ्याच्या वेदनांचा विचारच नाही केला कुणी. खड्यांनी केलेल्या जखमा वहात राहिल्या, चिघळत राहिल्या. नितळ निळाईला हळू हळू रक्ताच्या लाल रंगानं वेढलं. खड्यांवर हिरवट, निसरडं शेवाळ पसरत गेलं, आणि पहाता पहाता त्या सुंदरशा तळ्याचं काळाकभिन्न, कुबट डोहात रूपांतर झालं. त्याचा भोवतालही बदलत गेला. पाखरांनी तळ्याची वाट सोडली. काठावरची झाडं सुकून गेली, निष्पर्ण, शुष्क खोडांवरच्या उजाड ढोल्यांमध्ये घुबडांनी घरटी बांधली.

आभाळानं तळ्यात डोकावणं सोडून दिलं. सूर्यकिरणांनीही पाठ फिरवली त्याच्याकडे. आता एकाकी तळं, तळं कुठं राहिलं? तो काळा डोह, घुबडांचे चीत्कार, ती निष्पर्ण खोडं, उजाड, भकास, एखाद्या भयकथेच्या पार्श्वभूमीसारखं! त्यालाही दोन तपं लोटली. डोह आहे तसाच राहिला, चैतन्याची वाट पहात!

आजच कुठूनतरी मंद, हलकासा सुगंध दरवळला वा-यासवे. प्राजक्त तर नाही हा? कुणा पाखराचे मंजुळ सूरही येताहेत कानी. कशाचे हे संकेत? तुला काय वाटतं, बदलतील दिवस तळ्याचे?

होय! नक्कीच बदलणार आहेत! कोणा एकानं त्या डोहातलं शेवाळ काढायला सुरुवात केलीय. हळू हळू ते शेवाळ, खडे सगळं निघून जाईल, तळ्याचं पाणी पुन्हा नितळ निळं होईल, सकाळ-संध्याकाळी सोन्याचं रूप घेईल, आभाळ पुन्हा उतरेल त्या पाण्यात. झाडं पुन्हा हिरवी होतील, पाखरं पुन्हा चोचीनं हलकेसे तरंग उठवतील, त्यांच्या इवल्याशा पावलांचे ठसे जपत तळं पुन्हा हसायला लागेल.

1 comment:

  1. खूप हळुवार लिहिता तुम्ही...आवडलं...

    ReplyDelete